योगवासिष्ठ हा संस्कृत साहित्यातील अद्वैत वेदान्तावरील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. वाल्मिकी ऋषींनी याची रचना केली असे परंपरेने मानले जाते. मात्र हे वाल्मिकी रामायणाचे रचनाकर्ते वाल्मिकी का अन्य याबाबत तज्ज्ञांत एकवाक्यता नाही. अयोध्येचे राजे श्रीराम यांना त्यांचे गुरू वसिष्ठ यांनी जे ज्ञान दिले त्यावर हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथाची रचनाही टप्प्याटप्प्याने झाल्याचे मानले जाते. एकूण ३२ हजारांवर श्लोक असलेला हा ग्रंथ सहा प्रमुख प्रकरणांमध्ये विभागला गेला आहे.

आर्य रामायण, वासिष्ठ महारामायण, मोक्षोपायसंहिता इत्यादी नावांनीही हा ग्रंथ ओळखला जातो. त्याला बृहद्योगवासिष्ठ असेही म्हणतात. कारण त्याची श्लोकसंख्या ३२ हजार इतकी प्रचंड असल्यामुळे इ. स. नवव्या शतकात काश्मीरच्या गौड अभिनंद या पंडिताने लघुयोगवासिष्ठ या नावाने सहा हजार श्लोकांत केलेला त्याचा संक्षेपही प्रसिद्ध आहे. प्रत्यक्षात मूळ ग्रंथाच्या निर्णयसागर प्रतीमध्ये बत्तीस हजार श्लोक आढळत नसून २९,२८९ इतकेच श्लोक आढळतात. या ग्रंथाचा योगवासिष्ठसार या नावाचा केवळ २२५ श्लोकांचाही एक संक्षेप आढळतो.

या ग्रंथावर आधारित अनेक ग्रंथ, संस्कृत आणि अन्य भाषांत प्रसिद्ध झाले. त्यांपैकी एक म्हणजे ’पातंजल योगसूत्रे’ - पतंजलीची योगसूत्रे. विष्णूशास्त्री बापट यांनी वाल्मिकीच्या योगवासिष्ठाचे सुबोध मराठीत भाषांतर केले आहे, तर कृ.भा. परांजपे यांचा ’पातंजली योगदर्शन : एक अभ्यास, एक शोध आणि एक चिंतन’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

अन्य रूपांतरे/भाष्ये संपादन

  • नाथ अष्टांगयोग : पातंजल योगसूत्रांचा दिव्य भावार्थ (डॉ. वृषाली पटवर्धन)
  • योगवासिष्ठ उपशम प्रकरण (श्राव्यग्रंथ, सौ. शशी म्हसकर)
  • पातंजल योगसूत्रे (योगीराज तवरिया)
  • श्री योगवासिष्ठ (दोन खंड, डाॅ. म.वि. गोखले)
  • संपूर्ण सुलभ मराठी श्री योगवासिष्ठ (मेघा कुलकर्णी )
  • सुबोध योगवासिष्ठ : श्रीवसिष्ठ राम संवाद (प्रा. सुमन महादेवकर)