लिंगराज वल्याळ हे १९७८ पासून राजकारणात सक्रिय होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांच्यावर प्रभाव होता. नीलकंठ समाजातील एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले वल्याळ हे १९८५ साली सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन समाजवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पुलोद प्रयोगात निवडून आले होते. पहिल्याच वर्षी पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. या संधीचे त्यांनी सोने करीत राजकीय वाटचाल सुरू केली असता पुढे १९८९ साली सोलापूर लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली. त्यानंतर पुढच्या वर्षी १९९० साली विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून ते प्रथमच भाजपच्या तिकिटावर निवडून आले. नंतर १९९५ सालच्या निवडणुकीत ते पुन्हा विधानसभेवर दुसऱ्यांदा निवडून गेले. काँग्रेसचा बालेकिल्ला भेदून विधानसभेवर निवडून गेलेले वल्याळ हे पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे पहिले आमदार म्हणून परिचित होते. पुढे दुसऱ्याच वर्षी १९९६ साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या. तेव्हा वल्याळ यांना सोलापुरात पक्षाची उमेदवारी मिळाली व ते निवडून आले. दरम्यान युती शासनाच्या काळात वल्याळ यांनी पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सोलापूर लोकसभा भाजपाचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे सोमवारी २२ एप्रिल २०१३ दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ६३ वर्षांचे होते. गेली दहा वर्षे ते पक्षाघाताने आजारी होते. त्यातच ह्दयविकाराचा त्रास बळावल्याने अखेर त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी ललिता, चिरंजीव नागेश, संदीप आणि कन्या शिल्पा असा परिवार आहे. सोलापुरातील नगरसेवक नागेश वल्याळ हे चिरंजीव. [१] [२]

संदर्भ

संपादन
  1. ^ "भाजपाचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे निधन". 2013-03-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. मंगळवार २३ एप्रिल २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "भाजपचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे सोलापुरात निधन". मंगळवार २३ एप्रिल २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)