राजापूर ,म्हाळुंगी नदीच्या पश्चिमेस वसलेले गाव.संगमनेरपासून अंतर ४ कि.मी.गावावर डाव्या विचाराचा प्रभाव पहिल्यापासूनच मोठा आहे.इथला विडी कामगार राजकीयदृष्ट्या जागरुक आणि चळवळीत नेहमीच आघाडीवर.कुणीही हादरून जावं अशी एक घटना १९५० मध्ये या गावात घडली.पण गाव हादरलं नाही.इथले कम्युनिस्ट दबले नाहीत. साल १९५० मार्च महिन्यातल्या ९ तारखेची सकाळ.अजून सुर्योदय व्हायचा होता.लोक नेहमीप्रमाणे उठून बाहेर पडले पण त्यांना रोखण्यात आले.सर्वत्र पोलीस उभे.गावाची नाके बंदी केलेली.गावातल्या माणसांनी बाहेर जायचे नाही आणि बाहेरच्यांनी गावात यायचे नाही.सर्व मुख्य रस्ते अडवलेले.गावाभोवती पोलिसांचा गराडा.सर्व हत्यारबंद.सोबतीला एस्.आर.पी.आणि होमग‍ार्डसुद्धा.२ इन्स्पेक्टर्स् ,६ सब इन्स्पेक्टर्स्,६० सशस्त्र पोलीस व तितकेच होमगार्ड यांनी गावाला घेरलेले.घराघरात शिरून लोकांची धरपकड सुरू होती.लोक संतप्त झाले.गोळीबाराच्या फैरी पोलीस‍ांनी झाडल्या.चार तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची पार्श्वभूमी अशी होती कि,कम्युनिस्ट पक्षावर सरकारने बंदी घातलेली होती.अनेज कार्यकर्ते भूमिगत झाले होते.काही अटकेत होते.त्याच काळात सक्तीच्या लेव्हीमुळे शेतक-यांमध्ये असंतोष निर्माण झालेला होता.शेतक-यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाने राजापूरला " जिल्हा किसान परिषद " आयोजित केली होती.महिनाभर आधी जिल्ह्यात प्रचार केला होता.९ मार्च १९५० रोजी दुपारी १ वाजता ही परिषदेची वेळही आधीच ठरलेली होती. पण आधीच्या दिवसापर्यत सरकारने परिषदेवरना बंदी घातलीना कुठलेही वॉरंट कार्यकर्त्यांवर बजावले होते.कलम१४४ ही बजावले नव्हते.इन्स्पेक्टर कुलकर्णी यांनी ९ तारखेच्या पहाटेच गावावर छापा टाकला.प्रमुख रस्त्यांची नाकेबंदी करून गावाला वेढा घातला. पहिली अटक झाली विष्णू भिवाजी हासे यांना.तबाजी कानवडे यांनाही राहत्या घरीच अटक केली.त्यानंतर गोपीनाथ सोनवणे आणि कारभारी खतोडे यांना पकडले.या सर्वाना शाळेत आणून पहा-यात ठेवले.त्यावेळी शाळेची एकच खोली होती.त्यानंतर परिषदेला जे प्रतिनिधी आले होते,त्यांच्याकडे पोलिसांनी मोर्चा वळविला.ते ज्या घरात झोपलेले होते,तिथून त्यांना उठवून पोलीस पहा-यात शाळेकडे आणले जात होते.या प्रतिनिधींनी "लालबावटे की जय ","बंद करा, बंद करा,सक्तीची लेव्ही बंद करा " अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.काय झाले म्हणून पाहण्यासाठी गाव जमू लागला.आता चांगले उजाडले होते.७०० ते ८०० लोक शाळेसमोरच्या पटांगणात जमले.त्यात वृद्ध ,तरुण,लहान मुले आणि स्त्रिया सर्वच होते. तितक्यात "चायल" नावाच्या होमगार्ड कमांडरने कुणालातरी लाठीचा प्रसाद दिला आणि जमाव खवळला.स्त्रियांमधून लहानबाई व हौसाबाई पुढे सरसावल्या.त्यांनी चायलच्या तोंडात लगावल्या.मग बाकीच्यांनीही चायलचे प्रचंड हाल केले.लोक आक्रमक बनले व पोलिसांच्या बंदुका तसेच होमगार्डच्या लाठ्या हिसकायला सुरुवात केली. पोलिसांनी लोकांवर गोळीबार करायला सुरुवात केली.१० मिनिटे गोळीबार चालला.२२ गोळ्या झाडल्या.त्यात चार तरुण ठार झाले.त्यापैकी सखाराम बगाजी हासे हा पोलिसांचा खबरी होता असे म्हणले जाते.त्याला मुद्दाम मारले की ,योगायोगाने गोळी लागली हे समजू शकले नाही.उरलेल्या तीन प्रतिनिधीपैकी कारभारी रभाजी कदम (राजापूर),मुरलीधर गजानन गोलेकर (खर्डे,तालुका जामखेड) आणि मारुती गायकवाड(अहमदनगर) हे तिघेही तरुण कार्यकर्ते गोळ्यांना बळी पडले. या गडबडीत ज्यांना शाळेत आणून बसविले होते त्यापैकी काही फरारी झाले.मग ३०-३२ लोकांना पकडून मालमोटारीत घातले.गोळ्यांनी गंभीर झालेल्यांनाही त्याच मोटारीत टाकले.त्यापैकी दोघेजण जागेवरच मरण पावले होते.पण पोलिसांनी त्यांना पाणी सुद्धा दिले नाही.असे अडीच ते तीन तास गेले.सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये नेले.लाठीमार केला.वृद्ध व बायकांनाही बदडण्यात आले.घरात शिरून मारहाण करण्यात आली.दुपारनंतर भीतीने गाव जवळजवळ आेस पडले होते. घटनेची हकिकत सर्वत्र पसरली.अहमदनगरहून भापकर,भाई सथ्था,राम निसळ तर पुण्याहून तुळशीदास जाधव,बाबुराव जेधे,ज्ञानोबा जाधव ही मंडळी चौकशी करून गेली.अण्णासाहेब शिंदे,भाऊसाहेब थोरात,रामभाऊ नागरेही आले. बापूसाहेब भापकरांनी विधानसभेत त्यावर सरकारला धारेवर धरले.भाई सथ्था इन्कलाब साप्ताहिकाच्या १७ मार्च १९५० च्या अग्रलेखाच्या अंकात जागा कोरी सोडून राजापूर शेतकरी स्त्री-पुरुषांच्या रक्तपाताच्या घटनेचा निषेध केला.अटक केलेले तीन वृद्ध आणि चार स्त्रिया यांना निकालाच्या दिवशी सोडून देण्यात आले.४ मुलांना साडेचार महिन्यांची शिक्षा दिली.उरलेल्यांना ९ महिने सक्त मजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा झाली.पुढे दंड माफ झाला आणि २८ फेब्रुवारी १९५१ला सर्वांची सुटका झाली. अटक झालेल्यांपैकी लहानबाई म्हणाल्या," मी चायलच्या थोबाडीत मारली.मलाही पाठीवर खूप मारले.अटक झाली तरी मी घाबरले नाही.आपण जराही चूक केली असेही वाटले नाही.सुटल्यावर कुणी कौतुकही केले नाही.सर्वजण सुटून झाल्यावर पक्षाची वाताहत झाली.पण सर्वांची पक्षावरील निष्ठा अभंग होती.आजही आहे." नंतर गावात ग्रामपंचायत स्थापन झाली.दरम्यान विडी मालकांनी ३ वर्षे कारखाने बंद केले.सरकारने माणसी २५ रुपये दंड बसवून सक्तीने वसूल केला.पण गावाने तो परत मिळविला.सहाणे मास्तर ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी झाले.त्यांनी पुढाकार घेऊन शाळेच्या खोल्या बांधल्या आणि जेथे गोळीबार झाला तेथे हुतात्मा झालेल्या तिघांचे स्मारक उभारले.