विल्यामिना फ्लेमिंग

विल्यामिना पॅटन स्टीवन्स फ्लेमिंग (१५ मे, इ.स. १८५७:डंडी, स्कॉटलंड - २१ मे, इ.स. १९११:बॉस्टन, मॅसेच्युसेट्स, अमेरिका) ही स्कॉटलंडमध्ये जन्मलेली अमेरिकन अंतरिक्षशास्त्रज्ञ होती. हिने ताऱ्यांना नावे देण्याची प्रमाण पद्धत विकसित करण्यात योगदान दिले व हजारो तारे व इतर अवकाशीय वस्तूंना शास्त्रीय नावे दिली.

फ्लेमिंग स्कॉटलंडमध्ये शालेय शिक्षिका होती. २१ वर्षांची असताना ती आपल्या पतीबरोबर बॉस्टनला स्थलांतरित झाली. येथे आल्यावर तिने हार्वर्ड कॉलेज वेधशाळेच्या निदेशक एडवर्ड चार्ल्स पिकरिंग यांच्या घरी मोलकरणीची नोकरी पत्करली. तिच्या शास्त्रीय व व्यावहारिक ज्ञानाने प्रभावित होउन पिकरिंगने फ्लेमिंगला आपल्या वेधशाळेत नोकरी देऊ केली व ताऱ्यांच्या प्रकाशपटलांचा अर्थ लावण्याचे शिकविले. त्या आधारावर फ्लेमिंगने ताऱ्याच्या प्रकाशपटलातील हायड्रोजनाच्या प्रमाणावरून शास्त्रीय वर्गीकरण करण्याची पद्धत विकसित केली. याशिवाय तिने १०,०००पेक्षा तारे, ३९ तारकामेघ, ३१० अस्थिर तारे आणि १० नोव्हा बद्दलच्या शास्त्रीय माहितीची नोंद केली. १८८८साली फ्लेमिंगने होर्सहेड तारकामेघ शोधला. सुरुवातीला तिला याचे श्रेय देण्यात आले नव्हते. १९०८मध्ये फ्लेमिंगची ख्याती झाल्यावर तिले हे श्रेय देण्यात आले.