राधानाथ सिकदार
राधानाथ सिकदार (बंगाली: রাধানাথ শিকদার ; रोमन लिपी: Radhanath Sikdar ;) (इ.स. १८१३ - १७ मे इ.स. १८७०) हे एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले एक भारतीय, बंगाली गणितज्ञ होते.
जीवन
संपादनसिकदारांचा जन्म कलकत्त्यात इ.स. १८१३ साली झाला होता. त्रिकोणमिती हा त्यांचा आवडीचा विषय होता. गणितावर ते अधूनमधून लहानमोठे लेख लिहीत. तत्कालीन ब्रिटिश राज्यातील भारतीय सर्वेक्षण खात्यात ते नोकरी करीत. नोकरी करत असतानाच त्यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून गणितात पदवी मिळवली होती. सरकारी खात्यात असे करण्याची त्या काळी परवानगी नसे, अजूनही नसते. केवळ खास बाब म्हणून महाविद्यालयाचे शिक्षण घेण्यास सशर्त अनुज्ञा मिळे. त्यांची विशेष हुशारी पाहून त्यांना ही परवानगी मिळाली होती.
इ.स.१८५४ साली राधानाथ सिकदार यांनी महिलांच्या शिक्षण आणि संस्कारांसाठी बंगाली भाषेत 'मासिक पत्रिका' नावाचे एक नियतकालिक काढले होते.
हवामानविषयक काम
संपादनश्री. व्ही एन रीस हे, कलकत्ता हवामानखात्याच्या वेधशाळेचे तिच्या १८२९ मध्ये स्थापन झाल्यापासून ते स्वतः १८५२ मध्ये निवृत्त होईपर्यंत अधीक्षक होते. ही वेधशाळा त्या वेळी भारतीय सर्वेक्षण खात्याच्या प्रांगणात चालत असे. राधानाथ सिकदार हे त्या वेळी हिंदुस्थानच्या विशाल त्रिकोणमितीय सर्वेक्षणाच्या कामात प्रगणक होते.त्यांना त्यांच्या सर्वेक्षणाच्या कामाखेरीज वेधशाळीची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. राधानाथांना हे काम दिल्याबद्दल कलकत्त्यातील आघाडीच्या दैनिकांनी खुशी प्रगट केली होती. कारण राधानाथ केवळ भूमापनाच्या कामात कुशल होते म्हणून नाही, तर हवामान खात्यात इतके महत्त्वाचे पद सांभाळणारे ते पहिले भारतीय होते.
राधानाथ सिकदार हे जेव्हा भारतीय सर्वेक्षण खात्यात देहरादून येथे ऑक्टोबर १८३१ मध्ये प्रगणक या पदावर दाखल झाले, त्याही वेळेला ते त्या पदावर येणारे पहिले भारतीय होते. त्यांचे वय तेव्हा केवळ १९ वर्षे होते. हिंदू कॉलेजच्या(आता प्रेसिडेन्सी कॉलेज) प्राचार्य डॉ. टायटलर यांनी आपल्या या विद्यार्थ्याच्या गणिती ज्ञानाची आणि संशोधक वृत्तीची प्रशंसा करून त्याची शिफारस जॉर्ज एव्हरेस्ट यांच्याकडे केली होती. ते म्हणत, "भारतातल्या देशी किंवा विदेशी लोकांमधील फारच थोड्या जणांची तुलना राधानाथांच्या हुशारीशी करता येईल. अगदी युरोपातही त्यांचे गणिती ज्ञान वरच्या दर्जाचे गणले जाईल. जॉर्ज एव्हरेस्ट आणि त्यांच्यानंतर आलेले ॲन्ड्र्यू वाघ हे दोघेकही राधानाथांच्या कामावर प्रसन्न होते.
राधानाथ हे सर्वेक्षण खात्यातील अनमोल रत्न समजले जाऊ लागले. त्यांना १९५१ मध्ये मुख्य प्रगणक पदावर बढती देऊन त्यांची कलकत्त्याला बदली करण्यात आली. 'फ्रेन्ड ऑफ् इंडिया' नामक वृत्तपत्रात ११ नोव्हेंबर १८५२ रोजी "हुशार युरोपी लोकांच्या तोडीची गुणवत्ता असलेल्या आणि मोठ्या पदावर येऊन इतक्या जबाबदारीचे काम स्वीकारणाऱ्या या पहिल्या देशी माणसाचे स्वागत आहे. राधानाथ सिकदार हे नेमून दिलेल्या कामासाठी अत्याधिक योग्य आहेत हे सिद्ध करून दाखवतील अशी आमची खात्री आहे." असे छापून आले होते.
राधानाथांनी आल्याआल्या, वायुभारमापकावर घेतलेल्या हवेच्या दाबाच्या आकड्याचे शून्य अंश सेल्शियस तापमानासाठी रूपांतरण करण्याकरिता एक गणिती सूत्र शोधून काढले. तापमानातील चढ-उतारामुळे होणारे पाऱ्याचे आकुंचन-प्रसरण व ज्या पितळी पट्टीवर हवेच्या दाबाचे वाचन होते, तिचे आकुंचन-प्रसरण या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन हे सूत्र तयार केले होते.सिकदारांचे हे सूत्र अतिशय मोलाचे होते, कारण आता दोन वेगवेगळ्या गांवी आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी घेतलेल्या वायुभारांची तुलना करणे शक्य होणार होते. राधानाथ सिकदारांच्या सूत्रावरील लेख बंगालच्या एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये इ.स.१८५२ साली(खंड-२१, अंकक्रमांक-४, पाने ३२९ ते३३२) प्रकाशित झाला.
१८२९ पासून १८५२ पर्यांत कलकत्ता वेधशाळा हवामानाची वाचने एक साधारणपणे सूर्योदयाच्या वेळी, एक दुपारच्या वेळी आणि एक सूर्यास्ताच्या सुमारास घेत असे. वायुभारमापकाने दाखवलेला वायुभार कोणत्याही दुरुस्त्या न करता नोंदला जाई. राधानाथ सिकदारांनी दिवसाच्या निश्चित वेळी हवामानाच्या त्यावर केलेल्या दुरुस्त्यांसकटच्या अचूक नोंदी ठेवून, त्या बंगालच्या एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये इ.स.१८५२ पासून ते १८७७ पर्यंत अखंडपणे प्रकाशित करवल्या. हा विदा कलकत्त्याच्या हवामानाविषयक माहितीचा अमूल्य ठेवा आहे.
राधानाथ सिकदार हे बंगालच्या एशियाटिक सोसायटीचे १८५३ मध्ये सभासद झाले. त्यांना हवामान आणि भौतिक शास्त्राच्या समितीवर इ.स. १८५८ मध्ये घेण्यात आले. राधानाथ सिकदारांनी सूर्य आणि रात्री दिसणारे तारे यांच्या निरीक्षणावर आधारलेली दिवसाची सेकंदाच्या अल्पांशापर्यंत अचूक अशी वेळ समुद्रातील आगबोटींना इशारे देऊन कळवण्यासाठी एक संकेताप्रणाली स्थापित केली होती. ती इ.स. १८५३ पासून अंमलात आली.
सर्वेक्षणविषयक कामगिरी
संपादनतत्कालीन ब्रिटिश सरकारने हिमालयाच्या शिखरांची उंची मोजण्यासाठी भूगोलतज्ज्ञ आणि गणिती यांचा एक गट नेमला होता. त्या प्रकल्पाचे नाव 'द ग्रेट ट्रिगनॉमेट्रिक सर्व्हे' (विशाल त्रिकोणमितीय सर्वेक्षण) असे होते. राधानाथ त्या गटातले एकमेव भारतीय होते. सर्वेक्षणानंतर राधानाथ सिकदार यांनी सिद्ध केले की हिमालयाचे १५ वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे, आणि त्याची समुद्रसपाटीपासून उंची २९००२ फूट इतकी आहे. या कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथांचा गौरव केला होता. त्या वेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख(सर्व्हेयर जनरल) ॲन्ड्र्यू वॉ होते. त्यांनी आपल्या इ.स.१८४३ मध्ये निवृत्त झालेल्या साहेबाचे, म्हणजे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.१८६५ पासून माउंट एव्हरेस्ट म्हणू लागले.
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या अमदानीत शिखराचे नाव बलून माउंट सिकदार असे करावे असे ठरवले होते. पण पुढे हा प्रस्ताव बारगळला. नंतरच्या सरकारांनीही पाठपुरावा न केल्याने सिकदार हे नाव अनेकांना अज्ञात राहिले.
मद्रासमध्ये इ.स.१८०२ मध्ये स्थापन झालेल्या 'द ट्रिग्नॉनॉमेट्रिक सर्व्हे' या प्रकल्पाच्या द्विशताब्दीच्या निमित्ताने भारत सरकारने पोस्ट खात्यातर्फे एक तिकीट २७ जून २००४ रोजी काढले होते. त्या तिकिटावर राधानाथ सिकदार आणि तेनसिंग यांची चित्रे होती.
पुढे राधानाथ सिकदार यांनी 'ग्रेट आर्क' नावाच्या प्रकल्पातही भाग घेतला होता. भारतीय उपखंडाचे पद्धतशीर स्थलवर्णात्मक समन्वेषण (टोपोग्राफिकल एक्सप्लोरेशन) आणि त्याची तिथिवार नोंद हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट होते. याही प्रकल्पाच्या समाप्तीनंतर ब्रिटिश सरकारने राधानाथ सिकदार यांचा गौरव केला होता. गणिताचे मूलभूत ज्ञान आणि समन्वेषणात्मक (अर्थात टोपोग्राफिकल) दृष्टी यांचा राष्ट्रीय स्तरावर कसा उपयोग होऊ शकतो याचे राधानाथ सिकदार हे उत्तम उदाहरण आहे.
राधानाथ सिकदार यांचे १७ मे इ.स. १८७० रोजी निधन झाले.