मो.रा. वाळंबे

(मो.रा.वाळंबे या पानावरून पुनर्निर्देशित)

मो. रा. वाळंबे अर्थात मोरेश्वर रामचंद्र वाळंबे (३० जून १९१२-२१ मार्च १९९२) हे एक शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेचे व्याकरणकार होते. ‘मराठीची लेखनपद्धती’ या विषयावरची त्यांची अनेक पाठ्यपुस्तके सुपरिचीत आहेत.

मो.रा. वाळंबे
जन्म नाव मोरेश्वर रामचंद्र वाळंबे
जन्म ३० जून १९१२
रामदुर्ग, कर्नाटक
मृत्यू २१ मार्च १९९२
राष्ट्रीयत्व भारतीय
वडील रामचंद्र वाळंबे
पत्नी कुसुम नारायण बार्शीकर (माहेरचे नाव)
अपत्ये सरोज टोळे सीताराम उर्फ सुधाकर वाळंबे, शांताराम उर्फ विजय वाळंबे

शिक्षण व व्यावसायिक जीवन संपादन

मो. रा. वाळंबे यांचा जन्म कर्नाटकातील रामदुर्ग या गावी झाला. मुधोळ येथे प्राथमिक शिक्षण पुरे केल्यानंतर कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमधून त्यांनी बी.ए.ची पदवी घेतली. यानंतर महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये ते शिक्षक, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक अशा विविध पदांवर होते. यात विशेषकरून साताऱ्यातील व पुण्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’ अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी प्रत्येकी पंधरा वर्षे नोकरी केली. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये मराठी भाषेचे शब्दकोश तयार करण्याचेही काम त्यांनी पाहिले. ‘मराठी भाषाशैली’ या विषयाचा व्यासंग असल्याकारणाने त्यांनी अनेक मराठी प्रकाशनसंस्थांकरिता व छापखान्यांकरिता मुद्रितशोधक म्हणून काम पाहिले.

वाळंब्यांना मराठी साहित्यामध्येही रस होता, आणि वि.स. खांडेकर, ग.दि. माडगूळकर, ना.सी. फडके, मालती बेडेकर इत्यादी अनेक मराठी लेखकांशी त्यांचा परिचय होता. मराठी साहित्य परिषदेचे सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. याचप्रमाणे मराठी ग्रंथालय परिषदेशीही ते संबंधित होते.

लेखन कारकीर्द संपादन

मोरेश्वर रामचंद्र वाळंबे यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळासाठी इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवीसाठी व्याकरण विषयक पुस्तिकांचे लेखन करून त्यांच्या शालेय व्याकरण लेखनास सुरुवात केली. 'सुगम मराठी शुद्धलेखन' (१९५१) ही छोटी पुस्तिका[१], आणि सुगम मराठी व्याकरण लेखन (१९८९)[२] या पुस्तकांचे लेखन केले. वनराणी एल्सा नावाच्या बालसाहित्य पुस्तकाचा अनुवाद आणि संपादन केले. 'मराठी शुद्धलेखन प्रदीप'(प्रथमावृत्ती १९८१) हे त्यांचे पुस्तक आहे.

'सुगम मराठी शुद्धलेखन'ही प्रथम छोटी पुस्तिका होती. त्यानंतर श्री. वाळंबे यांनी 'सुगम मराठी शुद्धलेखन' याच नावाची आणखी एक पुस्तिका लिहिली, ती गो.य. राणे प्रकाशनाने १९६३ साली काढली. त्यानंतर 'शुद्धलेखन- परिचय' या नावाचे आणखी एक छोटे पुस्तक त्यांनी १९६५ साली लिहिले. या दोन्ही आवृत्त्या संपल्यामुळे त्यांनी 'मराठी शुद्धलेखन प्रदीप' हे नवेच मोठे पुस्तक लिहिले. [३] या पुस्तकाची संपादित सुधारित आवृत्ती 'मराठी शुद्धलेखन प्रदीप' याच नावाने नितीन प्रकाशन, पुणे ३० यांनी प्रसिद्ध केली.[४] त्याची प्रथमावृत्ती १९८१ साली आणि सुधारित आवृत्ती जानेवारी २००२ साली प्रकाशित केली. नितीन प्रकाशनने या पुस्तकाचा सहा पानी सारांशही 'शुद्धलेखनविषयक नियम' या नावाने प्रसिद्ध केला.

मो.रा. वाळंबे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या मराठी व्याकरणाचीअर्थात सुगम मराठी व्याकरण व् लेखन या पुस्तकाची ५१वी आवृत्ती २०१६ सालच्या मार्चमध्ये निघाली आहे ([५]). याआधी पन्नासाव्या आवृत्तीनिमित्त ब्रेल लिपीमध्ये हे पुस्तक उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प वाळंबे यांच्या कन्या सौ. सरोज टोळे यांनी हातात घेतला होता. हा प्रकल्प पूर्ण झाला असून ब्रेल लिपीतही हे पुस्तक आले आहे. पूर्वी एका खंडात असलेले हे पुस्तक आता चार खंडात उपलब्ध झाले आहे.

याखेरीज ‘आंग्ल भाषेचे अलंकार’, ‘श्री. बाळकृष्ण यांचे चरित्र’, ‘सुबोध वाचन (तीन भाग)’, आणि ‘शिकारीच्या सत्यकथा’ याही पुस्तकांचे लेखन वाळंब्यांनी केले होते. वेळोवेळी मराठी नियतकालिकांसाठी लेखनही त्यांनी केले.

संदर्भ संपादन

  1. ^ मो. रा. वाळंबे, प्रस्तावना - मार्च १९८६, 'मराठी शुद्धलेखन प्रदीप', पुनर्मुद्रण १९९८, नितीन प्रकाशन, पुणे ३०, मूल्य रुपये पन्नास फक्त, ISBN 81-8169-27x
  2. ^ सुगम मराठी व्याकरण लेखन, (२०१३ च्या आव्र्त्तीतील, प्रकाशक नितीन गोगटे लिखीत प्रस्तावना)
  3. ^ मो. रा. वाळंबे, प्रस्तावना -मार्च १९८६, 'मराठी शुद्धलेखन प्रदीप', पुनर्मुद्रण १९९८, नितीन प्रकाशन, पुणे ३०, मूल्य पन्‍नास रुपये फक्त,ISBN 81-8169-27x
  4. ^ 'मराठी शुद्धलेखन प्रदीप', मूळ लेखक मो. रा. वाळंबे, सुधारित आवृत्तीचे लेखक-संपादक : अरुण फडके, १९९८, नितीन प्रकाशन, पुणे ३०, मूल्य ७५ रुपये, प्रथमावृत्ती १९८१, सुधारित आवृत्ती जानेवारी २००२
  5. ^ नितीन गोगटे, प्रकाशकाचे दोन शब्द, पान ०४- १४ जानेवारी २००२, 'मराठीशुद्धलेखन प्रदीप', मूळ लेखक मो. रा. वाळंबे, सुधारित आवृत्तीचे लेखक-संपादक : अरुण फडके, १९९८, नितीन प्रकाशन, पुणे ३०, मूल्य ७५ रुपये, प्रथमावृत्ती १९८१, सुधारित आवृत्ती जानेवारी २००२