विष्णुबुवा ब्रह्मचारी

लेखक

विष्णूबुवा / विष्णूबावा ब्रह्मचारी (जन्म : २० जुलै १८२५ - मृत्यू : १८ फेब्रुवारी १८७१) हे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक समाजसुधारक आणि विचारवंत होते. त्यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी लिहिलल्या पुस्तकांवर विष्णूबावा असा केलेला आढळतो[].

विष्णूबुवा/ विष्णूबावा ब्रह्मचारी
जन्म नाव विष्णू भिकाजी गोखले
टोपणनाव विष्णूबुवा/ विष्णूबावा ब्रह्मचारी
जन्म २० जुलै १८२५
शिरवली, ता. माणगाव
मृत्यू १८ फेब्रुवारी १८७१
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
भाषा मराठी
साहित्य प्रकार वैचारिक, टीकाग्रंथ
विषय धर्म, सामाजिक प्रबोधन
प्रसिद्ध साहित्यकृती वेदोक्तधर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणीं निबंध, समुद्रकिनारीं वादविवाद, सेतुबंधनी टीका
वडील भिकाजी
आई उमाबाई

विष्णुबुवांचा जन्म शिरवली या गावी (तालुका - माणगाव , जिल्हा - रायगड, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते. त्यांच्या आईचे नाव उमाबाई होते.

गरिबीमुळे विष्णुबुवांना फार शिक्षण घेता आले नाही. त्यांना चरितार्थासाठी बालपणापासून  नोकरी करावी लागली.  विष्णुबुवा वयाच्या १४ व्या वर्षी ब्रिटिश कस्टम खात्यात नोकरीला लागले. त्यांचा स्वभाव आध्यत्मिक आणि धार्मिक असल्याने नोकरीव्यतिरिक्त त्यांचा अन्य वेळ भजन, कीर्तन आणि वाचनात व्यतीत होत असे.

ईश्वरी प्रेरणेने वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी नोकरी सोडली आणि गुरूच्या शोधासाठी बाहेर पडले. नाशिकजवळील सप्तशृंगी पर्वतावर त्यांनी ७ वर्षे कठोर तपश्चर्या केली. ईश्वरी संकेतानुसार पुढील आयुष्य जनसामान्यांच्या उत्कर्षासाठी समर्पित करण्याचे ठरवले. वेदोक्त हिंदू धर्माच्या महत्तेवर त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने दिली. लोक त्यांना ब्रह्मचारी बुवा म्हणू लागले.

सप्टेंबर १८५६ मध्ये द्वारकेला जाण्यासाठी ते गिरगाव, मुंबई येथे आले. ब्रिटिश राजसत्तेच्या हातात हात घालून ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदू आणि पारशी समाजाचे धर्मांतरण - ख्रिस्तीकरण चालू केले होते. विष्णुबुवांनी याला प्रतिवाद म्हणून आपल्या ओजस्वी वाणीने हिंदू धर्माची महत्ता आणि ख्रिस्ती धर्मातील फोलपणा सांगण्यास सुरुवात केली.

गिरगावातील प्रभू सेमिनरी या शाळेत त्यांच्या ५० सभा झाल्या. जनतेने त्यांच्या सभांना मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. १५ जानेवारी १८५७ ते २८ मे १८५७ या काळात त्यांच्या ख्रिश्चन मिशनऱ्यांसोबत मुंबई चौपाटीवर गुरुवारी संध्याकाळी २० धार्मिक वादविवाद सभा झाल्या. विष्णुबुवांनी या सभांमध्ये आपल्या अभ्यासपूर्ण वृत्तीने बायबलमधील अनेक मुद्द्यांवर मिशनऱ्यांना निरुत्तर केले. रे. जॉर्ज बोवेन नावाच्या मिशनऱ्याने या सभांच्या वृत्तांतावर ‘ Discussion by The Seaside ‘ (1857) हे पुस्तक लिहिले आहे. पुढे या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘ समुद्रकिनारीचा वादविवाद ‘ (१८७२) प्रकाशित झाला. विष्णुबुवांच्या विचारांनी प्रभावित होऊन धर्मांतरित हिंदू आणि पारशांनी घरवापसी केली.

विष्णुबुवांनी आपल्या जीवनध्येयासाठी तामिळनाडू, प. बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात येथे जाऊन हिंदूंचे प्रबोधन केले.

मानवतावादी भूतदयावादी विचार, जातीभेद निर्मूलन, विधवा विवाहाला मान्यता, सैन्यात वर्णभेद नको , शकुन-अपशकुन मानू नये, सार्वत्रिक शिक्षण असावे, सर्वांचे उत्पन्न सामाईक असावे, निसर्गदत्त वस्तूंवर कर नसावा असे विचार मांडणारा वेदोक्तधर्माचा आणि संस्कृतिनिष्ठ राष्ट्रवादाचा डोळस प्रचारक, तत्वचिंतक, प्रभावी वक्ता असे विष्णुबुवांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत.

विष्णुबुवांचे चरित्र, विचार आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र (https://www.vishnubuvabrahmachari.com/) कार्यरत आहे. विष्णुबुवांनी शिरवली येथे औदुंबराच्या झाडाखाली स्थापन केलेल्या श्रीदत्तगुरू पादुकांचे लहानसे मंदिर ऑक्टोबर २०२३ मध्ये बांधून झाले आहे.

विष्णूबावांची ग्रंथसंपदा

संपादन
  • भावार्थसिंधू; १८५६; गोपाळ रामचंद्र; सातारा
  • बोधसागर; १८५७; गणपत कृष्णाजी; मुंबई
  • वेदोक्त धर्मप्रकाश; १८५९; गणपत कृष्णाजी; मुंबई
  • सुखदायक राज्यप्रकरणीं निबंध; १८६७; इंदुप्रकाश; मुंबई
  • चतुःश्लोकी भागवत याचा अर्थ; १८६७; मुंबई
  • सहजस्थितीचा निबंध; १८६८; इंदुप्रकाश; मुंबई
  • समुद्रकिनारीचा वादविवाद; १८७२; ओरिएंटल छापखाना; मुंबई
  • सेतुबंधनी टीका - प्राकृत; १८९०; गणपत कृष्णाजी; मुंबई

संदर्भ

संपादन

संदर्भसूची

संपादन
  • श्री. पु., गोखले. विष्णूबुवा ब्रह्मचारी आणि त्यांचे विचारधन.