कायदे मंडळात स्वराज्य पक्षाने घटनात्मक बदलासंबंधी केलेल्या ठरावानुसार ब्रिटिश सरकारने १९१९ च्या कायद्याच्या यशापशाचे परीक्षण करण्यासाठी सर अलेक्झांडर मुडीमनच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली. यामध्ये सरकारी सभासदांचाच जास्त भरणा होता. " द्विदल राज्यपद्धतीत मूलतः काहीही गैर नाही पण ती स्वीकाराह॔ व्हावी यासाठी काही किरकोळ बदल केले जावेत " अशा प्रकारचा अहवाल या समितीने सादर केला . तेजबहादूर सप्रू व जिना यांनी त्यास कसून विरोध केला. १९२५ मध्ये कायदेमंडळात यावर चर्चा होऊन पं. मोतीलाल नेहरूंनी द्विदल राज्यपद्धतीवर कडाडून टीका केली. इ.स. १९२५ मध्ये श्री सी. आर. दास यांच्या मृत्युमुळे या पक्षाला जबरदस्त धक्का बसला. यानंतर पक्षांतर्गत मतभेदाला सुरुवात झाली. पं. मदनमोहन मालवीय व लाला लजपतराय यांनी स्वराज्य पक्ष सोडून नॅशनल पार्टी नावाचा पक्ष स्थापित केला. अशा प्रकारे १९२६ नंतर स्वराज्य पक्ष नाहीसा झाला. स्वराज्यपक्ष अत्यंत अल्पावधीतच नाहीसा झाला कारण देशबंधू दासांचा मृत्यु आणि त्यामुळे त्या पक्षात शिथिलता निर्माण झाली. तसेच सततच्या विरोधाने पक्षाची संघर्ष करण्याची शक्ती क्षीण झाली. त्यातील लढाऊ प्रवृत्ती नामशेष झाली. कालौघात या पक्षातील प्रमुखांनी भिन्न शासकीय पदे स्वीकारल्याने पक्षाचे अस्तित्त्व संपले . पं. मालवीय यांनी दुसऱ्या पक्षाची स्थापना केल्याने उर्वरित कार्यकर्ते राष्ट्रीय पक्षात दाखल झाले .