मुअम्मर अबू मियां अल-गद्दाफी (अरबी: Ar-Muammar al-Qaddafi.ogg معمر القذافي , ७ जून १९४२ - २० ऑक्टोबर २०११) हा लिबिया देशाचा लष्करी अधिकारी, हुकुमशहा व सर्वोच्च नेता होता. १ सप्टेंबर १९६९ रोजी घडलेल्या लष्करी बंडानंतर त्याने लिबियाची सत्ता हाती घेतली. ४२ वर्षे सलग सत्ता उपभोगणाऱ्या गद्दाफीचा ह्या बाबतीत अरब जगतात अव्वल क्रमांक लागतो.

सत्ता हाती घेतल्यानंतर गद्दाफीने आपल्या राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत केले व लिबियाचे संविधान बरखास्त करून आपल्या विचारधारेचे व पसंतीचे कायदे लागू केले. लिबियाच्या अर्थव्यवस्थेवर गद्दाफी कुटुंबीयांनी संपूर्ण ताबा मिळवला. लिबियन जनतेचे आयुष्य गद्दाफीच्या कारकिर्दीत अवघड व हलाखीचे होऊन बसले. गद्दाफीने लिबियातील प्रचंड खनिज तेल साठ्यांमधून मिळणारा पैसा अण्वस्त्रे मिळवण्यासाठी वापरला व अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना पाठिंबा दिला. ह्या कारणांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाने तसेच जगातील अनेक देशांनी लिबियावर बहिष्कार टाकला होता.

अमेरिकेने सद्दाम हुसेनला पकडल्यानंतर गद्दाफीने आपले धोरण पूर्णपणे बदलले व लिबियाचा अण्वस्त्र कार्यक्रम बंद करत असल्याची घोषणा केली. अचानकपणे लिबिया इतर देशांसोबत अनेक बाबतीत संपूर्ण सहकार्य करू लागला. २००६ साली अमेरिकेने लिबियासोबत राजकीय संबंध पुनःप्रस्थापित केले व इतर दहशतवादी राष्ट्रांना लिबियाचे उदाहरण अंमलात आणण्यास सुचवले.

२०११ च्या सुरुवातीस अरब जगतातील लोकशाहीवादी चळवळ लिबियामध्ये दाखल झाली व बंडखोरांनी लिबियामधील गद्दाफीची सत्ता झुगारून देण्यास आरंभ केला. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सहकार्यातून व लिबियन जनतेच्या पाठिंब्यामुळे लिबियातील पूर्व भागातील बेनगाझीमध्ये सुरू झालेली ही चळवळ देशभर पसरली व ऑगस्ट २०११मध्ये बंडखोर सेना त्रिपोलीमध्ये दाखल झाली. बंडखोरांनी त्रिपोली शहरावर पूर्णपणे कब्जा केला व गद्दाफी परागंदा झाला. तो सिरते ह्या आपल्या जन्मस्थळी लपून बसला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. बंडखोर सैन्याने लिबियाचा उर्वरित भाग ताब्यात घेतला व २० ऑक्टोबर २०११ रोजी सिरते येथे घडलेल्या एका चकमकीदरम्यान गद्दाफीला ठार मारण्यात यश मिळवले. त्याच वेळी गद्दाफीचा मुलगा मुतस्सिम हाही मारला गेल्याचे समजते.[]

गद्दाफी हा कट्टर मुस्लिम होआ आणि त्याचा सर्वधर्मसमभावावर विश्वास नव्हता. त्याच्या विक्षिप्त स्वभावाचे अनेक किस्से सांगितले जातात. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गद्दाफीवर मानवी हक्कांच्या पायमल्लीसाठी खटला भरला आहे. तसेच गद्दाफीची जगभर विखुरलेली अब्जावधी रुपयांची संपत्तीदेखील अनेक देशांनी जप्त केली आहे.

कुटुंबीय

संपादन

मुअम्मर गद्दाफीच्या कुटुंबातली माणसे :

  • पूर्वपत्नी : फातिया(१९७० मध्ये घटस्फोट झाला).
  • मोहम्मद(फातियाचा पुत्र): लिबियाच्या ऑलिम्पिक समितीचा टेलिकम्युनिकेशन खात्याचा प्रमुख. २१ ऑगस्ट २०११ रोजी पकडला गेला अशी बातमी; नंतर सुटका करून पळून गेला.
  • द्वितीय पत्नी : साफिया.
  • साफियाची मुले :
    • सैफ अल इस्लाम : मुअम्मर गद्दाफीचा वारस : फरारी.
    • सादी : माजी फुटबॉल खेळाडू व चित्रपट निर्माता.
    • मुतस्सिम लष्करात कर्नल, राष्ट्रीय संरक्षण सल्लागार; सैफचा राजकीय प्रतिस्पर्धी. २० ऑक्टोबर २०११ रोजी गद्दाफीबरोबरच मारला गेला.
    • हनिबल : एका वाहतूक कंपनीत कामाला.
    • आयशा(मुलगी) : वकील आणि मुअम्मर गद्दाफीविरुद्ध आंदोलन सुरू होण्याआधीपर्यंत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विकास कार्यक्रमातली मुख्य अधिकारी.
    • सैफ अल अरब : म्यूनिचमध्ये शिकत होता; आत्ताच परतला होता; एप्रिल २०११ मध्ये नाटोच्या बॉंबहल्ल्यात मृत्युमुखी पडला. त्याची तीन अल्पवयीन मुलेही तेव्हाच ठार झाली.
    • खामिस : लष्कराच्या खास तुकडीचा प्रमुख; बेनगाझीमध्ये बंडखोरांविरुद्ध लढताना बॉंबहल्ल्यात मेला असल्याची २७ ऑगस्ट २०११ची बातमी.
    • नाव ठेवलेले नव्हते(नात) : आयशाला ३० ऑगस्ट २०११ रोजी झालेली कन्या.
  • एलिना : सून, कर्नल मुतस्सिमची बायको; एक मॉडेल; हिने आपल्या श्वेगा नावाच्या नोकराणीवर उकळ्ते पाणी ताकून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता.
  • मिलाद : मुअम्मर गद्दाफीचा पुतण्या. याने अमेरिकेने १९८६ मध्ये केलेल्या हल्ल्याच्या वेळी मुअम्मर गद्दाफीला वाचवले, असे म्हणतात.
  • हना : मुअम्मर गद्दाफीची पुतणी; बहुधा अमेरिकी हल्ल्यात १९८६ मध्ये मरण पावली; एका जर्मन वृत्तपत्रातील इ.स. २००१ मधल्या बातमीनुसार अजून जिवंत.

संदर्भ

संपादन
  1. ^ "कर्नल गद्दाफी ठार; लिबियात जल्लोष". महाराष्ट्र टाइम्स. 2011-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० ऑक्टोबर २०११ रोजी पाहिले.