वसंत दत्तात्रेय गुर्जर

वसंत दत्तात्रेय गुर्जर (२१ जानेवारी, इ.स. १९४४:मुंबई, महाराष्ट्र - ) हे एक मराठी कवी आहेत. त्यांचे शिक्षण गिरगावातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये झाले. एकोणीसशे साठ साली शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन गुर्जर यांचे रूपारेल व सिद्धार्थ महाविद्यालयातून इंटर आर्ट्‌सपर्यंत शिक्षण झाले. ते बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या कार्यालयात लिपिक म्हणून नोकरीला लागले. त्यांनी इ.स. १९५७पासून कविता लिहायला सुरुवात केली. एकोणीसशे साठ-सत्तरच्या दशकातल्या अनियतकालिकांच्या चळवळीतील ते ए कवी आहेत.

पुस्तकेसंपादन करा

  • अरण्य (कवितासंग्रह, १९७३)
  • एक. गोदी (कवितासंग्रह, १९६७)
  • गांधी मला भेटला (पोस्टर कविता, १९८३)
  • निव्वळ (कवितासंग्रह, १९७०)

गांधी मला भेटलासंपादन करा

गुर्जरांची ही पोस्टर कविता १९८३ साली प्रथम प्रकाशित झाली. त्यानंतर ती ऑल इंडिया बँक असोसिएशनच्या द्वैमासिकात जुलै-ऑगस्ट १९९४ मध्ये प्रसिद्ध झाली. वसंत दत्तात्रेय गुर्जर यांनी या कवितेत सामाजिक, राजकीय स्थितीवर विडंबनात्मक भाष्य केले आहे. स्वतः वसंत गुर्जर यांनी, 'मी कवितेत जे काही म्हटलेय ते गांधींसंदर्भात नाही, तर गांधींच्या पश्चात सगळ्याच पातळ्यांवर भारताचे जे अवमूल्यन झालेय, त्यावर आहे', अशी भूमिका मांडली होती. गुर्जर आणि कविता प्रसिद्ध करणार्‍यांविरोधात पतित पावन संघटनेने याचिका दाखल करून राष्ट्रपिता असलेल्या गांधीजींचा अपमान झाल्याचा, आरोप केला. खटला सुप्रीम कोर्टापर्यंत गेला शेवटी या कवितेबाबत सुप्रीम कोर्टाने टिप्पणी करताना, 'अभिव्यक्तिस्वातंत्र्य, उच्चारस्वातंत्र्य यांनाही सभ्यतेची चौकट लागू आहे. गांधीजींसारख्या ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्वाच्या संदर्भात असभ्य भाषेचा वापर कुणालाही करता येणार नाही', असे म्हटले. कोर्टाने कवितेवर बंदी कायम ठेवली, पण कवीने आणि प्रकाशकाने आधीच माफी मागितली असल्याने त्यांना सजा दिली नाही.