मृषानाट्य
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मृषानाट्य (द थिएटर ऑफ द ॲब्सर्ड). जीवनाची अर्थशून्यता ज्या नाट्यकृतींद्वारा रंगभूमीच्या माध्यमातून व्यक्त होत असते, तिला मृषानाट्य असे संबोधले जाते. इंग्रजीमध्ये ‘द थिएटर ऑफ द ॲब्सर्ड’ या नावाने ही रंगभूमी ओळखली जाते. ‘Absurdum’ या लॅटिन शब्दावरून ‘Absura’ हा शब्द इंग्रजीत रूढ झाला. त्याचा अर्थ विसंगत किंवा व्यस्त असा आहे.
ॲब्सर्ड थिएटर या शब्दाला मराठी प्रतिशब्द वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेले आहेत. उदा., ‘न-नाट्य’, ‘असंगता’चे अथवा ‘विसंगता’चे नाट्य, ‘व्यस्त रंगभूमी’, ‘निरर्थ-नाट्य’ व ‘मृषानाट्य’ या भिन्न संज्ञा वेगवेगळ्या अन्वयार्थाप्रमाणे वापरल्या जातात.
पारंपरिक किंवा प्रस्थापित रंगभूमीवर जीवनातील मूल्यव्यवस्थेचे, तार्किक संगतीचे, आदर्श नीतिकल्पनांचे दर्शन घडविण्याचा यत्न असतो. याउलट हे सारे जीवन अर्थशून्य, हेतुशून्य आहे जीवनातील अनेक गोष्टींची तार्किक संगती माणसाला लागू शकत नाही, नीतिमूल्यांचे, आदर्श कल्पनांचे अधःपतन झालेले आहे त्यामुळे जीवनाचा अर्थ लावणे किंवा शोधणे ही आभासात्मक गोष्ट आहे, निरर्थ गोष्ट आहे, असा आशय मृषानाट्यातून व्यक्त होतो. मृषानाटककार सहसा जीवनातील निरर्थतेचा अर्थ लावून दाखवत नाहीत किंवा भाष्य करीत नाहीत मात्र नाट्यकृतीतून व्यस्त जीवनार्थाचे चित्रण करीत असतात.
काहींच्या मते मृषानाट्याचा जनक यूबूर्षा या नाटकाचा लेखक आल्फ्रॅद जारी (१८९६) हा आहे परंतु प्रत्यक्षात या रंगभूमीचे जनकपद ⇨ सॅम्युएल बेकेट या विश्वविख्यात नाटककाराकडे जाते. याचा जन्म १९०६ सालचा. याने लिहिलेल्या वेटिंग फॉर गोदो (१९५३) या नाटकाने मृषानाटकाची मुहूर्तमेढ रोवली आणि साऱ्या जगाचे लक्ष या वेगळ्या रंगभूमीकडे वेधले. त्याचे दुसरे नाटक एन्ड गेम नावाचे आहे.
बेकेटप्रमाणेच मृषानाट्यात अग्रेसर असलेला दुसरा नाटककार म्हणजे ⇨ यूझेअन यानेस्कू. त्याची नाटके दबाल्ड सोप्रानो, द न्यू इज टेनन्ट, आमेदी, ऑर हाऊ टू गेट रिड ऑफ इट, ऱ्हाइनोसेरॉस, चेअर्स, लेसन इत्यादी. या व्यतिरिक्त मृषानाट्य लिहिणारे महत्त्वाचे नाटककार पुढीलप्रमाणे : हॅरॉल्ड पिंटर (द रूम, द बर्थ डे पार्टी, द केअरटेकर), झां झने (द मेडस, द ब्लॅक्स, द बाल्कनी), एडवर्ड आल्बी (झू स्टोरी, सँड बॉक्स, द अमेरिकन ड्रीम, पुअर डॅड), गटर ग्रास, (द फ्लड), आर्थर आदामाँव्ह (द पिंगपाँग), झां तार्व्हू (द की होल) मॅक्स फ्रिश (द फायर बग्ज), फ्रीड्रिख ड्युरेनमॅट (द व्हिजिट).
मराठी रंगभूमीवर मृषानाट्याचा पंथ मोठ्या प्रमाणात विकसित झाला नाही. काही प्रयत्न झाले ते असे : चिं.त्र्यं. खानोलकर (एक शून्य बाजीराव), सतीश आळेकर (महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे, मिकी आणि मेमसाहेब), महेश एलकुंचवार (गार्बो), अच्युत वझे (चल रे, भोपळ्या टुणूक, टुणूक, लागला तर घोडा नाही तर झेब्रा) इत्यादी. सॅम्युएल बेकेटचे वेटिंग फॉर गोदो, यानेस्कूचे चेअर्स, लेसन तसेच एडवर्ड आल्बीचे झू स्टोरी इ. नाट्यकृतींची भाषांतरे मराठीत झालेली आहेत. १९५० मध्ये मृषानाट्याची सुरू झालेली चळवळ आता थंडावल्यासारखी दिसते.