विद्याधर गोखले

भारतीय राजकारणी
(विद्याधर संभाजीराव गोखले या पानावरून पुनर्निर्देशित)

विद्याधर संभाजीराव गोखले (जानेवारी ४, इ.स. १९२४ - सप्टेंबर २६, इ.स. १९९६) हे मराठी पत्रकार व संगीत नाटककार होते. मराठी वर्तमानपत्र दैनिक लोकसत्ताचे ते संपादक होते. विद्याधर गोखले यांच्या वरिल संस्कार हे पत्रकारिता यालाच पोषक होते. विद्येवर,ज्ञानावर त्यांचा विश्वास होता. ते व्यासंगी होते.

इतिहास

संपादन

संपादकीय सूत्रे हाती येण्यापूर्वी विद्याधर गोखले यांच्याकडे ‘साप्ताहिक लोकसत्ते’ची पूर्ण जबाबदारी होती. ह.रा.महाजनी संपादक असताना गोखले ‘लोकसत्ता’ मध्ये आले. त्याआधी काही काळ त्यांनी भा.रा.धुरंधर यांच्या ‘नवभारत’ मध्ये काम केले होते.अमरावती होऊनही मुंबईत आल्यावर काही काळ ते शिक्षक म्हणूनही काम करत होते. तरी त्यांच्यावरील संस्कार हे पत्रकारिता यालाच पोषक होते. त्यांचे वडील संभाजीराव गोखले हे काँग्रेसचे नेते होते. विद्येवर,ज्ञानावर त्यांचा विश्वास होता.ते व्यासंगी होते. हाच संस्कार विद्याधर गोखले यांवरही झाला. वीर वामनराव जोशी यांचा सहवासही त्यांना अमरावतीत लाभला होता व जोशी यांच्या ‘सावधान’ पत्राचे ते चाहते होते. न. चि. केळकर, अच्युत बळवंत कोल्हटकर,शि.म. परांजपे यांच्या लेखनाचा त्यांनी खास अभ्यास केला होता. संपादकीय लेखनाचे धडे त्यांनी महाजनी यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले. प्रत्यक्ष संपादकीय लेखनही त्यांनी विपुल केले. त्यामुळे संपादकाची जबाबदारी विद्याधर गोखले यांनी अगदी सहजपणे स्वीकारली.[]

लेखन शैली

संपादन

विद्याधर गोखले यांचे लेखन मात्र गांभीर्यापेक्षा रंजकतेकडे अधिक झुकणारे होते. राजकीय लेखनही ते साहित्यिक शैलीने नटवत लेखन सालंकृत करण्यावर त्यांचा अधिक भर असे. संस्कृत व उर्दू साहित्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. त्यातील वचने व कल्पना ते आपल्या अग्रलेखात वापरत. सरळ, सुबोध अशा त्यांच्या लेखनात विनोदाचा शिडकावाही असे. प्रक्षोभक लिहिण्यापेक्षा मुद्द्यांकडे, भाषेच्या व शब्दांच्या नेटक्या वापराकडे संपादकाने लक्ष द्यायला हवे, असे त्यांचे मत होते.

प्रकाशित साहित्य

संपादन
  • झंझावात (कादंबरी)

नाटके

संपादन
  • संगीत अमृत झाले जहराचे (१९६५)
  • इब्राहिमखान गारदी
  • संगीत चमकला ध्रुवाचा तारा (१९६९)
  • संगीत जय जय गौरीशंकर (१९६६)
  • जावयाचे बंड
  • संगीत पंडितराज जगन्नाथ (१९६०)
  • बरसते सूर्यातुन चंद्रिका
  • बावनखणी (१९८३)
  • संगीत मदनाची मंजिरी (१९६५)
  • संगीत मंदारमाला (१९६३)
  • संगीत मेघमल्हार (१९६७)
  • रूपरंजनी
  • राणी रूपमती
  • साक्षीदार (१९६०)
  • सुंदरा मनामध्ये भरली
  • संगीत सुवर्णतुला (१९६०)
  • संगीत स्वरसम्राज्ञी (१९७३)
  • अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, सातारा, १९९३
  • पुण्यात विद्याधर गोखले यांच्या नावाचे संगीताचे आणि अभिनयाचे कार्यक्रम करणारे संगीत-नाट्य प्रतिष्ठान आहे.
  • मुंबई-दादर येथील जी-उत्तर विभागात बाळ गोविंददास मार्ग व सेनापती बापट मार्ग जेथे मिळतात तेथे तयार झालेल्या चौकास नाटककार विद्याधर गोखले यांचे नाव दिले आहे.
  • मुंबई पत्रकार संघातर्फे दर वर्षी चांगल्या लेखक-पत्रकाराला मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ललित लेखनाबद्दल देण्यात येणारा विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार देण्यात येतो. २०१२ साली हा पुरस्कार ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांना प्रदान झाला.

संदर्भ

संपादन
  1. ^ बावडेकर, ऋता (2009–2010). महाराष्ट्रातील प्रमुख संपादक. पुणे: डायमंड पब्लिकेशन्स. pp. १३९, १४०. ISBN 978-81-8483-217-4.CS1 maint: date format (link)