वूमन-नेशन-स्टेट (पुस्तक)

वूमन-नेशन-स्टेट हे पुस्तक नीरा युवल डेविस व फ्लोया एनथीयास यांच्या द्वारे संपादित आहे. १९८९ मध्ये मॅकमिलन प्रकाशनाद्वारे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. ९ देशांच्या यष्टी अध्ययनाच्या माध्यमातून या पुस्तकात संपादक स्त्रिया, राष्ट्र व राज्य यांचा एकदुसऱ्याशी असलेला संबंध दाखवून देतात.

प्रस्तावना संपादन

या पुस्तकात संपादक स्त्रिया, राष्ट्र व राज्य यांचा संबंध दाखवणारे ९ विविध लेखांच्या संकलनाद्वारे स्त्रियांचा राष्ट्र व वांशिक प्रक्रियेवर व तसेच राष्ट्र व वांशिक प्रक्रियेचा स्त्रियांवर कसा परिणाम होतो व राज्यातील धोरणांचा या सर्व प्रक्रियेशी काय संबंध आहे यावर भाष्य करतात. हे लेख ९ विविध देशांमधील (इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युगांडा, इस्रेल, इराण, तुर्की, सिप्रस, इटली) मातृत्व व कौटुंबिक कायद्यांचा यष्टी अभ्यासाच्या (case studies) मदतीने या समाजातील स्त्रियांच्या भूमिकेचे विश्लेषण मांडतात.

पुस्तकातील सारांश/ ठळक मुद्धे संपादन

संपादक मांडतात की मुख्यतः जेव्हा स्त्रिया व राष्ट्र-राज्यावर अभ्यास झाले तेव्हा स्त्रियांना एकजिनसी कोटीक्रम म्हणून बघितले गेले व त्यांच्यामधील भिन्नता ही झाकोळली गेली. संपादक स्त्रियांमधील भिन्नतेला सामोरे आणतात व त्या भिन्नतेला वांशिकतेच्या व राष्ट्रीयत्वाचा आधारावर बघतात. संपादकांच्या मते राष्ट्रातील विशिष्ट गटांचे राज्याशी असलेल्या संबंधांमधून स्त्रियांची भूमिका ठरते. तसेच स्त्रियांच्या भूमिकेद्वारेच राष्ट्रातील गटांचे राज्याशी असलेले संबंध घडवले जातात.

स्त्रिया व राज्य याबाबतीतील चर्चा मुख्यत्वे नागरिकत्वाच्या चौकटीत होत असल्याचे डेविस व अन्थियास मांडतात. नागरिकत्वाच्या हक्कांसंदर्भात राज्य हे लिंगभाव निरपेक्ष नसून स्त्री व पुरुषांना तो वेगळ्या पद्धतीने घडवत असल्याचे ते दाखवून देतात. मूलतः ‘कल्याणकारी राज्याच्या’ अंतर्गत राज्याने स्वतःला पुरुषाच्या रूपात बघितले आहे. फ़क़्त स्त्री व पुरुषांमध्येच नव्हे तर सर्व स्त्रियांना सुद्धा राज्य एकजिनसी बघत नाही. स्त्रिया या वर्ग, वंश व वयाने विभागलेल्या आहेत. बहुतेक समाजांमध्ये या विविध गटांच्या बायकांसाठी वेगवेगळी धोरणे असल्याची दिसून येतात. हे वेगळे धोरण एका विशिष्ट गटाच्या अंतर्गत व राज्य अशा दोन्ही पातळीवर दिसून येते.

संपादकाच्या मते स्त्रिया वांशिक / राष्ट्रीय किंवा राज्याच्या प्रक्रियेत ५ महत्त्वाच्या पद्धतिने सहभाग घेतात: १. वांशिक गटांच्या सदस्यांचे जैविक पुनरुत्पादन २. वांशिक/ राष्ट्रीय गटांच्या सीमारेषेच पुनरुत्पादन ३. गटाच्या विचारप्रणालीचे पुनरुत्पादन व संस्कृतीचे प्रक्षेपण (पुढच्या पिढीपर्यंत नेणारी) ४. वांशिक/ राष्ट्रीय भिन्नतेची खूण ५. राष्ट्रीय, आर्थिक, राजकीय व लष्करी संघर्षामध्ये सहभाग

पुस्तकातील विविध लेखांमधून स्त्रिया कशा पद्धतीने स्वतःचे चित्रण दुय्यम, घरगुती असे करण्यास मदत करतात हे स्पष्ट होते. उदा. अफ़शर त्यांच्या लेखात दाखवून देतात कि इराण मध्ये १९६७ ते १९७५ मध्ये स्त्रियांच्या दृष्टीने कायद्यात सुधारणा केल्या गेल्या ज्या अंतर्गत बहुपत्नीत्व व पुरुषांना एकतर्फी घटस्फोटाचा अधिकार रद्द करण्यात आला. त्या सुधारणा बहुतांश इराणी स्त्रियांना अनावश्यक व धोक्याचे वाटले. तसेच कित्येक मध्यम वर्गीय स्त्रियांनी या सुधारणा त्यांच्या मुक्त मुलींना स्वतःच्या कुटुंबाच्या मानमर्यादांच्या विरोधात समजले.

राज्य सुद्धा स्वतःच्या धोरणांद्वारे विविध समाजातील स्त्रियांच्या जननक्षमतेवर नियंत्रण ठेवतो व या अर्थाने स्त्रियांवर परिणाम पाडतो. उदा. इस्रायल मध्ये पेलस्टेनियन स्त्रियांना मोफत गर्भ निरोधक उपलब्ध आहेत. याउलट ज्या ज्यू कुटुंबामध्ये तीन पेक्षा अधिक मुलं आहेत त्यांना गृहअनुदान उपलब्ध आहेत.

योगदान/ प्रतिक्रिया संपादन

सद्यस्थितीत जेव्हा वांशिक वाद मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत, अशा वेळेस चेरील वॉकर व एनी रोस्टर यांच्या मते हे पुस्तक महत्त्वाचे व योग्य वेळेस प्रकाशित झालेले आहे. परंतु चेरील वॉकर पुस्तकाची चिकित्सक मांडणी करताना मांडतात कि या पुस्तकात स्त्रियांवर होणारा इतर राष्ट्रीय व वांशिक प्रक्रियांच्या परिणाम अधिक सखोल पद्धतीने मांडण्यात आला आहे; परंतु स्त्रिया कशा या प्रक्रीयांवर परिणाम पाडतात याचे योग्य उहापोह येथे झालेले दिसत नाही.