रामदास खुशालराव डांगे
संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या मराठी शब्दकोशाचे संपादक प्राचार्य रामदास खुशालराव डांगे (जन्म : भालसी-अमरावती जिल्हा, १२ जून १९३६; - मुंबई, १ जुलै २०१४) हे परभणी शहराच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक इतिहासातील एक अविभाज्य घटक होते.
रामदास खुशालराव डांगे | |
---|---|
जन्म नाव | रामदास खुशालराव डांगे |
जन्म |
जून १२, इ.स. १९३६ भालसी-अमरावती, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
जुलै १, इ.स. २०१४ मुंबई,महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | संतसाहित्य, शिक्षण, शब्दकोश-संपादन, संत वाङ्मय-संशोधन |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | संशोधन ग्रंथ |
प्रसिद्ध साहित्यकृती | मूलपाठदीपिका ज्ञानदेवी |
प्रभावित | संत ज्ञानेश्वर |
अपत्ये | सुनील, राजेंद्र, प्रशांत |
पुरस्कार | ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार |
बालपण आणि शिक्षण
संपादनरामदास डांगे यांचे वडील वारकरी होते. त्यामुळे घरात आध्यात्मिक परंपरा असे. घरची परिस्थिती शिक्षणासाठी अतिशय प्रतिकूल असली तरी त्यांच्यातील हुशारी जोखून त्यांना अमरावतीच्या लेले मास्तरांनी मॅट्रिकपर्यंत नेले. लेले मास्तरांनी डांग्यांना शिकविले, अन्न-वस्त्राची सोय केली आणि फीसुद्धा भरली. रामदास डांगे पुढे एम.ए. पीएच.डी. झाले.
नोकरी
संपादनअमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात डांगे यांना डॉ. पंजाबराव देशमुख यांनी प्राध्यापकाची नोकरी दिली. १९६० ते १९६१ या शैक्षणिक वर्षादरम्यान ते या महाविद्यालयात कार्यरत होते. जून १९६१ मध्ये त्यांच्यासमोर वेगळा पर्याय आला. "शिशुपालवध‘ या विषयावरील पहिले जुने हस्तलिखित मिळवून, त्यावर डॉ. मा.गो. देशमुख अमरावतीत काम करीत होते. त्यांची बदली औरंगाबादला झाली. त्यांच्या भेटीसाठी डांगे औरंगाबादेत आले. साहित्यिक ग.त्र्यं. माडखोलकर यांचे चिरंजीव तेव्हा औरंगाबादेत नोकरीत असल्याने तेसुद्धा तेथे आलेले होते. तेव्हा देवगिरी महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्षपद विनायकराव पाटील यांच्याकडे होते. ते माडखोलकरांचे स्नेही. त्यातून डांग्यांसमोर औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात व्याख्यता म्हणून रुजू होण्याचा प्रस्ताव आला. तो त्यांनी स्वीकारला आणि १५ जून १९६१ रोजी रामदास डांगे "देवगिरी‘त रुजू झाले. १५ जून १९६३ रोजी त्यांना "प्रोफेसर‘पदी बढतीही मिळाली; पण १५ दिवसांतच त्यांना परभणीत शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्यपद देऊ केले गेले. त्या काळातही औरंगाबाद सोडून परभणीत येण्याचा विचार धाडसीच होता; पण ते धाडस डांग्यांनी केले आणि ते १ जुलै १९६३ रोजी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून परभणीत दाखल झाले.
१९६३ ते १९९६ दरम्यान ते शिवाजी महाविद्यालय (परभणी), संत जनाबाई महाविद्यालय (गंगाखेड), (कै.) कमलताई जामकर महिला महाविद्यालय (परभणी) येथे तब्बल ३३ वर्षे प्राचार्यपदी राहिले. गंगाखेडला त्यांनी सुरू केलेली शारदा व्याख्यानमाला मराठवाड्यात प्रसिद्ध झाली होती. परभणीत कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी केलेल्या चळवळीत १९७२ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. तरुणांना मार्गदर्शन करणे हे त्यांचे आवडीचे काम. आणीबाणीच्या काळात ते भूमिगत झाले होते. निगर्वीपणा, अजातशत्रुत्व, निस्पृहता, लोकसंग्राहकता व हजरजबाबीपणा ही त्यांची वैशिष्ट्ये होती
जून १९९६मध्ये प्राचार्य डांगे सेवानिवृत्त झाले. नोकरीच्या काळात पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे जी कामे शक्य झाली नाहीत, ती त्यांनी सेवानिवृत्तीच्या नंतर हाती घेतली. त्यांतील पहिले काम होते, 'ज्ञानेश्वरीच्या मूलपाठांचे संशोधन.‘ त्यांनी अकरा वर्षात 'श्री ज्ञानदेवी मूलपाठ दीपिका' लिहून काढली, तेही अनुदान न घेता. ज्ञानेश्वरी त्यांच्या रक्तातच होती. 'अनुदान घेऊन नादार होऊ नको' हा विनोबा भावे यांचा मंत्र त्यांनी अखेरपर्यंत पाळला. ज्ञानेश्वरीचा प्रसार व्हावा या हेतूने 'संशोधित प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी' हे पुस्तक केवळ ५० रुपयांत उपलब्ध करून दिले.
ज्ञानेश्वरीच्या मूलपाठांचे संशोधन
संपादनज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ती त्यांच्या सच्चिदानंदबाबा या शिष्याने लिहून काढली. त्यानंतरच्या शेकडो वर्षांच्या प्रवासात या ज्ञानेश्वरीच्या असंख्य प्रती लिहिल्या गेल्या. त्यातून लिहिणाऱ्याच्या योग्यतेप्रमाणे त्यांत असंख्य पाठभेद निर्माण झाले. डांग्यांनी त्यावर संशोधन करून मूळ ज्ञानेश्वरी सिद्ध करण्याचे ठरविले आणि १९९६ ते २००७ या काळात एकट्याने मेहनत करून 'श्री ज्ञानदेवी मूलपाठ दीपिका‘ लिहून काढली. हे काम सोपे नव्हते. नक्कल उतरवताना लेखक साधारण एकसारखे वाटणाऱ्या शब्दांचे घोटाळे करतो आणि त्यातून पाठभेद निर्माण होतात. भारताच्या सर्व भागांत प्रवास करून रामदास डांगे यांनी ज्ञानेश्वरीच्या ४० प्रती निवडल्या. त्यांचा अभ्यास सुरू केला.
प्रती मिळविण्याचे हे काम खूप महत्त्वाचे होते, तसेच जबाबदारीचेही. अभ्यासासाठी नेमकी कोणती प्रत मिळवायची, याचे आडाखे महत्त्वाचे होते. त्या दृष्टीने विचार करून तशी पार्श्वभूमी असलेली हस्तलिखिते त्यांनी मिळविली. त्यांचा अभ्यास सुरू केला. या आधी ज्ञानेश्वरीसारख्या श्रेष्ठ ग्रंथाच्या शुद्धीचे अनेक प्रयत्न झाले होते, पण मूळ प्रतीच निवडताना त्या सदोष निवडल्या गेल्यामुळे प्रमाण प्रत समोर आली नाही. डांग्यांना १९०७मध्ये मुंबईत माडगावकरांनी प्रसिद्ध केलेली प्रत महत्त्वाची वाटली. प्रा. हर्षे, प्रा. बनहट्टी यांनी केलेले काम अपूर्ण राहिले होते, पण ते चांगले काम होते. प्राचार्य डांग्यांनी काही हस्तलिखिते मिळविली. या पोथ्यांसाठी ते दोन वर्षे भारतभर फिरले. एक प्रत तर त्यांना अंदमानातून मिळाली.
मराठी शब्दकोश
संपादनतर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रेरणेतून सन १९७० च्या सुमारास सुरू झालेले मराठी शब्दकोशाचे काम रामदास डांगे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय, राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्यामुळेच महाराष्ट्र शासनाने घेतला. या आधी हे काम सुमारे २० वर्षे थांबून राहिले होते. या कामासाठी सन २००७मध्ये डांगे पुण्यात आले.
दोन दशके बंद असलेले काम करताना ते पुन्हा पहिल्यापासूनच सुरू करावे लागते. काळानुरूप भाषा बदललेली असते, नव्या भाषेतील शब्द आपल्या भाषेत आलेले असतात. या सर्वांचा धांडोळा घेत हे काम पूर्ण करावे लागते. डोंगराएवढे हे काम सन २००७ ते २०१४ या काळात रामदास डांगे यांच्या नेतृत्वाखाली नेटाने सात वर्षात पूर्ण करण्यात आले. प्राचार्य डांगे यांनी आयुष्यभर आपले काम प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक केले.
डांगे यांच्याकडे 'व्युत्पत्ती कोशा‘चे व संतकवी दासोपंतविरचित गीतार्णवाच्या शब्दकोशाचे काम राज्य मराठी विकास संस्थेने सोपविले होते, पण ते त्यांना पूर्ण करता आले नाही; त्यापूर्वीच १ जुलै २०१४ रोजी त्यांचे निधन झाले.
प्राचार्य रामदास डांगे यांनी लिहिलेली पुस्तके
संपादन- मूलपाठदीपिका ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरीचा चिकित्सक, संशोधनात्मक दोन खंडांतील ग्रंथ. सत्तरपेक्षा जास्त हस्तलिखिते मिळवून तौलनिक चिकित्सेने सिद्ध केलेला ग्रंथ)
- देशीकार लेणे (ज्ञानेश्वरीवरील पुस्तक)
- शिवशाहीतील दोन संत
- संशोधित प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी
- संत जनाबाई
डांगे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
संपादन- २००२-०३मध्ये महाराष्ट्र शासनाचा ग्रंथनिर्मिती पुरस्कार
- संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून शासनाचा पाच लाखांचा २०१२-१३ सालचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार.
- संतसाहित्यावर आकाशवाणी व इतर अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने झाली. अमरावती आणि नागपूर विद्यापीठांत संतसाहित्य संशोधनाचे परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले.
- १२ जून २०१० रोजी उल्हासदादा पवार यांच्या हस्ते, मनमाडकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून त्यांचा नागरी सत्कार झाला.