विठ्ठल हरी कुलकर्णी (१४ एप्रिल, १९०२ - ९ डिसेंबर, १९८२) हे एक मराठी लेखक, समीक्षक व चरित्रकार होते. त्यांनी चंद्रहास, रत्नपारखी, शरदचंद्र, सुहास या टोपणनावांनी ही लेखन केले आहे.

ते कोकणातून बी.ए. (१९२४) व एम.ए. (१९३१) झाले. काही काळ शाळेत शिक्षकाची नोकरी केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या इस्माईल युसुफरुईया काॅलेजांत त्यांनी प्राध्यापकी केली.

वि.ह. कुलकर्णींनी ज्योत्स्ना, तुतारी, प्रतिभा, विविध वृत्त या नियतकालिकांमधून सदरलेखन केले. पैकी प्रयिभा नियतकालिकात 'हास-परिहास' या सदराचे लिखाण सुहास या नावाने, तर 'चांदण्याच्या गप्पा' या 'ज्योत्स्ना'च्या सदरात 'चंद्रहास ' या टोपणनावाने केलेले त्यांचे लेखन लोकप्रिय झाले.

पाश्चात्त्य लेखक आणि विविध क्षेत्रांतील काही सुप्रसिद्ध व्यक्ती यांच्यावरील त्यांनी लिहिलेले चरित्रपर लेख 'व्यक्तिचित्रे' या नावाने सन १९३६मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकात मॅक्झिम गाॅर्की, जी.के. वेस्टर्टन, ग्रेटा गार्बो, ऑर्नोल्ड बेनेट, सर ऑर्थर काॅनन डायल, चार्ली चॅप्लीन, डाॅन ब्रॅडमन, फिलिप स्नोडन, लाॅर्ड बर्कनहेड या साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातील नऊ व्यक्तीचीची चित्रणे आहेत.

विठ्ठल हरी कुलकर्णी यांनी निबंध स्वरूपाचे अभ्यासपूर्ण लेखनही केले आहे. त्यामध्ये गो.ग. आगरकर, अ.ब. कोल्हटकर (अर्वाचीन मराठी वाड्मय सेवक खंड १, १९३१), मराठी कादंबरी : १८७५ ते १९३५ (अर्वाचीन मराठी साहित्य, १९३५), मराठीतील निबंधवाङ्मय (प्रदक्षिणा, १९४१), न.चिं. केळकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या निमित्ताने 'केळकर यांच्या वाड्मयातील विशेष' (केळकर षष्ट्यब्दीपूर्ती ग्रंथ, १९३२) आदींचा समावेश होतो.

आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांचे 'जॉर्ज बर्नाड शॉ' आणि 'अच्युत बळवंत कोल्हटकर : व्यक्ती आणि वाड्मय' हे अभ्यासपूर्णरीत्या लिहिलेले दोन मोठे चरित्रग्रंथ प्रकाशित झाले.

ऑस्कर वाईल्डच्या 'लेडी विडरमिअर्स फॅन'चे त्यांनी शोभेचा पंखा हे नाटक पुस्तकरूपाने प्रकाशित झाले नाही,.परंतु मुंबई मराठी साहित्य संघाने ते रंगमंचावर आणले.

वृत्तपत्रे, नियतकालिके यांमधून विपुल प्रमाणात लेखन करूनही 'व्यक्तिरेखा'(१९८६) व 'वि.ह. कुलकर्णी निवडक लेख' (१९८८) ही दोनच पुस्तके त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाली.