रोर्क ड्रिफ्टची लढाई
दिनांक | जानेवारी २२ - जानेवारी २३, १८७९ |
---|---|
स्थान | रोर्क ड्रिफ्ट, दक्षिण आफ्रिका |
परिणती | ब्रिटिशांचा विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
ब्रिटिश साम्राज्य | झुलू राज्य |
सेनापती | |
जॉन चार्ड व गॉनव्हिल ब्रॉमहेड | राजा डाबुलामांझी |
सैन्यबळ | |
१३९ | ४००० - ५००० |
बळी आणि नुकसान | |
१७ ठार, १४ जखमी | अंदाजे ६०० ते ७०० ठार |
रोर्क ड्रिफ्टची लढाई जानेवारी २२-२३, इ.स. १८७९ला ब्रिटिश सैन्य व झुलू योद्धे यांच्यात दक्षिण आफ्रिकेत रोर्क ड्रिफ्ट येथे झालेली लढाई होती. यात ५००० झुलू योद्ध्यांचा केवळ १०० इंग्रज-वेल्श सैनिकांनी मोठ्या धैर्याने सामना केला व लढाई जिंकली. ब्रिटिश लष्कर हे मुख्यत्वे शिस्त व उच्च दर्जाच्या शस्त्रांमु़ळे युद्ध जिंकत परंतु हे युद्ध मुख्यत्वे शौर्यावरती जिंकल्यामुळे याला ब्रिटिश इतिहासात वेगळे महत्त्व आहे. म्हणूनच सर्वाधिक ११ व्हिक्टोरिया क्रॉस या युद्धातील योद्धयांना मिळाले आहेत.
लढाई
संपादनरोर्क ड्रिफ्ट येथे छोटेसे मिशन चर्च होते. या चर्चमध्येच ब्रिटिशांनी लहानशी चौकी स्थापली होती. जखमी सैनिकांकरता लहानसे रुग्णालय, आजूबाजूच्या चौक्यांसाठी रसद व सैन्य अभियांत्रिकीची काही कामे करणारे अधिकारी व सैनिक यांच्याकरता ही चौकी बांधली होती. जानेवारी २२, १८७९ रोजी पहाटे इसांडल्वानाच्या लढाईमध्ये झुलू योद्ध्यांनी ब्रिटिशांचे शिरकाण केले व रणनीतीचा भाग म्हणून लगेचच इतर ब्रिटिश चौक्यांवर हल्ले करण्याचा डाव झुलूंनी आखला. इसांडल्वानाच्या युद्धाची खबर रोर्क ड्रिफ्ट येथील ब्रिटिश चौकीवर पोहोचली व त्याबरोबर लवकरच रोर्क ड्रिफ्टवरदेखील हल्ला होणार हे ब्रिटिशांच्या ध्यानात आले. ४००० ते ५००० झुलू सैनिकांनी रोर्क ड्रिफ्टला वेढा दिला. जखमी सैनिकांना हलवण्यासाठी वेळ नसल्याने व त्या भागात जखमी सैनिकांबरोबर माघार घेताना बचावाचे काहीच माध्यम नसल्याने चार्ड व ब्रॉमहेड यांनी चौकीतच राहून बचाव करण्याचा निर्णय घेतला.
चौकीच्या चहूबाजूंनी वाळूची पोती, दगड, विटा, हातगाड्या अश्या मिळेल त्या वस्तूंनी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या. अपेक्षेनुसार झुलू सैनिकांनी २२ जानेवारीच्या दुपारी चौकीवर आक्रमण केले. प्रथम चौकीच्या एकाबाजूने व लगेचच दुसऱ्या बाजूने त्यांनी हल्ला चढवला. इसांडल्वानाच्या लढाईमध्ये हाती लागलेल्या बंदुकादेखील झुलूंनी या आक्रमणात वापरल्या. परंतु बंदुका वापरण्याचे प्रशिक्षण नसल्याने त्यांना त्याचा फारसा फायदा उठवता आला नाही. झुलूंची भीस्त मुख्यत्वे पारंपरिक युद्धतंत्रावर होती. या युद्धतंत्रात झुलू सैन्य शत्रूपुढे मोठ्या संख्येने जमून युद्धनृत्य करायचे, जेणेकरून झुलूंची संख्या व आवेश पाहून शत्रुसैन्याची गाळण उडत असे. त्यानंतर झुलू सैन्य हळूहळू शिस्तबद्ध रितीने पुढे येत अचानक तुफानी वेगाने शत्रूवर चाल करून जायचे. झुलू सैन्याच्या या पारंपरिक युद्धतंत्रामुळे शत्रूला हल्ला करणे अवघड जात असे[१].
रोर्क ड्रिफ्टच्या लढाईतही झुलूंनी हीच रणनीती वापरली. परंतु संरक्षक भिंतीच्या अडथळ्यांमुळे त्यांचा धावून येण्याचा वेग मंदावला व या संधीचा फायदा उठवत ब्रिटिश सैनिक झुलू सैनिकांना टिपू लागले. झुलूंनी एकामागोमाग एक अश्या अनेक चाली केल्या, परंतु त्या सर्व निष्फळ ठरल्या. संरक्षक भिंतींबरोबर मृतदेहांचा खचदेखील झुलूंच्या रस्त्यात अडथळा बनू लागला. झुलूंच्या अनेक हल्ल्यांना परतवून लावल्यामुळे ब्रिटिश सैनिकांचा आत्मविश्वास वाढला. परंतु त्या संध्याकाळी झुलूंना अडथळे ओलांडून रुग्णालयात घुसण्यात यश मिळाले. रुग्णालयाला आग लागली. जखमी ब्रिटिश सैनिकही झुलूंशी झुंजण्यात सामील झाले. ब्रिटिशांनी मोठ्या प्रयत्नाने झुलूंचा हा हल्ला परतवला; परंतु त्यांच्या चौकीभोवतीच्या अनेक संरक्षक भिंतींचे नुकसान झाले होते. झुलूंनी रात्रभर आक्रमणे चालू ठेवली; पण त्यांना फारसे यश लाभले नाही. मध्यरात्रीनंतर झुलूंचे हल्ले थंडावले व पहाटेपर्यंत पूर्णपणे थांबले. सकाळ उजाडल्यावर ब्रिटिशांना झुलू सैनिक निघून गेल्याचे लक्षात आले. चौकिसभोवती मृत सैनिकांचा खच पडला होता. थोड्याच अवधीत झुलूंची एक तुकडी पुन्हा चौकीच्या दिशेने येताना दिसली,परंतु या वेळी आक्रमण न करताच झुलू सैनिक आले तसे निघून गेले. सातत्याने आक्रमणे परतवून लावावी लागल्यामुळे एव्हाना ब्रिटिश सैनिकांचाही जोश संपुष्टात आला होता. सकाळी काही वेळानंतर ब्रिटिश कुमक आली व रोर्क ड्रिफ्टची लढाई संपली.
लढाईचे वैशिष्ट्य
संपादन- या लढाईत गाजवलेल्या असामान्य शौर्यासाठी ११ व्हिक्टोरिया क्रॉस प्रदान करण्यात आले. ब्रिटिश इतिहासात आजवर एखाद्या लढाईसाठी सर्वात जास्त व्हिक्टोरिया क्रॉस मिळवण्याचा मान या लढाईला मिळाला आहे. चौकीवरील दोन्ही अधिकारी चार्ड व ब्रॉमहेड या दोघांसह इतर ९ जणांना व्हिक्टोरिया क्रॉस प्रदान करण्यात आले.
- जगभरातील युद्धेतिहासात एका बाजूच्या संख्येने कमी असलेल्या फौजेने संख्येने मोठ्या असलेल्या शत्रुसैन्याशी कडवी झुंज दिलेल्या लढायांमध्ये या लढाईचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. अशा लढायांमध्ये छोट्या सैन्याने मोठ्या सैन्यावर मात केलेल्या मोजक्या उदाहरणांपैकी रोर्क ड्रिफ्टची लढाई एक मानली जाते. या लढाईची तुलना भारतातील लोंगेवालाच्या लढाईशी केली जाते.
रूपांतर: कलाविष्कारांतील व चित्रपटांतील
संपादन१९६४ मध्ये स्टॅन्ले बेकर यांनी झुलू या चित्रपटाची निर्मिती केली. स्वतः स्टॅन्ले बेकर यांनी लेफ्टनंट चार्ड याची भूमिका रंगवली आहे.
बाह्य दुवे
संपादन- http://www.rorkesdriftvc.com/
- बॅटलफिल्ड साईट Archived 2009-02-27 at the Wayback Machine.
संदर्भ
संपादन- ^ Discovery channel Documentry on Battle of Isandlwana