रंग भारवाद
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
रंग भारवाद (फॉव्हिझम). फ्रेंच चित्रकलाक्षेत्रातील, विसाव्या शतकाच्या प्रारंभीचा, रंगांवर विशेष भर देणारा संप्रदाय. पॅरिस येथील १९०५ च्या ‘सालाँ द ओतॉन’ या प्रदर्शनातील एका चित्रकारगटास उद्देशून लुई व्हाक्सेल्स या कलासमीक्षकाने, या चित्रांतील उग्र आणि आक्रमक वाटणाऱ्या रंगसंगती पाहून त्यांना ‘फॉव्ह्ज’ (जंगली श्वापदे या अर्थाचा फ्रेंच शब्द) ही संज्ञा वापरली आणि तीच पुढे या संप्रदायाला रूढ झाली. ⇨आंरी मातीस (१८६९−१९५४) हा या संप्रदायाचा प्रवर्तक व प्रमुख चित्रकार होता. या पंथाच्या चित्रकारांनी चित्रकलेतील रंग हा घटक हेच केवळ आपल्या भावप्रकटीकरणाचे एकमेव साधन मानले व रंगाचे अभिव्यक्तिसामर्थ्य जास्तीत जास्त जोपासले. रंगाचे स्वायत्त मूल्य व भावनिक गुणधर्म यांवरच त्यांनी भर दिला.
त्यांनी चित्रफलकावर रंगांची स्वच्छंद आणि मुक्त उधळण करून जणू रंगांचा स्फोट घडवून आणला. मातीसची द ओपन विंडो (१९०५ पहा : मराठी विश्वकोश : खंड १३ चित्रपत्र ४२), स्टिल लाइफ विथ रेड कार्पेट (१९०६), द जॉय ऑफ लाइफ (१९०६), द ग्रीन स्ट्राइप (१९०५ पहा : मराठी विश्वकोश : खंड ७ चित्रपत्र ४१) इ. चित्रे ही या संप्रदायाची उत्कृष्ट उदाहरणे होत. मातीसखेरीज आंद्रे दरँ (१८८०-१९५४), मोअरिस द व्ह्लामँक (१८७६−१९५८), राऊल दफी (१८७७−१९५३) इ. या संप्रदायाचे अन्य चित्रकार होत. चित्रकलेत रंगाची, पर्यायाने रंगद्रव्याची विशुद्धता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी रंगमिश्रण न करता सरळ रंगनळीतून शुद्ध रंग वापरून चित्रे रंगवली. व्हान गॉखच्या भावप्रक्षोभक रंगलेपन शैलीचा दाट प्रभाव या चित्रकारांवर होता. त्यांच्या चित्रांतून उग्र-आक्रमक व भावप्रक्षोभक चमकदार व झगमगीत आल्हाददायक व मनमोहक असे रंगसंगतीचे नानाविध आविष्कार पहावयास मिळतात. मात्र या पंथाची बंडखोरी फक्त रंगलेपनापुरतीच मर्यादित होती.
चित्रविषय व यथादर्शन यांबाबत त्यांचा दृष्टिकोण पारंपारिकच होता. त्यांच्या पूर्वसूरी दृक्प्रत्ययवादी चित्रकारांप्रमाणेच त्यांनी निसर्गदृश्ये, स्थिरवस्तुचित्रे, दैनंदिन व्यवहारात रमलेली माणसे इ. पारंपारिक धाटणीने रंगवली. हा संप्रदाय जरी अल्पावधीतच (१९०५−०८) अस्त पावला, तरी त्याचा रंगविषयक अभिनव व प्रत्ययकारी दृष्टिकोण भावी काळातील अनेक आधुनिक कलाचळवळींना प्रेरक ठरला. विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळात चित्रकलेच्या रंग या घटकात जे अनेक क्रांतिकारक बदल घडून आले, ते घडवून आणण्यात रंगभारवादी संप्रदायाचा मोठा वाटा आहे.
संदर्भ
संपादन1. Duthuit, Georges, The Fauvist Painters, New York, 1950.