रचनावाद (कन्स्ट्रक्टिव्हिझम). विसाव्या शतकाच्या प्रारंभी रशियामध्ये उगम पावलेला एक आधुनिक कलासंप्रदाय. निसर्गसृष्टीच्या वा कोणत्याही नैसर्गिक जैव घटकाच्या आविष्काराची कल्पना पूर्णपणे अव्हेरून, केवल अमूर्ततावादी रचनेचेच ठाम समर्थन करणारी भूमिका या पंथाने मांडली. विशुद्ध, केवल आकारवादी कला व त्यातून एक प्रकारची नवी वास्तवता निर्माण करण्याची या पंथाच्या कलावंतांची आकांक्षा होती. त्यांची प्रारंभीची निर्मिती सकृतदर्शनी यंत्रसदृश किंवा यांत्रिक उपकरणांशी साधर्म्य दर्शवणारी होती. धातू, तारा, प्लॅस्टिक, काच, ‘पर्स्पेक्स’ (ॲक्रिलिक प्लॅस्टिक) यांसारख्या यंत्रोद्योगांशी संबंधित साधनसामग्रीचा, तसेच वितळजोडीसारख्या (वेल्डिंग) यांत्रिक प्रक्रियांचा वापर करून या पंथाच्या शिल्पकारांनी आपली अमूर्त, भौमितिक आकारांची ‘रचनाशिल्पे’ (कन्स्ट्रक्शन) घडवली.

संप्रदाया

संपादन

रचनावादातील वरवरचा यांत्रिकपणा पुढे कमी होत गेला व विशुद्ध आकारनिर्मितीच्या दिशेने त्याची जडणघडण होत गेली. व्ह्‌लादिमीर टॅटलीन (१८८५-१९५३) हा या संप्रदायाचा मुख्य प्रर्वतक होय. हा मुळात चित्रकार होता पण पुढे तो शिल्पकलेकडे वळला. त्याने मॉस्कोमध्ये १९१३ मध्ये रचनावादी पंथाची स्थापना केली. घनवादी व नवकालवादी कलातत्त्वांचा त्याच्यावर प्रभाव होता. सुरुवातीला त्याने विविध अमूर्त आकारांची अधांतरी टांगती (हँगिंग) व उत्थित रचनाशिल्पे घडवली. नंतर तो वास्तू व स्थापत्य प्रकल्पांकडे वळला. उदा., ‘थर्ड इंटरनॅशनल’ प्रदर्शनातील स्मारकाचा प्रकल्प : हा सु. ३९६·२४ मी. (१,३०० फुट) उंच व प्रति-वलयी (काउंटर-रोटेटिंग) छेद असलेला एक कलता, नागमोडी स्तंभ होता. कझ्यीम्यीर मल्येव्ह्यिच (१८७८-१९३५) या चित्रकाराची अमूर्त भौमितिक आकारांतील अधिघनवादी (सुप्रमॅटिस्ट) चित्रे रचनावादी पंथातच गणली जातात. या संप्रदायातील प्रारंभीची मल्येव्ह्यिच आणि टॅटलीन यांची निर्मिती वास्तुकल्पांचा आभास निर्माण करणारी होती. या पंथाच्या शिल्पकारांची रचनाशिल्पे व वास्तुकारांच्या वास्तुरचना यांत एक घनिष्ठ जवळीक दिसून येते. त्यांत फरक इतकाच की, शिल्पकाराच्या रचना प्रत्यक्ष वास्तुरूपात साकार होण्याच्या-म्हणजेच व्यावहारिक उपयोजनाच्या-बंधनात जखडलेल्या नसल्याने त्या सौंदर्यदृष्ट्या अधिक विशुद्ध रूपात अवतरू शकतात. पुढे अँटवान प्येव्हस्‌न्यर (१८८६-१९६२) व त्याचा बंधू नायूम गाब (१८९० – ) हे चित्र-शिल्पकार त्यांच्या मॉस्कोमधील वास्तव्यात (१९१७) या पंथात सामील झाले. १९२० नंतर राजकीय कारणास्तव रशियामध्ये या पंथाचा प्रभाव ओसरला व त्याचे दोन गटांत विभाजन झाले : पहिल्या गटातील टॅटलीन, रोट्‌चिंको आणि त्यांच्या अनुयायांनी कनिष्ठ व व्यवहारोपयोगी कलाप्रकारांकडे आपला मोहरा वळवला. त्यांनी औद्योगिक आकृतिबंध, फर्निचर-प्रकार, वास्तुकला, चित्रपट, रंगभूमी, मुद्रणकला, भित्तिपत्रे आदी प्रकारांत निर्मिती केली. दुसरा गट गाब व प्येव्हस्‌न्यर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला. १९२० मध्ये रचनावादी पंथाच्या भव्य प्रदर्शनाच्या सुमारास त्यांनी आपला ‘वास्तववादी’ जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात आधीच्या रचनावाद्यांच्या कलेतील व्यावहारिक उद्दिष्टांवर त्यांनी टीका केली व विशुद्ध कलेचा पाठपुरावा केला. कलेमध्ये केवळ घनत्वाची (व्हॉल्यूम) नव्हे, तर अवकाशातील गतीची संकल्पना महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कालाचे यथार्थ रूप कलेमध्ये प्रकट करण्यासाठी, गतिशील घटकांचा आविष्कार कशा प्रकारे व्हावा, हे दर्शवण्यासाठी नायूम गाबने शुद्धगतिकी (कायनेटिक) शिल्पांची निर्मिती केली. गाब व प्येव्हस्‌न्यर यांनी १९२२ मध्ये रशिया सोडला. नंतर त्यांच्या प्रभावामुळे पश्चिम यूरोपमध्ये रचनावादाचा शिरकाव झाला. गाब, कंडयीन्‌स्कई व मोहॉइनॉड्य यांच्या मार्फत ⇨बौहाउस या जर्मनीतील कलाशिक्षणसंस्थेत रचनावादी तत्त्वे प्रसृत झाली व त्यामुळे विसाव्या शतकातील वास्तुकला व आकृतिबंध यांवर त्यांचा मोठाच प्रभाव पडला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अनेक शिल्पकारांनी कमीअधिक प्रमाणात रचनावादाचा स्वीकार केला. या प्रणालीतील सर्वांत प्रभावी अमेरिकन शिल्पकार म्हणजे अलेक्झांडर कॉल्डर (१८९८ – ) आणि रिचर्ड लिपोल्ड. कॉल्डरची अमूर्त स्थिरशिल्पे व चलशिल्पे (मोबाइल्स) या संदर्भात उल्लेखनीय आहेत. तसेच लिपोल्डची सूर्य व चंद्र शिल्पे प्रभावी आहेत.