रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

भारतीय गणितज्ञ व वकिलात
(रॅंग्लर परांजपे या पानावरून पुनर्निर्देशित)

रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ऊर्फ रॅंग्लर परांजपे (फेब्रुवारी १६, इ.स. १८७६: मुर्डी, महाराष्ट्र - मे ६, इ.स. १९६६; पुणे, महाराष्ट्र) हे केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रॅग्लर हा किताब पटकावणारे पहिले भारतीय. हे पेशाने गणिताचे प्राध्यापक होते. आपल्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी काही विद्यापीठांचे कुलगुरुपद, तसेच ऑस्ट्रेलियात ब्रिटिश भारताच्या वकिलातीतील उच्चायुक्तपदही भूषवले.

रघुनाथ परांजप्यांचा जन्म फेब्रुवारी १६, इ.स. १८७६ रोजी महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. ते पुरुषोत्तम आणि गोपिका याचे पुत्र होय. ते गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्य होते. इ.स. १८९४ साली पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून परांजपे यांनी बी.एससी. पदवी प्राप्त केली. तत्कालीन हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती घेऊन परांजपे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठ क्षेत्रातील सेंट जॉन्स महाविद्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी गणित विषयातील सगळ्यात कठीण 'ट्रायपॉस' परीक्षा दिली आणि ते त्या परीक्षेत प्रथम आले. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सीनियर रॅंग्लर असे म्हणतात.

इ.स. १९०२ ते इ.स. १९२७ या काळात रॅंग्लर परांजपे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. तसेच ते मुंबई विद्यापीठाचे सदस्य, पुणे नगर प्रशासनाचे सदस्यही होते. इ.स. १९२१ साली तत्कालीन मुंबई सरकारने रॅंग्लर परांजपे यांची दिवाण म्हणून नियुक्ती केली. पुढे सरकारने त्यांना शिक्षण आणि आरोग्य खात्याचे मंत्री केले. इ.स. १९२७ साली लंडनच्या इंडिया हाऊसचे कामकाज रॅंग्लर परांजपे यांच्याकडे सोपविण्यात आले. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू पद रॅंग्लर परांजपे यांनी ६ वर्षे भूषविले. त्यानंतर ऑस्ट्रेलियातल्या भारतीय वकिलातीत उच्चायुक्त म्हणून इ.स. १९४४ साली त्यांची नियुक्ती करण्यात आली. इ.स. १९५६ साली रॅंग्लर परांजपे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.

रॅंग्लर परांजपे अंधश्रद्धेचे विरोधक म्हणून ओळखले जातात. देवावर त्यांची श्रद्धा नव्हती, ते स्वतःला नास्तिक म्हणवून घेत.

इ.स. १९६५ साली एटीफोर नॉट आऊट नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी मे ६, इ.स. १९६६ रोजी वृद्धापकाळाने रॅंग्लर परांजपे यांचे पुण्यात निधन झाले.

गणितातील प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आदर्श म्हणून रॅंग्लर परांजपे यांचे तैलचित्र, फर्ग्युसन कॉलेजच्या गणित विभागात अजूनही ठेवलेले आढळते.

बाह्य दुवे

संपादन