मेफेर
मेफेर हा इंग्लंडच्या लंडन शहरातील एक भाग आहे. वेस्टमिन्स्टरमध्ये मोडणारा हा भाग मध्य लंडनमध्ये आहे. वेस्ट एंडमध्ये हा प्रदेश ऑक्सफर्ड स्ट्रीट, रीजेंट स्ट्रीट, पिकॅडिली आणि पार्क लेन दरम्यान आहे आणि जगातील सर्वात महागड्या जिल्ह्यांपैकी एक आहे. [१]
पूर्वी ऐया मनोर या इस्टेटीचा भाग असलेला हा भाग १८व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मुख्यत्वे ग्रामीण होता. १६८६ ते १७६४ काळात येथे दर मे महिन्यात जत्रावजा बाजार भरत असे. यामुळे याला मेफेर असे नाव मिळाले. कालांतराने ही जत्रा अधिकाधिक बकाल होऊ लागली व आसपासच्या लोकांना त्याचा उपद्रव होऊ लागला. या सुमारास हा सगळा भाग ग्रोसव्हेनर कुटुंबात (नंतरचे ड्यूक ऑफ वेस्टमिन्स्टर) लग्नात आंदण म्हणून आला. त्यांनी थॉमस बार्लोच्या मार्गदर्शनाखाली याचा विकास करण्यास सुरुवात केली. यात त्यांनी हॅनोव्हर स्क्वेर, बर्कले स्क्वेर आणि ग्रोसव्हेनर स्क्वेअर येथे उच्चवर्गीयांसाठी घरे बांधली.
यानंतर मेफेर उच्चभ्रू वसाहत समजली जाऊ लागली. २०व्या शतकाच्या सुरुवातीस अशा उच्चभ्रू समाजाची घसरण सुरू झाल्यावर येथे व्यवसाय आले. अनेक घरांचे रूपांतर कॉर्पोरेट मुख्यालये आणि दूतावासांमध्ये झाले.
आजही मेफेर हा लंडन व पर्यायाने जगातील सगळ्यात महागड्या भागांपैकी एक आहे.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Cox, Hugo (11 November 2016). "Mayfair: London's most expensive 'village'". Financial Times. 10 December 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 March 2017 रोजी पाहिले.