विकिपीडिया चर्चा:शुद्धलेखन चिकित्सा सुधारणा प्रकल्प

मुळात 'शुद्धलेखन चिकित्स सुधारणा प्रकल्पा'ची मराठीला अजिबात गरज नाही. इंग्रजीला असते कारण तेथे शब्दांचे स्पेलिंग हे उच्चारानुसार असतेच असे नाही. कदाचित त्यामुळे, इंग्रजी पुस्तकांत स्पेलिंगदोष, व्याकरणदोष किंवा मुद्रणदोष कधीच सापडत नाही.

मराठीत अशुद्ध का लिहिले जाते? कारण मराठी माणसांना चांगले मराठी बोलता येत नाही. मी हिंदी मुलखात राहत असल्याने तेथील माणसे किती शुद्ध हिंदी बोलतात, आणि वर्तमानपत्रांत किंवा हिंदी पुस्तकांत एकही चूक सापडणे कसे दुरापास्त असते हे मला प्रत्यही जाणवते.

जर मराठी माणसे चांगल्या व्यक्तींची मराठी भाषणे लक्षपू्र्वक ऐकतील, चांगली पुस्तके ऱ्हस्व-दीर्घाचे आणि वाक्यरचनेचे भान ठेवून वाचतील तर त्यांच्या मराठी लेखनात चुका होत नाहीत. पुस्तक वाचताना ऱ्हस्व -दीर्घाचे मनातल्या मनात तसेच योग्य उच्चारण केलॆ, तर तो शब्द लिहिताना सहसा चूक होत नाही. शब्दातील अक्षरे वाचायची नसतात, तर तो शब्दच वाचून त्याची प्रतिमा मनात उमटायला हवी. इंग्रजीच्या बाबतीत आपण हेच करतो त्यामुळे स्पेलिंगच्या चुका बहुधा होत नाहीत. (मी लहानपणी पिक्चर या त्याकाळी अतिशय अवघड वाटलेल्या शब्दाचे स्पेलिंग दिवसभर पाठ करताना, माझ्या वडिलांनी ऐकले आणि शब्दाचे स्पेलिंग पाठ करायची कशी गरज नसते ते समजावून सांगितले. लिहिलेला शब्द (स्पेलिंग नव्हे!) मनातल्या मनात वाचून मेंदूवर कोरला गेला, की जेव्हा लागेल तेव्हा मुळाबरहुकूम कागदावर उतरवता येतो, ही ती समजावणी.) .

मराठीची वाक्यरचना इंग्रजी-हिंदीपेक्षा अनेक बाबतील वेगळी असते. उदा० संयुक्त वाक्यात हिंदी-इंग्रजीत मुख्य वाक्यांश (क्लाॅज) आधी येतो, आणि दुय्यम नंतर. मराठीत याच्या उलट होते. हे अनेकांना माहीत नसते, आणि वाक्यरचनेच्या चुका होतात. '

राजा, राणी आणि राजकुमाराला भूक लागली होती' हे वाक्य, 'राजाला, राणीला आणि राजकुमाराला, वगैरे'; किंवा 'राजा, राणी व राजकुमार यांनाअसे लिहायला पाहिजे, याची जाणीवच मराठी लिहिणाऱ्यांना नसते .

मराठी विकिपीडियाच्या पाहिल्या पानावरील मजकूर : ' येथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.' या मजकुरात चार चुका आहेत. क्रियेटीव्ह हा शब्द क्रियेटिव्ह असा पाहिजे. अट्रीब्युशन हा शब्द ॲट्रिब्यूशन असा हवा. ट्रेडमार्क हा पुल्लिंगी शब्द आहे, त्यामुळे 'संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क' ही शब्दरचना 'संस्थेचा ट्रेडमार्क' अशी हवी; वापरुन हा शब्द वापरून असा हवा. . .... (चर्चा) १७:३७, ३ मार्च २०२१ (IST)Reply

Return to the project page "शुद्धलेखन चिकित्सा सुधारणा प्रकल्प".