वासुदेवशास्त्री महादेवभट्ट अभ्यंकर


महामहोपाध्याय, प्रकाण्डपंडित,

संस्कृत अध्यापक

४ ऑगस्ट १८६३ — १४ ऑक्टोबर १९४२

कालिदासाने ‘मालविकाग्निमित्र’ या नाटकात केलेले वर्णन : ‘एखादा स्वतः शिक्षणात हुशार असतो, तर एखादा चांगल्या प्रकारे शिकवू शकतो; पण ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी असतील तोच शिक्षकांचा मेरुमणी होय’ हे वर्णन ज्यांना अक्षरशः लागू पडते, त्या वासुदेवशास्त्री महादेवभट्ट अभ्यंकर यांचा जन्म वेदशास्त्रसंपन्न अशा घराण्यात झाला. त्यांच्या मातु:श्रींचे नाव दुर्गाबाई होते. वासुदेवशास्त्री दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वयाच्या सात वर्षांपर्यंत आजोबा - भास्करशास्त्री यांनी त्यांचा सांभाळ केला. परंतु, नंंतर आजोबांचे निधन झाले व वासुदेवशास्त्री अगदी पोरके झाले. त्याच वेळी महर्षी रामशास्त्री गोडबोले यांच्याकडे त्यांचे व्याकरणाचे अध्ययन सुरू झाले. वयाच्या पाचव्या वर्षी कुशाग्र बुद्धीच्या वासुदेवशास्त्र्यांचे ‘रूपावली’ व ‘समासचक्र’ तोंडपाठ होते, तर वयाच्या सातव्या वर्षी ‘अमरकोश’ व ‘अष्टाध्यायी’ मुखोद्गत होती.

या काळात, विशेषतः वयाच्या आठ ते वीस वर्षांपर्यंत वासुदेवशास्त्र्यांची दिनचर्या पुढीलप्रमाणे होती : सकाळी सहाच्या सुमारास उठून स्नानसंध्यादी प्रातःकर्म उरकून सकाळी सातपासून नऊ वाजेपर्यंत मुख्यत: पाठांतर व शिकवलेल्या विषयाची चिंतनिका असा त्यांचा अभ्यास चाले. चिंतनिका म्हणजे गुरुजींनी शिकवलेला पाठ जसाच्या तसा सहाध्यायींना — बरोबरीच्या विद्यार्थ्यांना शिकवणे. सकाळी नऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत रामशास्त्री गोडबोले गुरुजींजवळ सहाध्यायींबरोबर वासुदेवशास्त्र्यांचा अभ्यास चाले. भोजन — विश्रांतीनंतर एक ते चारपर्यंत गुरुजींजवळ पुन्हा अध्ययन होई. दुपारी चार वाजता गुरुजी बाहेर गेल्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते आपल्यापेक्षा खालच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत. रात्री भोजनोत्तर पुन्हा एक — दीड तास सुमारे ८ ते ९.३० वाजेपर्यंत इतर विद्यार्थ्यांचे शंका, निरसन इत्यादी कार्यक्रम चाले. या सर्व दैनंदिन कार्यक्रमात गावातील मराठी शाळेत जाऊन शिक्षण घेणे वासुदेवशास्त्र्यांना अशक्य होते. म्हणून आठव्या वर्षी त्यांची जी शाळा सुटली, ती कायमचीच. परंतु, कोवळ्या वयात त्यांनी अभ्यासलेल्या ग्रंथांची केवळ नावे बघितली तरी त्यांच्या प्रकांडपांडित्याची जाणीव होते. डॉ. वा.गो. परांजपे यांनी पुढील माहिती (फर्ग्यु. त्रै. जुलै १९२८) दिली आहे —

वय वर्षे ८-११ असताना ‘सिद्धान्तकौमुदी’, ‘रघु-सर्ग’-२, ‘माघ-सर्ग’-१, वय वर्षे ११-१३ असताना ‘मनोरमा (शब्दरत्न) कारकान्त’ व सोबत ‘तर्कसंग्रह’, ‘दीपिका’, ‘मुक्तावली’; वय वर्षे १३-१४ असताना ‘शब्दकौस्तुभ’ (नवाहिन्की) व सोबत ‘मथुरानाथी-पञ्चलक्षणी’, ‘गदाधरी- स्वलक्षण’, ‘कुवलयानन्द’, ‘नवाहिन्की’, ‘अङ्गाधिकार’; वय वर्षे १४-१६ असताना ‘परिभाषेन्दुशेखर’; वय वर्षे १६-२० असताना ‘शब्देन्दुशेखर’ व ‘लघुमञ्जूषा’ यातील महत्त्वाचे भाग; वय वर्षे २०-२३ असताना ‘तैत्तिरीय संहिता’ व ‘ब्राह्मण’ व सोबत ‘काव्यप्रकाश’, ‘पञ्चदशी’, ‘वेदान्तपरिभाषा’, ‘ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्य — अध्यापन’; वय वर्षे २३-२४ असताना ‘अद्वैतसिद्धि’ (पञ्चभङ्गी) व सोबत ‘अध्यापन-लेखन तत्त्वादर्श’ (परिभाषेन्दुशेखर टीका) व ‘गूढार्थप्रकाश’ (लघुशब्देन्दुशेखर टीका), अशा रितीने वयाच्या आठ ते वीस वर्षांपर्यंत वासुदेवशास्त्र्यांनी व्याकरणाच्या सर्व आकार ग्रंथांचे अध्ययन पूर्ण केलेव त्याचबरोबर त्याला पूरक अशा अन्य शास्त्रांतील ग्रंथांचेही अध्ययन केले.

ते १८९२ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले व १९२८ मध्ये निवृत्त होईपर्यंत ३६ वर्षे त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात ज्ञानदानाचे काम केले. वस्तुतः, वयाची ५५ वर्षे पूर्ण हे तेव्हा भारतातील सेवानिवृत्तीचे वय होते; तथापि वासुदेवशास्त्री वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत फर्ग्युसनमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक होते. फर्ग्युसनमधील नोकरीप्रमाणेच संस्कृत पाठशाळेमध्ये त्यांनी ५२ वर्षे अध्यापनाचे काम केले. या कालावधीमध्ये व निवृत्तीनंतरही त्यांनी ‘व्याकरण’, ‘अद्वैतवेदान्त’, ‘विशिष्टाद्वैतवेदान्त’, ‘योगशास्त्र’, ‘अलंकारशास्त्र’, ‘धर्मशास्त्र’, ‘दर्शने’, ‘न्यायशास्त्र’, ‘मीमांसाशास्त्र’ या शाखांमध्ये विपुल लेखन केले. त्यांचे सुमारे ६,००० मुद्रित पृष्ठांचेे एकंदर पंचवीस ग्रंथ उपलब्ध आहेत. यांपैकी विशेष उल्लेख करण्यासारखा ग्रंथ म्हणजे पतंजलीच्या संपूर्ण व्याकरण महाभाष्याचा (आठ अध्याय) मराठी अनुवाद. आजपर्यंत कोणत्याही भारतीय किंवा परदेशी भाषेत या व्याकरण महाभाष्याचे संपूर्ण भाषांतर उपलब्ध नाही.

वासुदेवशास्त्र्यांना १९२१ मध्ये ब्रिटिश सरकारकडून अत्यंत मानाची अशी ‘महामहोपाध्याय’ ही पदवी मिळाली. भारतामध्ये ही असामान्य पदवी शास्त्रीय ग्रंथ निर्माण करणाऱ्या, त्यांचे अध्यापन करणाऱ्या किंवा ही दोन्ही प्रकारची कामगिरी करणार्‍ऱ्या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या पंडितास आचार्यपीठाकडून अथवा राज्यकर्त्यांकडून देण्याची परंपरा अनेक शतके चालू आहे. अशा प्रकारे वासुदेवशास्त्र्यांनी आजन्म अध्ययन-अध्यापनाचे कार्य केले व सुमारे ७९ वर्षांचे कृतार्थ आयुष्य व्यतीत करून हा ज्ञानयोगी शिवस्वरूपी विलीन झाला.

संदर्भ :

१.    डॉ. सहस्रबुद्धे स.वि.; प्रा. साठे म.दा.; ‘महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर : चरित्र व कार्य’; म.म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर जन्मशताब्दी महोत्सव समिती, पुणे ३०; १९६३.