वडार

(वडार समाज या पानावरून पुनर्निर्देशित)

वडार हा भारताच्या महाराष्ट्र,आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओरिसा आणि या राज्यांत राहणारा एक समाज आहे. वड्डर समाजालाच वड्ड, वडार असेही म्हणले जाते. ही हिंदु धर्मातील मूळची क्षत्रिय जमात आहे. ओड किंवा ओड्र (Od किंवा Odra) या शब्दाचा अपभ्रंश होऊन वडार हा शब्द अस्तित्वात आला आहे. ओड्र या शब्दाचे मूळ शोधणे फार कठीण आहे. संस्कृत शब्द उंड पासून उंड्र नंतर ओड्र हा शब्द तयार झाला व पुढे  ओड्र पासून ओड-ओढ-वड्ड-वडार असा विस्तार होत गेला, असा एक विचार प्रवाह आढळून येतो.

संस्कृतमध्ये उंड म्हणजे जमीन, भूमी तसेच पृथ्वी असा होतो. उंड चा उंड्र असा उपयोग होतानाचा अर्थ रज किंवा धूळ असा होतो. सेटलमेंट अधिकारी कॅप्टन वॉर्ड हे गोंड या जमातीच्या नावाचा अर्थ सांगताना, संस्कृत मधील ‘गो’ आणि ‘उंड’ या दोन शब्दांपासून गोंड हा शब्द बनला आहे असे नमूद करतात. त्यांच्या मते गोंड म्हणजे पृथ्वी अथवा शरीर असून, शब्दाचा ’जमिनीवरील समाज’ (भूमिपुत्र) असा मथितार्थ आहे. उंड्र या शब्दाच्या पर्यायाने विचार करता उडून आलेली धूळ असा म्हणजेच स्थलांतरित भूमिपुत्र असा घेता येऊ शकेल.

ओरिसा या राज्याच्या नांवाची उत्पत्ती ओड्र विषय (Odra-Vishaya)/ओड्रदेश या संस्कृत शब्दांपासून झालेली आहे. ओडवंशीय राजा ओड्र  याने ओरिसा हे राज्य वसविले. पाली आणि संस्कृत भाषेत ओड्र लोकांचा उल्लेख क्रमशः ओद्दाक आणि ओड्रच्या रूपात आढळून येतो. प्लिनी आणि टोलेमीसारख्या युनानी लेखकांनी ओड्र लोकांचे वर्णन ओरेटस (Oretes) असा केला आहे. प्लिनीच्या प्राकृतिक इतिहासात ओरेटस (Oretes) लोक जेथे राहतात तेथे मलेउस (maleus) पर्वत उभा आहे. येथे युनानी शब्द ओरेटस बहुधा संस्कृतमधील ओड्र या शब्दाचे संस्करण असून, मलेअस पर्वत हा ओडिसामधील मलयागिरी आहे. महाभारतात ओड्रांचा उल्लेख पोड्र, उत्कल, मेकल, कलिंग आणि आंध्र यांच्या समवेत आढळून येतो.

वडार समाज मूर्तिकलेचा, वास्तू कलेचा व शिल्पकलेचा उपासक आहे. भारतातील एखाद्या प्राचीन देवदेवतांच्या मूर्तीत अनेक आयुधे, अलंकार इत्यादी असतात ते कोरण्याच्या मूर्ती घडवण्याचे काम हा समाज करत. प्रतिमा अथवा मूर्ती बहुदा एकसंध पाषाणातूनच कोरली जाते. ते इतके अप्रतिम असतात कि ते मूर्तीसमवेतच कोरले असे बघणाऱ्याला जाणवत नाही. ते अलंकार/आयुधे ही मूर्ती कोरल्यावर घातल्या गेलीत असे वाटते. या समाजाने आपल्या दगड फोडण्याच्या आणि कोरण्याच्या कलेतुन भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्याच अभूतपूर्व काम केले आहे.

अशिक्षित असल्या कारणाने इतिहासात या समाजाने कुठेही नोंदी करून ठेवलेल्या नाहीत. परंतु, खाणीमध्ये दगड फोडणारी व त्यावर कोरीव काम, नक्षीकाम करणारा कारागीर म्हणून या समाजाच्या अनेक नोंदी आहेत. यावरून हे स्पष्ट होते या समाजाचा खूप प्राचीन व गौरवशाली इतिहास आहे. इतिहासकारांनी त्यांच्या अज्ञानापोटी (लेखी पुराव्या अभावी) या समाजाची नोंद केवळ भटका समाज म्हणून घेतली आहे. प्राचीन भारतीय शिक्षणपद्धतीत  केवळ उच्च वर्णियांना शिक्षणाचा अधिकार होता त्यामुळे हा समाज शिक्षणापासून वंचित होता परिणामी, अज्ञान व अशिक्षितपणामुळे या समाजाला याची पुसटशीही कल्पना नव्हती.

छन्नी हातोडी चालली तरच त्यांच्या दररोजच्या रोजी रोटीची सोय होत होती, एवढेच कि काय पण जेव्हा वेरूळ येथील कैलास मंदिर हे लेणे सोडले तर बाकी सर्व लेणी या माणसांनीच कोरली आहेत. पण कैलास मंदिर कोरणे हे या माणसाच्या आवाक्या बाहेर चे काम होते . हे मंदिर कोरताना अंदाजे 400,000 टन दगड काढला गेला तोही फक्त 18 वर्षांत तोही फक्त छिन्नी आणी हातोडीने.

मंदिराचे काम हे आधी कळस मग पाया असे केले आहे. भारतातील सर्व लेणी एकतर खालून वर अथवा डोंगर फोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत फक्त हेच मंदिर नियोजनबद्धपणे कळसापासून पाया पर्यंत करण्यात आले आहे.

औरंगजेबाने हे मंदिर नष्ट करण्यासाठी 1000 माणसे लावली होती पण 3 वर्ष प्रयत्न करून सुद्धा ते फक्त थोडच नुकसान करू शकले.

मध्ययुगीन काळात विशेषतः शिवकाळात कसबा गणपती मंदिर जीर्णोद्धार, लाल महाल उभारणी राजगड व रायगडावरील बांधकामे जलदुर्गांची उभारणी या प्रकारचे स्थापत्य उभारण्याचे उल्लेख इतिहासामध्ये आहेत हिरोजी इंदुलकर हा त्या काळातील प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला. गाव वसवताना शक्यतो काटकोनात तील रस्ते कडेला दगडी बांधकाम व नदीपात्राच्या कडेला घाट अशी रचना केली जात असे पेशवेकाळात अहमदनगर विजापूर सारखी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुणे शहरात करण्यात आली, पेशव्यांनी भूमिगत छोटी छोटी धरणे बाग-बगीचे हाऊद कारंजी उभारले. पुणे शहराच्या जवळील हडपसर भागातील दिवेघाटातील मस्तानी तलाव, स्थापत्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे पुण्यातील शनिवार वाडा, विश्रामबागवाडा, नाशिकचा सरकार वाडा, कोपरगावचा रघुनाथ पेशव्यांचा वाडा, सातारकर छत्रपतींची वाडे, याशिवाय वाई मेनवली टोके श्रीगोंदे पंढरपूर येथील जुने वाडे तसेच मध्ययुगीन काळातील शिल्पकलेला एक वेगळे वैशिष्ट्य या समाजाने मिळवून दिले.

सिंधू खोरे सभ्यता भारतातील मोहेंजोदरोचे मोठे जलसाठा प्राचीन शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. दक्षिणेकडील कांचीपुरम, मदुराई, श्रीरंगम आणि रामेश्वरम आणि उत्तरेकडील वाराणसीची मंदिरे ही मंदिरे ही भारतातील भरभराट झालेल्या कलेचे एक प्रसिद्ध उदाहरण आहे.

इतकेच नाही तर मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर आणि ओरिसाच्या सूर्यमंदिरातही या नितांत कलेचा जिवंत देखावा आहे. सांची स्तूप शिल्पसुद्धा अतिशय भव्य आहे जे ईसापूर्व तिसऱ्या शतकातील आहे. तसेच सभोवतालची जंगले (बलसट्रेड्स) आणि तोरणांचे दरवाजे सुशोभित करीत आहे. ममल्लापुरमचे मंदिर; सारनाथ संग्रहालयाची लायन कॅपिटल (जिथून भारताच्या अधिकृत सीलला अभिवादन करण्यात आले होते) ही मोरयाची मूर्ती आहे, अमरावती महात्मा बुद्धांच्या जीवनातील घटना आणि नागार्जुनघोंडाच्या स्थापत्य शिल्पांचे वर्णन करणारे इतर उदाहरण आहेत.

मुंबईच्या जवळ असलेल्या एलिफंटा लेण्यांमध्ये हिंदू गुहेच्या स्थापत्य वास्तूचा कळस दिसतो आणि त्याचप्रमाणे एलोराच्या हिंदू आणि जैन खडकांच्या मंदिरांमध्ये, विशेषतः आठव्या शतकातील कैलास मंदिरही या वास्तुकलेच्या रूपात पाहिले जाऊ शकते. या समाजाने आपल्या कलेतुन भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्याच अभूतपूर्व काम केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्यांची उभारणीत हिरोजी इंदलकरांचे योगदान हे सर्वश्रुत आहेच. ते स्वराजाच्या बांधकाम विभागाचे प्रमुख होते. ते ही याच समाजातील होत. उदरनिर्वाहासाठी हा समाज बांधकाम व्यवसायाशी निगडित सर्व कामे करताना आज दिसतो. काही लोक पूर्वीपासूनच विहिरी खणणे, दगड फोडणे किंवा दगडाच्या खाणी पाडणे, दगडावर कोरीव काम करणे, मुर्त्या घडवणे इत्यादी कामे करताना आढळतात.

स्कंदपुराणातील नगर विभागात आणि श्री विश्वकर्मा पुराणात कारागिरांचे वर्णन आहे, भगवान विश्वकर्मा, मनु, मे, त्वष्ठ, शिल्पी आणि देवग्या या पाच मुलांपैकी केवळ महर्षी शिल्पींचे अनुयायी/वंशज आहेत. (सध्याचे वडार).[]

वडारवाडा

संपादन

वडार समाजाचे लोक जिथे राहतात त्या वस्त्यांना वडारवाडा असे म्हणतात. महाराष्ट्रात आणि दक्षिणी भारतातील सर्व छोट्या मोठ्या गावांत बहुधा वडारवाड्या असतात. महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे, ठाणे, नांदेड, बीड, लातूर, जालना येथे या समाजाची चांगली लोकसंख्या असून हा समाज स्वतःला भगीरथाचे व बजरंगाचे पूजक म्हणवतात. त्यांची बोलीभाषा तेलुगू - कानडी मिश्रित आहे. या समाजाच्या माती वडार, दगड वडार व गाडी वडार या पोटजाती आहेत.

वडार समाजाचे योगदान व ऱ्हास

संपादन

इतिहासात संस्कृती जपण्याचे आणि ती दगडामध्ये कोरून ठेवण्याचं महत्वपूर्ण काम या समाजाने केले आहे तसेच इतर समाजाला निवारा तयार करून देण्याचं काम ही याच समाजानं केले आहे. देशातील राजे-महाराज्यांचे किल्ले, ऐतिहासिक मंदिरे, राजवाडे आणि लेण्या इत्यादी वास्तू या समाजाने उभारल्या आहेत. वडार समाज कठोर परिश्रमासाठी ओळखला जातो. भारताच्या इतिहासामध्ये या समाजाचा मोलाचा वाटा आहे.

या समाजात शिक्षणाचा अभाव, निरक्षरता, वाढती व्यसनाधीनता या कारणामुळे प्रचंड दुरावस्था जाणवते. परिणामी इतर समाजात या समाजाविषयी निर्माण झालेल्या भावना, मान-अपमान यांसारख्या गोष्टींमुळे या समाजाच्या विकासाकडे प्रचंड दुर्लक्ष झालेले दिसून येते.

इस्लामी, मुघल, युरोपीयन राज्यकर्त्यांनी या समाजाला केवळ कामगारवर्ग म्हणून पाहिले नंतर याच भावनेतून त्यांच्यावर केलेले अत्याचार आणि शोषणाला कंटाळून त्यांनी इतरत्र पळ काढला. ब्रिटिशांना व इतर राज्यकर्त्यांना पडणारा कामगार वर्गाचा तुटवडा आणि मजुर वर्गाची कमतरता भरून काढण्यासाठी या समाजाला फरार घोषित करणे, गुन्हे दाखल करणे यांसारख्या उपाय योजना राबवून त्यांना संघटित करून त्यांच्या वसाहती निर्माण करण्याचे काम इंग्रजांनी केले. यातच १८७१ च्या गुन्हेगारी कायद्यांतर्गत या समाजावर बंधने घालून या समाजाला कलनकीत करण्याचे काम ब्रिटिश राजवटीत झाले आहे. ब्रिटिशांच्या या कायद्यानुसार मुलं जन्माला येताच त्यांना गुन्हेगार घोषित केलं गेलं तरीही या कायद्याविरुद्ध कोणी आवाज उठवला नाही. एवढेच नव्हे आपला देश १९४७ स्वतंत्र झाला तरीही या समाजाकडे अथवा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध स्वतंत्र सेनानी व राज्यकर्त्यांना देखील विसर पडला होता हे आपणाला १९५० रोजी म्हणजेच ३-४ वर्षानंतर हा कायदा रद्द केला गेला यावरून हे सिद्ध होते. दुर्दैव तर आजही या समाजाचे असे आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली तरीहि हा समाज आजही इतर समाजाच्या दृष्टीने व तुलनेने दुर्लक्षितच आहे.

वडार समाजावरील पुस्तके आणि लेख

संपादन
  • वडार समाजाची आजची स्थिती
  • युगशिल्पी : मागोवा वडार जमातीचा (प्राचार्य शिवमू्र्ती भांडेकर)
  • वडार समाज परंपरा व इतिहास (वेदनाकार टी.एस.चव्हाण)
  • वडार समाज आणि संस्कृती  (सतीश पवार)
  • वडार समाज : इतिहास आणि संस्कृती (भीमराव व्यंकप्पा चव्हाण)  
  • वडार समाज : समाजशास्त्रीय अभ्यास (विनायक लष्करे)   
  • वडार समाज (दीपक पुरी)  
  • वेदना (वेदनाकार टी.एस.चव्हाण)
  • दगडखाणीतील उद्ध्वस्त आयुष्य - हणमंत कुराडे

हे सुद्धा पहा

संपादन
  1. ^ "Online Hindu Spiritual Books,Hinduism Holy Books,Hindu Religious Books,Bhagwat Gita Books India". web.archive.org. 2010-06-25. रोजी मूळ पानापासून संग्रहित25 जून 2010. 2024-02-26 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)