मेधा खोले
घटनाक्रम
संपादनपुणे - 'सोवळे' मोडल्याच्या कारणावरून स्वयंपाक करणाऱ्या महिलेविरुद्ध हवामानशास्त्र विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी युवती संघटनेने खोले यांचा निषेध केला, तर "डॉ. खोले आणि निर्मला यादव यांचा हा आपसांतील वैयक्तिक वाद असून, त्यांनी तो सामोपचाराने मिटवावा', अशी भूमिका अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मांडली.
निर्मला यादव यांनी जात लपवली, तसेच सुवासिनी असल्याचे सांगून आपल्या घरी स्वयंपाकाचे काम केल्याची तक्रार खोले यांनी केली, तर खोले यांनीच आपल्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची फिर्याद यादव यांनी दिली. खोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घरी दरवर्षी गौरी- गणपती आणि त्यांच्या आई- वडिलांचा श्राद्धविधी असतो.
त्यासाठी आपल्याला सुवासिनी आणि ब्राह्मण महिलेची आवश्यकता होती. निर्मला यादव (वय 60, रा. धायरी) यांनी "आपले नाव निर्मला कुलकर्णी आहे' असे सांगून, घरी सोवळ्याच्या स्वयंपाकाचे काम केले. त्या ब्राह्मण नसल्याचे जोशी नावाच्या एका गुरुजींकडून आपल्याला समजले. याचा जाब विचारण्यासाठी आपण धायरी येथील यादव यांच्या घरी गेलो. त्या वेळी यादव यांनी अंगावर धावून येत आपल्याला शिवीगाळ केली.
यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खोले घराबाहेर आल्यावर त्यांनी "विदुला जोशी आल्या आहेत', असा निरोप दिला. घरात आल्यानंतर त्यांनी आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षण व कार्य
संपादनवेधशाळेने वर्तविलेला हवामानाचा अंदाज हा विनोदाचा हक्काचा विषय असल्याचा काळ फार जुना नाही. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने नवनवे प्रतिमान विकसित करीत
हवामान शास्त्र विभाग(आयएमडी) आता नेमका अंदाज वर्तवू लागला आहे.
यामुळे त्याची प्रतिमाही सुधारू लागली. हे प्रत्यक्षात आणणाऱ्या मोजक्या नावांमध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नवनियुक्त उपसंचालक (हवामानअंदाज) डॉ. मेधा खोले यांचा समावेश आहे. पुणे वेधशाळेच्या संचालिका म्हणून २००७मध्ये कार्यरत झाल्यावर चारच वर्षांत आयएमडीतील राष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या पदावरील त्यांची नियुक्ती त्यांचे या क्षेत्रातील प्रभुत्वच सिद्ध करते. सर्वसामान्य मराठी कुटुंबाची पार्श्वभूमी असताना या पदापर्यंत त्यांचा झालेला प्रवास मराठी तरुणांसाठी आदर्श ठरावा असाच आहे. पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमधून मराठी माध्यमातून शिक्षण आणि फर्ग्युसन कॉलेजमधून भौतिकशास्त्राची पदवी मिळवून त्यांनी एमएस्सी आणि पीएच. डी. पुणे विद्यापीठातून प्राप्त केली. १९९२मध्ये 'अ' श्रेणीच्या अधिकारी म्हणून त्या हवामान विभागात रुजू झाल्या. पुणे विद्यापीठातून डॉ. खोले यांनी २००१मध्ये पीएच. डी. पूर्ण केली, ती मान्सूनवर 'एल निनो' आणि 'ला नीना' या घटकांचा कसा परिणाम होतो या विषयावर. हवामानबदल आणि त्याचे मान्सूनवरील परिणाम यावर त्यांचे संशोधन सुरू असून, गेली काही वर्षे त्या आयएमडीच्या चक्रीवादळ इशाऱ्याच्या कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत. आधुनिक पद्धती वापरून चार दिवसांपर्यंतचा हवामान अंदाज वर्तवणे आणि तो प्रभावीपणे समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोचवणे यासाठी डॉ. खोले प्रसिद्ध आहेत. म्हणूनच अल्पावधीत महाराष्ट्रात हवामान अंदाजाबरोबर त्यांचे नाव जोडले जाऊ लागले. त्यांच्या या क्षमतेवरूनच राष्ट्रीय स्तरावरील हवामान अंदाजाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे. डॉ. खोले यांचे ४५हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. जागतिक हवामानशास्त्र संघटनेनेही (डब्ल्यूएमओ) त्यांच्या कार्याची दखल घेतली असून, संस्थेच्या नियतकालिकातून त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारा लेखही प्रसिद्ध करण्यात आला.
केंद्र सरकारने त्यांना हवामानशास्त्रातील योगदानाबद्दल गुणवत्तेचे प्रमाणपत्र देऊन गौरवले आहे. अचूक हवामान अंदाजाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असताना आपल्या कामाला संशोधनाप्रमाणेच कर्तव्यही मानणाऱ्या डॉ. मेधा खोले यांची भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपसंचालक म्हणून झालेली नियुक्ती सकारात्मक बदल घडवून आणेल आणि आयएमडीची प्रतिमाही सुधारेल, असा विश्वास वाटतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|