रोहित देव (इ.स. १९६५ - ) हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता (ॲडव्हेकोट जनरल) आहेत.

ते २७ डिसेंबर २०१६ रोजी या पदावर श्रीहरी अणे यांच्यानंतर आले.

रोहित देव हे मूळचे नागपूरचे आहेत. त्यांनी नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी आणि डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयातून कायद्याची पदवी मिळवली. नागपूरमध्ये सुबोध धर्माधिकारी यांच्याकडे काही काळ साहाय्यक म्हणून काम केल्यानंतर देव यांनी जिल्हा तसेच उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली सुरू केली.

देव विद्यार्थीदशेत काही काळ पत्रकार म्हणून काम करत होते. आता बंद पडलेल्या नागपूरच्या एका वर्तमानपत्रात त्यांनी दोन वर्षे उपसंपादक म्हणून नोकरी केली होती. न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या प्रकरणांचा मसुदा तयार करण्यात ते तरबेज आहेत. देवेंद्र फडणवीसनितीन गडकरी या दोन्ही नेत्यांनी आघाडी सरकारच्या काळात विदर्भाच्या अनुशेष निर्मूलनाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात धाव घेतली होती, तेव्हा देव यांनीच त्यांची बाजू प्रभावीपणे मांडली होती. अनुशेषाच्या मुद्दय़ावर राज्यपालांनी दिलेले निर्देश सरकारने पाळणे बंधनकारक आहे की नाही, या मुद्द्यावरचा तत्कालीन सरकारतर्फे गुलाम वहानवटी यांनी केलेला युक्तिवाद देव यांनी खोडून काढला होता व फडणवीस आणि गडकरी हा लढा जिंकले होते.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी गैरव्यवहाराच्या आरोपावरून भाजपची सत्ता असलेली नागपूर महानगरपालिका बरखास्त केली होती. नंदलाल समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हाही देव हे फडणवीसांच्या मदतीला धावून आले व त्यांनी न्यायालयीन लढा देत बरखास्तीचा हा निर्णय कसा बेकायदेशीर आहे हे कोर्टात सिद्ध केले.

राज्याच्या विक्रीकर खात्याचे तसेच नागपूर विद्यापीठाचे विशेष वकील म्हणूनही देव यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. देव २०१४ सालापासून नागपूर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात केंद्र सरकारचे असिस्टंट सॉलिसिटर जनरल म्हणून काम बघत होते.

देव यांच्या पत्‍नी अस्मिता येथील भोसला सैनिकी शाळेत शिक्षिका असून स्वतः रोहित देव हे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे जावई आहेत. देव यांचे मोठे बंधू शिरीष देव भारतीय हवाई दलात एर मार्शल असून सध्या (डिसेंबर २०१६मध्ये) ते ईस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणून काम करीत आहेत. अरविंद बोबडे, व्ही.आर. मनोहर व अलीकडच्या काळात राजीनामा दिलेले सुनील मनोहर व श्रीहरी अणे यांच्यानंतर देव यांना हा महाधिवक्ता होण्याचा मान मिळाला आहे.