१७९० साली संगमनेर हे ११ परगण्यांचे (अनेक तालुके मिळून बनलेला राज्याचा एक भाग म्हणजे परगणा ) मुख्यालय होते.

त्याकाळी १८,५५,०८० रुपयांचा महसूल जमा होत होता. ११ परगणे खालीलप्रमाणे

  1. संगमनेर८,१६,६३७ रु
  2. अहमदाबाद व पतवद- ८,८३,३७३रु
  3. अकोला ६३,४४६रु
  4. बेळवा- ३५,९५५रु
  5. त्रिम्बक- ८४८२रु
  6. जाफराबाद व चांदोरी- २,५२,८६६रु
  7. दिंडोरी- ३७,६८४रु
  8. धांदरफळ- १२,८१५रु
  9. सिन्नर- २८,८९०रु
  10. नाशिक- १,६७,७६६रु
  11. वरिया- १,१७,१०३रु

ब्रिटिश सरकारने देशातील नागरिकांना स्थानिक स्तरावर सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला होता व त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील काही शहरांची निवड करून त्या शहरांच्या विकासासाठी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात संगमनेरचा समावेश होता.

संगमनेर नगरपालिका द्वार तत्कालीन मुंबई सरकारच्या १८५० च्या अ‍ॅक्‍ट २६ नुसार दिलेल्या मंजुरीपत्रात अध्यक्ष म्हणून मॅजिस्ट्रेट दरनगर इ. इ. फ्रादर टिटलर यांची, तर उपाध्यक्ष म्हणून असिस्टंट मॅजिस्ट्रेट यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून मामलेदार संगमनेर, बोहोद्दीन काझी, धिराजी सुगराम मारवाडी, रामसुख नवलराम मारवाडी, केशव रघुपती केपूरकर, बाबाजी अप्पाजी रेंगे व रामचंद्र बापूजी जोशी यांची नावे पालिकेला २५ नोव्हेंबर १८५७ रोजी पाठविलेल्या पत्रात देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी संगमनेर परिसरात सुरू असलेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या उठावांमुळे पालिकेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यास १८६० साल उजाडले होते. त्या वेळी शहरात एक हजार चारशे घरे होती व लोकसंख्या सात हजार ४९५ होती, असा तपशील उपलब्ध आहे. कॉटेज हॉस्पिटलची स्थापना १८७३ साली झाली.