वसंत नरहर फेणे
वसंत नरहर फेणे (जन्म : जोगेश्वरी-मुंबई, २८ एप्रिल, इ.स. १९२६; - खार-मुंबई, ६ मार्च, २०१८) हे एक मराठी साहित्यिक होते..
फेणे यांचा जन्म मुंबईतल्या जोगेश्वरी भागात आणि बालपण कारवारमध्ये गेले. त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षी त्यांचे वडील वारले. त्यानंतर त्यांच्यासह भावंडांना घेऊन आई कारवारला गेली. तिथल्या मराठी प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ते मोठ्या भावाबरोबर साताऱ्याला आले आणि तिथून वर्षभरातच पुन्हा कारवारला परतले. काही वर्षांनंतर त्यांनी पुढचे शिक्षण मुंबईत पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांची एक कविता- ‘भारत माझा स्वतंत्र झाला!’- १९४७ सालच्या ‘सत्यकथा’मध्ये (ऑगस्ट, १९४७) प्रकाशित झाली होती. पुढल्या कविता ‘सत्यकथे’ने नाकारल्यावर विशीतच काव्यलेखनाला कायमचा विराम मिळाला. लेखक म्हणून संवेदनशील वृत्ती असलेल्या फेणे यांनी या काळात राष्ट्रसेवादलाशी जोडून घेतले.
फेणे नोकरीसाठी पुणे, कोल्हापूर, विजापूर, नाशिक, इ. शहरात राहिले. भटकंतीच्या काळातील या अनुभवांतूनच त्यांच्यातील लेखक घडत आणि प्रगल्भ बनत गेला. दिवाळी अंकांसाठी लेखन करणारे महत्त्वाचे लेखक म्हणून वसंत नरहर फेणे यांना ओळखले जाऊ लागले. त्यांनी वयाच्या ३५व्या वर्षी लिहायला सुरुवात केली, त्यानंतर नव्वदीपर्यंत त्यांची तीस पुस्तके प्रकाशित झाली. सुरुवातीला त्यांनी दिवाळी अंकांसाठी लेखन केले. लेखनासाठी मिळणारा अल्प मोबदला. जोखीम असतानाही फेणे यांनी वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर १९७८ साली नोकरी सोडून पूर्णवेळ लेखन-वाचनाला वाहून घेतले. कादंबरी, कथा, नाटक, विनोदी लेखन, अनुवाद अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केले. त्यांचे अधिक लिखाण प्रामुख्याने कथा आणि कादंबरी या साहित्य प्रकारांमध्ये आहे.
काळ आणि मानवी समाज यांच्यातील नात्याचे बंध उलगडणे हे कथात्म साहित्याचे एक वैशिष्ट्य़ मानले जाते. मराठी कथात्म साहित्यात हे वैशिष्ट्य़ ठळकपणे ज्यांच्या साहित्यात आढळते अशांमध्ये वसंत नरहर फेणे हे प्रमुख नाव. एकोणीसशे साठोत्तरी काळात लिहिते झालेल्या फेणे यांनी गेली सुमारे पाच दशके सकस कथा-कादंबऱ्यांनी मराठी कथात्म साहित्य समृद्ध केले.
सर्वसामान्य माणसाचे अनुभवविश्व प्रत्ययकारक रीतीने फेणे यांच्या लेखनातून प्रकट होते. व्यक्तीपेक्षा समूहाला केंद्रस्थानी ठेवणारे हे लेखन मराठी साहित्यामधील प्रवृत्तीप्रवाहांच्या पलीकडे वावरणारे आहे. त्यांच्या महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये सेंट्रल बस स्टेशन, सहस्रचंद्रदर्शन, विश्वंभरे बोलविले या कादंबऱ्या तसेच देशांतर कथा, ध्वजा, हे झाड जगावेगळे, ज्याचा त्याचा क्रूस, मावळतीचे मृद्गंध, निर्वासित नाती, पहिला अध्याय, पाणसावल्यांची वसाहत, शतकान्तिका या कथासंग्रहांचा समावेश आहे.
वसंत नरहर फेणे यांची ‘कारवारी माती’ ही कादंबरी ‘ग्रंथाली’ने २ डिसेंबर २०१७ रोजी प्रकाशित केली. सहाशे पानांच्या कादंबरीसाठी काम करताना ९१ वर्षांच्या या लेखकाचा किती कस लागला असेल याचा अंदाजच केलेला बरा.
पुस्तके
संपादन- काना आणि मात्रा (कथासंग्रह, १९७२)
- कारवारची माती (कादंबरी)
- काही प्यादी काही फर्जी (कथासंग्रह)
- ज्याचा त्याचा क्रूस (कथासंग्रह)
- देशांतर कथा (कथासंग्रह)
- ध्वजा (कथा, लेख, भाषणे)
- निर्वासित नाती (कथासंग्रह)
- पंचकथाई (कथासंग्रह)
- पहिला अध्याय (कथासंग्रह)
- पाणसावल्यांची वसाहत (कथासंग्रह)
- पिता-पुत्र (कथा)
- मावळतीचे मृदगंध (कथासंग्रह)
- मुळे आणि पाळे (कथासंग्रह)
- विश्वंभरे बोलविले (कादंबरी)
- शतकान्तिका (कथासंग्रह)
- सहस्रचंद्रदर्शन (कादंबरी)
- सेन्ट्रल बस स्टेशन (कादंबरी)
- हे झाड जगावेगळे (कथासंग्रह)
पुरस्कार
संपादन- 'काना आणि मात्रा' या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार.
- ‘विश्वंभर बोलविले’ या कादंबरीसाठी ना.सी फडके पुरस्कार (इ.स. २००४)
- शब्द - द बुक गॅलरीच्या वतीने एकूण लेखकीय कारकिर्दीसाठी देण्यात येणारा भाऊ पाध्ये साहित्य गौरव शब्द पुरस्कार (मे २०१७)
बाह्य दुवे
संपादन- वसंत नरहर फेणे. लोकसत्ता (Marathi भाषेत). 12-03-2018 रोजी पाहिले.
मानवी नातेसंबंध आणि एकूणच भवतालाबद्दलचे विलक्षण कुतूहल या गुणवैशिष्टय़ांचा मिलाफ असलेला कथात्म साहित्यिक फेणे यांच्या निधनाने आपण गमावला आहे.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)