विलायती चिंच ऊर्फ फिरंगी चिंच उर्फ गोरटी इमली हा चिंचेचा प्रकार नसून वाटाण्याच्या फॅबॅसी (Fabaceae) कुळातले फुले, फळे देणारे शेंगझाड आहे. याचे शास्त्रीय नाव पिथेसेलोबियम डल्सी (Pithecellobium dulce) असे आहे तर इंग्लिशमध्ये याला मनिला टॅमरिंड असे म्हणतात.

विलायती चिंच ऊर्फ फिरंगी चिंच

या सदाहरित वृक्षाला लालसर, गुलाबी वर्तुळाकार आकाराच्या आकडे असलेल्या चिंचेसारख्या शेंगा लागतात. हा वृक्ष प्रशांत महासागरानजीक पहिल्यांदा सापडला. म्हणूनच याचे नाव 'विलायती चिंच' असे पडले. या वनस्पतीला जंगली जिलेबी असे नाव आहे.हे झाड साधारण १५ ते २० मीटर उंच होते. याचे खोड काळपट करड्या रंगाचे असते. त्याच्या फांद्या दूरवर पसरत जात असल्याने त्याचा पर्णसंभार मोठा विस्तारलेला असतो. त्यामुळे या झाडाची चांगली सावली पडते.

विलायती चिंचेच्या झाडाची त्याची पाने नाजूक व हिरवीगार असतात. लहान पानाच्या मुळाशी बाजूला दोन टोकदार काटे असतात नवीन पाने येत असताना जुनी पाने गळून पडतात. त्यामुळे झाड सतत हिरवेगार दिसते. झाडाला पिवळट दुधट पांढऱ्या रंगाची फुले येऊन पुढे शेंगा येतात. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात नवी पालवी आली तरी इमल्या फेब्रुवारीपर्यंत तयार होतात.