चिंतामणी गोविंद पेंडसे

(मामा पेंडसे या पानावरून पुनर्निर्देशित)

चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे (जन्म : सांगली, २८ ऑगस्ट, १९०६; - १२ जनेवारी १९९१) हे मराठीतले एक अग्रगण्य नाट्य-अभिनेते होते. सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून मामांनी कसबसे शिक्षण घेतले. शिक्षण अर्धवट सोडावे लागले असले तरी त्यांनी स्नेहसंमेलनांतल्या नाटकांत केलेली कामे थोरामोठ्यांच्या लक्षात आली होती. मामांचे वडील सांगली संस्थानात नोकरी करीत होते. वडील निवृत्त झाल्यावर घरची परिस्थिती बिकट झाली. वडिलांना मासिक साडेबारा रुपये पेन्शन मिळे. घरी परिवार मोठा. संसारास काही मदत करावी या हेतूने मामा पेंटरच्या हाताखालचा गडी या नात्याने वयाच्या अठराव्या वर्षी किर्लोस्कर संगीत मंडळीत शिरले. लहानपणापासून पेंटिंगची आवड होतीच. नाटकांतील पडदे रंगवणाऱ्या शंकरराव गायकवाडांकडून पेंटिंगचे धडे घ्यावे व नंतर स्वतंत्र पेंटिंगचा व्यवसाय सुरू करावा हा मामांचा उद्देश होता. शिवाय नट व्हायला वडिलांनी परवानगीही दिली नव्हती. नट म्हणजे अशिक्षित, दुराचारी व व्यसनी माणूस अशी तेव्हाची समजूत. मराठी नाटकाच्या जन्मापासून नट मंडळी मिळाली ती आचारी, ताक घुसळणारा, पाणक्या यांसारखी. त्यांच्याबरोबर त्यांची व्यसनेही नाटक मंडळीत शिरली. स्वतःला साळसूद म्हणवणाऱ्या प्रतिष्ठित लोकांनी ही नटांची व्यसने पोसली व त्यांचा गवगवाही केला. “जो नाटकात स्त्रीपात्र पाहील त्याला सात जन्म स्त्रीत्व प्राप्त होईल ” असाही एक लोकापवाद होता. त्या स्त्रीपात्राला काय शिक्षा होती देव जाणे ! अशा या प्रतिष्ठा नसलेल्या व्यवसायात सामील व्हायला वडिलांनी नाकारले नसते तरच नवल. म्हणून मामांनी नाटकांचे बोर्ड रंगवायला सुरुवात केली. ते करताकरता मामांना नाटकांत काम करायची संधी मिळाली. मामांचा दुधाचा व्यवसायही होता. केवळ नाटकांतून मिळणाऱ्या बिदागीवर संसार चालवणे शक्य नसल्यामुळे एखादा जोडधंदा असणे त्याकाळी गरजेचे होते. दुधाचा धंदा चालू असतानाच,१९३६ साली मामा पेंडसे यांनी ’रमेश नाटक मंडळी’त प्रवेश मिळवला. त्यांच्या ’आग्ऱ्याहून सुटका’ या नाटकात केलेल्या कामामुळे मामांचे नाव सर्वमुखी झाले. पुढे ’समर्थ नाटक मंडळी’, 'महाराष्ट्र नाटक मंडळी’, ललितकलादर्श अशा नामांकित नाटक कंपन्यात मामांना कामे मिळू लागली.

अपघाताने नट

संपादन

एकदा रात्री नऊ वाजता महाटचे यशवंत महादेव ऊर्फ अप्पा टिपणीस यांनी लिहिलेल्या ‘राजरंजन’चा प्रयोग होता. दुपारी दोन वाजता बातमी आली की, सय्यद अल्लीची भूमिका करणारे नारायणराव फाटक यांचे एकाएकी ऑपरेशन ठरल्यामुळे ते हजर राहू शकणार नाहीत. सर्वांची बोबडी वळली. आयत्या वेळी कुणाला उभे करायचं हा प्रश्न पडला.

”अरे तो पेंटरचा गडी पेंडसे फावल्या वेळात नाटकातले उतारे म्हणत असतो; त्याला पाहू या आज उभा करून ” अशी सूचना आली. मामा तयार झाले सय्यद अल्लीचा पोशाख चढवला, दाढी, मिशी चिकटवली, फेटा बांधला आणि स्टेजवर जाऊन राजाला मुजरा ठोकला. खास नेमलेल्या प्रॉम्प्टरने सांगितलेली वाक्ये मामांनी कशीबशी उरकली आणि एकदाचा विंगेत सहीसलामत सटकले. पडदा पडल्यावर कंपनीचे मालक नानासाहेब चापेकरांनी शाबासकी दिली आणि म्हणाले, ” छान ! आता तुला नाटकांत कामे द्यायला हवी.“ आणि अश्या रीतीनेते मामा पेंडसे नट झाले. मामा पेंडसेनी म्हणले आहे, "हत्तीवर बसणे किंवा चांदीच्या ताटात जेवणे हे जसे माझे विषय नव्हेत, तसेच नट होणे हा माझा विषय नव्हे, अशी माझी तोपर्यंत धारणा होती. मुंडी कापलेल्या कोंबड्याने निष्फळ फडफड धडपड करावी तशी जगण्यासाठी ध्येयधोरण नसलेली माझी आतापर्यंत धडपड चालली होती. सय्यद अल्लीच्या भूमिकेने मला हरवलेलं मिळवून दिलं. मी नट झालो. पडदा रंगवायचं सोडून स्वतःचा चेहरा रंगवायला सुरुवात केली."

केशवराव दाते हे मामा पेंडसे यांचे अभिनयातले गुरू.नाटकाबद्दल चर्चा करायची असते, हे केशवराव दाते यांच्याडून मामा शिकले. त्यापूर्वी लेखकाने लिहिलेली वाक्ये पाठ करायची, दिग्दर्शकाने दाखवलेल्या हालचाली लक्षात ठेवायच्या आणि प्रेक्षकांकडून दोनचार वेळा हशा-टाळ्या घेतल्या की भूमिका चांगली झाली असा त्यांचा समज होता. हा समज पुढे गैरसमज ठरला आणि मामा एक अभिनयसंपन्न नट बनले.

कुस्तीमध्ये पायाचे हाड मोडले

संपादन

अहमदनगरला किर्लोस्कर संगीत मंडळींचे नाटक होते. मामा नाटकाच्या विंगा-झालरी वगैरे लावायचे काम करीत. त्यामुळे तेही अहमदनगरमध्ये होते. तेथे त्यांच्या बरोबरच्या आगाशे नावाच्या कंपनीतील मुलाबरोबर फावल्या वेळात कुस्ती खेळताना मामांच्या पायाचे हाड मोडले. नगरच्या हॉस्पिटलात उपचार घेतल्यावरही पायाचे हाड व्यवस्थित न बसल्यामुळे त्यांना काठीच्या आधाराने चालावे लागे. कंपनीला आता त्यांची गरज उरली नव्हती. दहा महिन्यांचा पगार न देता फक्त सांगलीपर्यंतच्या तिकिटाचे पैसे देऊन मामांची माझी बोळवण झाली. खेटरे खाल्ल्यासारखा चेहरा, शेंडी जाऊन डोक्यावर केसांचे छप्पर व काठीच्या आधाराने पडणारे त्यांचे वाकडे पाऊल पाहून घरच्या मंडळींना मामांचे पाऊल खरॆच वाकडे पडले असेच वाटले असणार. नंतर त्यांचा पाय बारा झाला तरी उजवा पाय डाव्या पायापेक्षा दीड इंचाने तोकडा राहिला; चाल दिडकी झाली. पण हातातली काठी सुटली, पण नशिबातले हॉस्पिटल सुटले नाही. बारा वर्षांत मामांच्या पोटावर पाच वेळा मोठमोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. प्रत्यक्ष यमाला देखील ‘मामा’ बनवून आपली दिडकी चाल सहज लक्षात येणार नाही, अश्या पद्धतीने मामा पेंडसे स्वैरपणे रंगमंचावर वावरले, आणि यशस्वी अभिनेते म्हणून प्रसिद्धीच्या झोतात राहिले.

मामा पेंडसे यांची भूमिका असलेली नाटके-कंसात पात्राचे नाव

संपादन
  • आग्ऱ्याहून सुटका (उमरखान + जयसिंग)
  • आंधळ्यांची शाळा (विश्वनाथ)
  • आशीर्वाद (तात्या)
  • एक होता म्हातारा (नाना -बाबा)
  • कथा कुणाची व्यथा कुणाला (सोमण)
  • कन्या सासुरासी जाये (दादासाहेब)
  • करीन ती पूर्व (शिवाजी)
  • कुलवधू (बाप्पा)
  • कोणे एके काळी (हणमंतराव)
  • खडाष्टक (कर्कशराव + वारोपंत + राघोपंत)
  • चंद्रग्रहण (जगदेवराव)
  • चंद्र नभीचा ढळला (अमात्य)
  • झुंज (बाबासाहेब)
  • तुझे आहे तुजपाशी (आचार्य)
  • तोतयाचे बंड (नाना फडणीस)
  • त्राटिका (प्रतापराव)
  • दुरिताचे तिमिर जावो (पंत)
  • देव नाही देव्हाऱ्यात (दादासाहेब)
  • पडछाया (नाना)
  • पंडितराज जगन्‍नाथ (शहाजहान)
  • पुण्यप्रभाव (भूपाल)
  • बेबंदशाही (कब्जी + खंडोजी +संभाजी)
  • भाऊबंदकी (नाना फडणीस)
  • भावबंधन (घनश्याम)
  • भूमिकन्या सीता (सुमंत)
  • माझे घर (नाना)
  • रणदुंदुभी (जिवाजी)
  • रंभा (अण्णाप्पा)
  • राजरंजन (सय्यदअली)
  • राजसंन्यास (जीवाजीराव कलमदाने)
  • राक्षसी महात्त्वाकांक्षा (कोदंड + दुर्जय)
  • वहिनी (विष्णूपंत)
  • विद्याहरण (युवराज + शुक्राचार्य)
  • वैजयंती (विश्वपालकाका)
  • शहा शिवाजी (रणदुल्लाखान)
  • शारदा (श्रीमंत भद्रेश्वर दीक्षित)
  • शिवसंभव (जाधवराव)
  • संन्यस्त खड्ग (विक्रमसिह)
  • लेखक - वा.वा. भोळे यांचे 'सरला देवी' (?)
  • साक्षीदार (दादासाहेब सहस्रबुद्धे)
  • सत्तेचे गुलाम (हेरंबराव)
  • स्वर जुळता गीत तुझे (साने)
  • स्वामिनी (केशवकाका)
  • हाच मुलाचा बाप (रावबहादुर)

(अपूर्ण)

मामा पेंडसे यांनी केलेल्या नाटकांतील विविध भूमिका

संपादन
भूमिका नाटक
अण्णाप्पा रंभा
अमात्य चंद्र नभीचा ढळला
अश्विन शेठ/फाल्गुनराव संशयकल्लोळ
आचार्य तुझे आहे तुजपाशी
उमरखान/जयसिंग आग्ऱ्याहून सुटका
कब्जी/खंडोजी/संभाजी बेबंदशाही
कर्कशराव/वारोपंत/राघोपंत खडाष्टक
केशवकाका स्वामिनी
कोदंड/दुर्जय राक्षसी महत्त्वाकांक्षा
खंडोजी/संभाजी/कब्जी बेबंदशाही
घनश्याम भावबंधन
जगदेवराव चंद्रग्रहण
जयसिंग/उमरखान आग्ऱ्याहून सुटका
जाधवराव शिवसंभव
जिवाजी रणदुंदुभी
जीवाजीराव कलमदाने राजसंन्यास
तात्या आशीर्वाद
दादासाहेब कन्या सासुरासी जाये
दादासाहेब देव नाही देव्हाऱ्यात
दादासाहेब सहस्रबुद्धे साक्षीदार
दीनानाथ पडछाया
दुर्जय/कोदंड राक्षसी महत्त्वाकांक्षा
नाना भाऊबंदकी
नाना माझे घर
नाना(बाबा) एक होता म्हातारा
नाना फडणीस तोतयाचे बंड, भाऊबंदकी
पंत दुरिताचे तिमिर जावो
प्रतापराव त्राटिका
बाप्पा कुलवधू
बाबा वाहतो दुर्वांची ही जुडी
बाबा(नाना) एक होता म्हातारा
बाबासाहेब झुंज
भद्रेश्वर दीक्षित/श्रीमंत शारदा
भूपाल पुण्यप्रभाव
युवराज/शुक्राचार्य विद्याहरण
रणदुल्लाखान शहा शिवाजी
रावबहादुर हाच मुलाचा बाप
विक्रमसिंह संन्यस्त खड्ग
विजय
विश्वपालकाका वैजयंती
विष्णूपंत वहिनी
विश्वपाल वैजयंती
विश्वनाथ आंधळ्यांचीशाळा
शहाजहान पंडितराज जगन्नाथ
शिवाजी करीन ती पूर्व
शुक्राचार्य/युवराज विद्याहरण
श्रीमंत/भद्रेश्वर दीक्षित शारदा
संभाजी/खंडोजी/कब्जी बेबंदशाही
सय्यदअली राजरंजन
साने स्वर जुळता गीत तुझे
सुमंत भूमिकन्या सीता
सोमण कथा कुणाची व्यथा कुणाला
हणमंतराव कोणे एके काळी
हेरंबराव सत्तेचे गुलाम

मामा पेंडसे यांचा अभिनय असलेले मराठी चित्रपट

संपादन
  • तोतयाचे बंड
  • शिवसंभव

मामा पेंडसे यांनी दिग्दर्शित केलेली नाटके

संपादन
  • सत्तेचा गुलाम
  • सवाई माधवरावांचा मृत्यू .

आत्मचरित्र

संपादन

मामा पेंडसे यांनी ’केशराचे शेत’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.

मामा पेंडसे यांना मिळालेले सन्मान

संपादन

मामांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार

संपादन
  • मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे दरवर्षी सर्वोत्कृष्ट कलावंतासाठी मामा पेंडसे पारितोषिक देण्य्यात येते. २०१२ साली हे पारितोषिक दिलीप प्रभावळकर यांना मिळाले.
  • मुंबई ग्रंथसंगहालयाचा उत्कृष्ट नाट्यलेखनाचा मामा पेंडसे पुरस्कार प्रा. अनिल सोनार यांच्या ’प्रतिकार’ या नाटकाला मिळाला आहे.
  • मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे मामा पेंडसे पुरस्कृत नटवर्य केशवराव दाते पारितोषिक दिले जाते. हे पारितोषिक २०१४ साली रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष राम जाधव यांना प्रदान झाले.
  • मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा उत्कृष्ट कलावंतासाठीचे नटवर्य मामा पेंडसे पारितोषिक रिमा लागू यांना यांना तर उत्कृष्ट नाटककाराचे पारितोषिक इरावती कर्णिक यांना मिळाले (२०१४).
  • मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे मामा पेंडसे पारितोषिक नाट्यकलावंत चिन्मय मांडलेकर व अभिराम भडकमकर यांना मिळाले आहे.
  • मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा मामा पेंडसे पुरस्कार श्री चिंतामणी संस्थेच्या 'मायलेकी' या नाटकासाठी संजय पाटील यांना प्रदान करण्यात आला.(२०१३)
  • मॅजेस्टिक प्रकाशनाचा उत्कृष्ट नाट्याभिनयासाठीचा मामा पेंडसे पुरस्कार वीणा जामकर यांना मिळाला आहे.