यूटोपियावाद आदर्श वा सर्वसुखयुक्त सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे काल्पनिक राज्य किंवा स्थळ. यूटोपिया हे सर टॉमस मोर ह्या इंग्रज लेखकाच्या प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाचे नाव आहे. तो लॅटिन भाषेमध्ये त्याने लिहिला व १५१६ मध्ये प्रसिद्ध केला. त्यात आदर्श राज्य कसे असावे, आदर्श समाजरचना कोणत्या स्वरूपाची असावी, ह्यासंबंधीच्या त्या लेखकाच्या कल्पना त्याने विस्ताराने मांडल्या आहेत. ह्या ग्रंथनामावरूनच पुढे अशा तऱ्हेच्या कोणत्याही कल्पनाचित्रणाला यूटोपिया असे सामान्य नाम रूढ झाले आणि ह्या प्रकारचे विचार मांडण्याच्या पद्धतीला यूटोपियावाद असे म्हटले जाऊ लागले. यूटोपिया ह्या ग्रीक शब्दाचा धात्वर्थ ‘जो कुठेही नाही’ (देश, समाज, राज्य) हा होय.

आदर्श समाजकल्पना हे एक प्रकारचे स्वप्नरंजन आहे. विचारवंतांची स्वप्ने पहाण्याची ही परंपरा फार पुरातन आहे आणि ती आजतागायत चालू आहे. माणसाने निर्माण केलेल्या अगदी प्राचीन साहित्यातूनही तत्कालीनांनी रंगविलेली आदर्शांची चित्रे आहेत. प्राचीन ईजिप्त, बॅबिलोनिया, इराण वगैरेंच्या सांस्कृतिक परंपरांमध्ये सुवर्णयुगाच्या आणि देवराज्याच्या कल्पना आहेत. प्राचीन भारतीयांची सत्ययुगाची कल्पना किंवा प्राचीन साहित्यांतून अनेकदा रंगविलेली व आजतागायत भारतीयांच्या मनांत दृढमूल होऊन राहिलेली रामराज्याची कल्पना ही यूटोपीय चित्रेच होत. सुप्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो (इ. स. पू. पाचवे शतक) ह्याचा रिपब्लिक हा ग्रंथ ह्याच प्रकारच्या विचारपद्धतीचा एक आविष्कार आहे. मोरच्या नंतर यूरोपात १६२६ मधील फ्रान्सिस बेकनचे न्यू ॲटलांटिस, १८७१ मधील लिटनचे द कमिंग रेस, एडवर्ड बेलामीचे लुकिंग बॅकवर्ड (१८८८), विल्यम मॉरिसचे न्यूझ फ्रॉम नोव्हेअर (१८९०), एच्‌. जी. वेल्सचे ए मॉडर्न यूटोपिया (१९०५) अशी अगदी ठळकठळक ग्रंथनिर्मिती जरी पाहिली, तरी आदर्शाकडे झेप घेण्याची माणसाची प्रवृत्ती शतकानुशतके कशी टिकून आहे हे स्पष्ट दिसते. विचारवंतांनी केवळ आदर्श समाजाचे चित्र रंगविण्यासाठी कल्पनाविहार केला आहे असे नाही. १९४९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जॉर्ज ऑर्वेलच्या नाइन्टीन एटीफोर ह्या ग्रंथात अमाप तांत्रिक सामर्थ्याचा वापर करून आणि असत्याचा पद्धतशीरपणे उपयोग करून व्यक्तिजीवनाचे सर्वंकष नियंत्रण करणाऱ्या सत्ताधीशाच्या तावडीत सापडलेल्या समाजाचे चित्रण आहे. भविष्यात सत्य होऊ शकेल असे एक सामाजिक दुःस्वप्न ऑर्वेलने रंगविले आहे.

अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांतील सेंट सायमन वा रॉबर्ट ओएन यांसारख्या काही विचारवंतांना यूटोपीय समाजवादी असे मार्क्सने म्हटले आहे. नवसमाजनिर्मितीसाठी प्रत्यक्ष रक्तरंजित क्रांतीची जरुरी नाही, किंबहुना ती घातक ठरण्याचाच संभव अधिक असे प्रतिपादन माणसामधील विवेकबुद्धीला व सत्प्रवृत्तींना आवाहन करून समाजवाद आणता येईल. समाजवादी आणि सहकारनिष्ठ जीवनपद्धतीने लहान प्रमाणावर प्रत्यक्ष प्रयोग करून आदर्श समाजाची कल्पना जनमानसात रुजविता येईल असे ओएनने मांडले. ओएनने स्वतः उभारलेल्या उद्योगधंद्यांतील कामगारांच्या वसाहतींतून आदर्श समाजवादी समाजरचनेची प्रात्यक्षिकेही दाखविली. मात्र ओएनचे हे प्रयोग बहुतांशी त्याच्याबरोबरच संपले. शास्त्रशुद्ध समाजवाद सांगणारे मार्क्स, एंगेल्स आणि त्यांचे अनुयायी ह्यांनी ओएनचा यूटोपीय समाजवाद निरुपयोगी म्हणून झटकून टाकलेला आहे. तथापि ओएनचे प्रत्यक्ष प्रयोग आणि त्याने दिलेले विचार आणि त्याचबरोबर त्याच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या सर्वच यूटोपीय राज्यवाद्यांच्या कल्पना ह्यांना मानवाच्या राजकीय आणि सामाजिक आचारविचारांच्या इतिहासात निश्चित काही एक स्थान आहे. जे केव्हाना केव्हा वास्तवात आणता येण्याची शक्यता आहे अशा तऱ्हेचे स्वप्न पहाण्यात काहीही चूक वा अपाय नाही किंबहुना अशा स्वप्नांच्या मागोव्यानेच मानव प्रगती साधीत असतो.

संदर्भ संपादन

1. Armytage, W. H. G. Heavens Below : Utopian Experiments in England, London, 1961.

2. Berneri, Marie, Journey Through Utopia, London, 1950.

3. Gallagher, Ligeia, Ed. Utopia and Its Critics, Chicago, 1964.

4. Schoeck, R. Utopia and Humanism, 1969.

5. Surtz, Edward Hexter, J. H. Ed. Utopia, London 1965.