म्युच्युअल फंड

(मुच्युअल फंड या पानावरून पुनर्निर्देशित)

म्युच्युअल फंड (इंग्रजी: Mutual Fund; मराठी: सामाईक निधी) हा एक गुंतवणूकीचा पर्याय आहे. गुंतवणूकदार कर बचत, संपत्ती निर्माण करणे, नियमित उत्पन्न मिळवणे, इ. उदिष्टे साध्य करू शकतात.समभाग (Equity Shares) निगडित म्युच्युअल फंड योजना मध्ये शेअर बाजाराची आणि कंपनीच्या व्यवसायाची जोखिम अंतर्भुत असते व कर्जरोखे (Bonds) निगडीत योजना मध्ये व्याज दराचे बदलाची व पतदर्जाची/ दीवाळखोरीची जोखिम अंतर्भुत असते. समभाग निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या जास्त जोखिम असते व कर्जरोख्याशी निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी जोखिम असते.

भारतीय भांडवल बाजारात अनेक मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या आपापले म्युच्युअल फंड चालवत आहेत. सामान्य माणसाला भांडवल बाजार तसेच शेअर गुंतवणीत गम्य नसते अशा सामान्य गुंतवणूक धारकासाठी गुंतवणुकीचा हा पर्याय स्वागतार्ह आहे. गुंतवलेल्या पैशावर म्युच्युअल फंड काही एन्ट्री लोड या नावाने काही प्रारंभिक शुल्क वसूल करतात. उरलेली रक्कम गुंतवली जाते व या रकमेच्या किमती इतके फंड युनिट ग्राहकाच्या नावाने दिले जातात. जमा झालेली एकूण रक्कम फंड व्यवस्थापक शेअर बाजारात फंडाच्या उद्दिष्टाप्रमाणे गुंतवतो. या गुंतवणुकीची किंमत जशी वाढते तशी फंडाच्या एका युनिटची किंमत वाढत जाते. जर गुंतवणूक केलेल्या शेअरची किंमत कमी झाली तर फंडाच्या युनिटची किंमतही कमी होते.

इतिहास

संपादन

१८व्या शतकात अब्राहम (कींवा आड्रिआन) व्हॅन् केटविक या डच व्यापाऱ्याने "ईनद्राख्त माक्त माख्त" (एकी बळ निर्माण करते) या नावाची एक विश्वस्त संस्था काढली. या संस्थेच्या माध्यमातून छोट्या गुंतवणूकदारांना विविध धंद्यांमध्ये भांडवल गुंतवता येत होते. हीच आजच्या म्युच्युअल फंडांची सुरुवात मानली जाते.

१९६३ साली भारत सरकार आणि भारतीय रिझर्व बँक यांनी एकत्र येऊन "युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया"ची स्थापना केली[]. हा भारतातील पहिला म्युच्युअल फंड होता. १९८७ साली भारतीय आयुर्विमा महामंडळ तसेच अन्य सार्वजनिक बँकांनी म्युच्युअल फंड उद्योगात प्रवेश केला. १९९३ साली म्युच्युअल फंडांसाठीचे नियम बनवण्यात आले आणि खाजगी म्युच्युअल फंडांना परवानगी देण्यात आली. म्युच्युअल फंडांचा प्रसार व्हावा, तसेच त्यातील गुंतवणूकदारांचे हित जपले जावे यासाठी सर्व नोंदणीकृत म्युच्युअल फंडांनी एकत्र येऊन २२ ऑगस्ट १९९५ साली ॲंम्फी (The Association of Mutual Funds in India) या संस्थेची स्थापना केली.

एप्रिल २०१८ अखेर भारतातील म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवलेले भांडवल २३,२९,७८२ कोटी रुपये इतके होते.[]

फायदे आणि तोटे

संपादन

गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडाचे फायदे आणि तोटे पुढीलप्रमाणे

फायदे

संपादन
  • वैविध्यः म्युच्युअल फंडातील भांडवल विविध समभाग (equity shares)/कर्जरोख्यांमध्ये (bonds) गुंतवले जाते. यामुळे गुंतवणूकदाराची जोखीम कमी होते.
  • तरलता: काही अपवाद वगळता म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कधीही काढून घेता येते. यामध्ये गुंतवणूकदाराला त्या दिवशीच्या युनिटच्या दरानुसार रक्कम मिळते.
  • गुंतवणुकीचे व्यावसायिक व्यवस्थापन: फंड व्यवस्थापकाकडे गुंतवणुकीच्या संधींचा अभ्यास करण्यासाठी खास टीम असते, त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारापेक्षा फंड व्यवस्थापक अधिक चांगल्या पद्धतीने भांडवल गुंतवू शकतो.
  • मोठ्या गुंतवणूकदारांना उपलब्ध असलेल्या गुंतवणूकी करण्याची संधी देखील सगळ्या गुंतवणूकदारांना मिळते. उदाहरणार्थ, वैयक्तिक गुंतवणूकदारांना प्रत्येक्ष विदेशी बाजारपेठेत थेट गुंतवणूक करणे कठीण जाते.
  • सेवा आणि सुविधा: फंड्स बऱ्याचदा धनादेश सारख्या सुविधा देते.
  • सरकारी पर्यवेक्षण: म्युच्युअल फंड सरकारी संस्थाद्वारे नियंत्रित केले जातात.
  • पारदर्शकता आणि सुलभ तुलना सर्व गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांनी एक सारखा अवहाल देणे अपेक्षित आहे, ज्यामुळे त्यांना तुलना करणे सोपे जाते.
  • फी: म्युच्युअल फंडात गुंतवलेल्या रकमेपैकी काही ठराविक रक्कम व्यवस्थापन कंपनी फी स्वरूपात कापून घेते. त्यामुळे गुंतवणूकदाराला फक्त उरलेल्या रकमेवरच परतावा मिळतो. परंतु फी सर्व गुंतवणूकदारांमध्ये विभागल्यामुळे मिळणाऱ्या सोईच्या तुलनेत कमी असते.
  • गुंतवणुकीवर कमी नियंत्रण: फंडातील रक्कम कोणत्या समभाग/कर्जरोख्यांमध्ये गुंतवली जावी यावर गुंतवणूकदाराचे थेट नियंत्रण नसते.
  • अनिश्चित परतावा: म्युच्युअल फंडातून मिळणारा परतावा हा युनिटच्या बाजारभावावर अवलंबून असतो, त्यामुळे बाजारभावानुसार त्यात जशी वाढ होऊ शकते तशीच घटही होऊ शकते.

प्रकार

संपादन

म्युच्युअल फंडांचे वर्गीकरण दोन प्रकारे करता येते.

  • संरचनेनुसार: एखाद्या फंडात पैसे कधी आणि कसे गुंतवता येतात त्यावरून म्युच्युअल फंडाचे खुला(ओपन एन्डेड) , मर्यादित (क्लोज एन्डेड), आणि विनिमित (एक्स्चेंज ट्रेडेड) असे वर्गीकरण केले जाते
  • गुंतवणुकीनुसार: फंडातील भांडवल कशात गुंतवले जाते त्यावरून फंडांचे इक्विटी फंड (मुख्यत्वे समभागात गुंतवणूक), डेट फंड (मुख्यत्वे कर्जरोख्यात गुंतवणूक), हायब्रिड फंड (समभाग आणि कर्जरोखे या दोहोंत गुंतवणूक), फंडांचा फंड (अन्य म्युच्युअल फंडात गुंतवणूक) आणि इतर (उदाहरणार्थ कमोडिटी फंड) असे वर्गीकरण केले जाते. फंडातील भांडवल कोणत्या प्रकारच्या समभागात किंवा कर्जरोख्यात गुंतवले जाते त्यावरून फंडांचे पुन्हा उपवर्गात विभाजन केले जाते.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "History - Mutual Fund Industry in India | Unit Trust of India". www.amfiindia.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
  2. ^ http://portal.amfiindia.com/spages/amapr2018repo.pdf