वेंगीचे चालुक्य घराणे

वेंगीचे चालुक्य घराणे याचा कालखंड इ.स. ६१५ ते इ.स. ९७० असा आहे. चालुक्य घराण्याच्या चार वेगवेगळ्या शाखा भारतातल्या वेगवेगळ्या भागांवर राज्य करीत होत्या. त्यापैकी पूर्व भारतातल्या आंध्रप्रदेशात वेंगीच्या चालुक्य घराण्याची स्थापना विष्णूवर्धन या चालुक्य सम्राटाने केली.

पार्श्वभूमी संपादन

चालुक्य वंशाचे पहिले राजघराणे कर्नाटकातील वातापी येथे स्थापन झालेले होते. वेंगीच्या चालुक्य घराण्याची स्थापना करणारा विष्णूवर्धन हा वातापीच्या चालुक्य घराण्यातील राजा दुसरा पुलकेशी याचा भाऊ होता. दुसऱ्या पुलकेशीला पूर्व भारत जिंकून घेण्याच्या कामात विष्णूवर्धनाने मोलाचे सहाय्य केलेले होते त्यामुळे नंतर दुसऱ्या पुलकेशीने विष्णूवर्धनला पूर्व भारताचा राजप्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. त्यानंतर अल्पकाळातच विष्णूवर्धनाने स्वतंत्र राज्याची घोषणा करून महाराज ही पदवी घेतली.

राजे संपादन

संस्थापक असलेल्या विष्णूवर्धनानेच वेंगी हे नगर आपल्या राज्याची राजधानी बनवले. दक्षिण कोसल, कलिंग व नेल्लोरपर्यंतचा पूर्व भारतातील प्रदेश त्याच्या राज्यात मोडत होता. विष्णूवर्धनाच्या मृत्यूनंतर सुमारे चारशे वर्षांपर्यंत वेंगीचे चालुक्य घराणे पूर्व भारतात राज्य करीत होते.

विष्णूवर्धनाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जयसिंह राजा झाला. याच्या काळात पल्लवांनी बदामीच्या चालुक्यांवर आक्रमण केले पण जयसिंहाने बदामीच्या चालुक्यांना मदत केली नाही. पुढे इ.स. ७५३ मध्ये बदामीच्या चालुक्यांचा अस्त झाला व तिथे राष्ट्र कुटांची सत्ता आली.

वेंगीच्या चालुक्यांचा पहिला विजयादित्य राजा असताना राष्ट्रकूट राजा दुसऱ्या गोविंदाने वेंगीच्या राज्यावर आक्रमण करून त्यांना मांडलिक बनविले. पुढे तिसऱ्या विजयादित्याने राष्ट्रकूट व कलचूरी राजांचा प्रतिकार करून वेंगीचे रक्षण केले. इ.स. ८५० च्या सुमारास त्याने सध्याच्या आंध्र प्रदेशाचा बराच भाग आपल्या आधिपत्याखाली आणला व आपली राजधानी वेंगीहून विजयवाड्यास हलविली. [१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "आंध्र प्रदेश, इतिहास". २४ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)