महिला दिन

निःसंदिग्धीकरण पाने

महिलांना धार्मिक स्वातंत्र देण्याचे कार्य सर्व प्रथम महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केले. त्यांनी स्त्री समतेचा पाया घातला.

स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

   एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत, स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री, असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता. म्हणूनच, समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार, तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या. मात्र, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर, आपल्यावर होणारा अन्याय, आपले हक्क याबाबत स्त्रियांमधे सजगता येऊ लागली. त्यातूनच स्त्रीवादाचा जन्म झाला. स्त्रीवाद किंवा फेमेनिझम हा मूळ फ्रेंच शब्द. तो जेव्हा पहिल्यांदा वापरला गेला, तेव्हा त्याची सर्वत्र टर उडवली गेली. आणि कमाल म्ह्णजे राणी व्हिक्टोरियाही या चेष्टेत सामील होती, तिने स्त्रीवाद म्हणजे मूर्खता, पाप आणि महाचूक अशी त्याची संभावना केली.

      मुळात, नोकरीसाठी स्वेच्छेने अथवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी असलेली लिंगविषमता खटकू लागली. पुरुषांइतकेच काम करूनही वेतनात समानता नव्हती किंवा समान संधीही उपलब्ध नव्हत्या. आणि मग आपल्या हक्कांबाबत स्त्रिया जागृत होऊ लागल्या. स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्यांनी केले त्यातल्या काही स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण सदैव कृतज्ञ असणे आवश्यक आहे.

       स्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहिर उच्चार झाला तो मेरी वोल्स्टनक्राफ्ट या तत्त्ववेत्तीने लिहिलेल्या  ' A Vindication of the Rights of Woman (1792)' या पुस्तकातून. सन 1792 मधे तिने अतिशय स्पष्ट्पणे लिहिले होते की, ' स्त्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करूनच केली जाते. त्यामुळे पुरूषांना काय आवडते हे 'संस्कार' या नावाखाली तिच्या मनावर ठसविले जाते, पण स्वतःला मनापासून काय आवडते, ते ठरवून निर्णय घेण्याची सोडाच, त्याचा नुसता विचार करण्याची कुवतही ती गमावून बसते.' मुळात 1792 सालात असे विचार मांडणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे होते. या परखड आणि धाडसी विचारांमुळे मेरीला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते.

      दुसरे महत्त्वाचे नाव आहे ते एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन. यांनी पहिल्या 'विमेन्स राईट्स कन्व्हेन्शन'ची स्थापना केली. याशिवाय, स्त्रियांना नोकरी करता यावी, विद्यापीठांमधे प्रवेश मिळावा म्हणून मरियन हाईनिश या ऑस्ट्रियन महिलेने प्रथम लढा उभारला. तर, केट शेफर्ड यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून न्यूझिलंडच्या सुफ्राजेट कार्यकर्तीच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारला. १८९३ साली न्यूझिलंडमधे झालेल्या राष्ट्रीय निवडणूकीमधे पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार बजावता आला. पुढे अनेक देशांमधे मतदानाच्या अधिकारासाठी लढे उभारले गेले. ब्रिटनमधे, एमिलिन पॅन्खर्स्ट हिने महिलांच्या मतदानाच्या अधिकरासाठी स्त्रीवादी चळवळ उभारली. कॅरोलिन एगान हे नाव तर प्रत्येक स्त्रिने लक्षात ठेवावे, असे आहे. कारण, मुले जन्माला घालण्याचा स्त्रियांचा अधिकार त्यांना सर्वार्थाने बजावता यावा यासाठी अद्यापही सुरूच असलेल्या लढ्याची ती पहिली पुरस्कर्ती.

      महिला दिनाच्या संदर्भातील काही घटनाही कालक्रमाने पाहणे, उचित ठरेल.

      एक प्रवाद असा आहे की, दि. . 8 मार्च 1857 रोजी, न्युयॉर्क येथील वस्त्रोद्योगातील महिला कामगारांनी जो निषेध नोंदविला होता, त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो, परंतु, ती निव्वळ कपोलकल्पित कथाच असल्याचे आता आढळून आले आहे.

      त्यामुळे, दि. 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्युयॉर्क येथे, थेरेसा मालकियल यांच्या मार्गदर्शनाखाली ' सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका' यांनी आयोजित केलेला महिला दिन, हा अगदी पहिला महिला दिन होता, असे मानले जाते.

  कोपनहेगन, डेन्मार्क येथे सन 1910 मधे, आंतरराष्ट्रीय महिला परिषद घेण्यात आली. वार्षिक महिला आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याबाबत एक ठराव मांडण्यात आला, मात्र, या परिषदेत कोणतीही तारीख निश्चित करण्यात आली नाही.परिषदेसाठी जमलेल्या प्रतिनिधींनी ( 17 देशातील 100 महिला ) मतदानाच्या अधिकारासह समान अधिकारांचे संवर्धन या संकल्पनेस धोरणात्मक मान्यता दिली.

    नंतरच्या वर्षी 8 मार्च 1911 रोजीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन, ऑस्ट्रीया,डेन्मार्क,जर्मनी आणि स्विट्झर्लंड येथील दहा लाखापेक्षा अधिक लोकांच्या सहभागाने विशेष उल्लेखनीय ठरला. एकट्या ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्यात जवळपास 300 निदर्शने झाली.पॅरिस परगण्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ   व्हिएन्नामधे रिंगस्ट्रास येथे महिलांनी हाती फलक घेऊन संचलन केले. स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा,त्यांना सरकारी नोकरीची संधी मिळावी अशा मागण्या त्यांनी केल्या तसेच, नोकरीतील लिंगविषमतेचा त्यांनी निषेध केला.   

    त्यानंतर, अमेरिकेत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

   रशियात तत्कालिन वापरात असलेल्या ज्युलियन कॅलेंडरनुसार, सन 1913 मधे रशियन महिलांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या शनिवारी महिला दिन साजरा केला.

   अशारितेने, सन 1914 सालापर्यंत महिला संप करीत होत्या, मोर्चे काढत होत्या किंवा निषेध नोंदवित होत्या, तरीही यापैकी एकही घटना 8 मार्चला घडलेली नाही.

     मग 8 मार्चच का ?

      तर, सन 1914 मधे 8 मार्चला रविवार होता. या कारणाने कदाचित, आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चला आयोजित करण्यात आला असावा आणि नंतर ती प्रथाच पडून गेली..

           दि. 8 मार्च 1917 या दिवसाचे मात्र, विशेष महत्त्व आहे. ग्रेगेरियन कॅलेंडरमधील, दि. 8 मार्च 1917 रोजी, पॅट्रॉग्राड या रशियन साम्राज्याच्या राजधानीत, वस्त्रोद्योगातील स्त्री कामगारांनी संपूर्ण शहरभर निदर्शने केली. ही रशियन राज्यक्रांतीची सुरुवात मानली जाते. सेंट पिट्सबर्ग मधील महिला ' ब्रेड व शांतता' या मागणीसाठी संपावर गेल्या. त्यांनी पहिले महायुद्ध समाप्त करण्याची, रशियातील अन्न तूटवडा संपुष्टात आणण्याची तसेच झारशाहीचा अंत करण्याची मागणी केली.लिओन ट्रॉटस्कीने लिहिले आहे की, ' 23 फेब्रुवारी (8 मार्च) हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस होता. महिलांच्या बैठका, कारवाया यांचा पूर्वअंदाज जरी होता तरी हा महिला दिन रशियन राज्यक्रांतिची नांदी असेल, अशी पुसटशी कल्पना कोणालाही आली नव्हती. या दिवशी, व्यवस्थेच्या विरोधात जाऊन, सगळे आदेश झुगारून अनेक वस्त्रोद्योग कारखान्यातील स्त्री कामगार आपापले काम सोडून कारखान्यातून बाहेर पडल्या, संपाला पाठिंबा मिळविण्यासाठी, त्यांनी ठिकठिकाणी प्रतिनिधी पाठविले; त्याची परिणीती सामुदायिक संपात झाली. सर्व स्त्री कामगार लढ्यासाठी रस्त्यावर उतरल्या. सात दिवसानंतर रशियन सम्राट- दुसरा निकोलस याला पायउतार व्हावे लागले. सत्तेवर आलेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार मंजूर केला.'

  सन 1917 मधे झालेल्या रशियन राज्यक्रांती नंतर व रशियाने स्वीकार केल्यानंतर हा दिवस जगभरातील साम्यवादी देशांत व चळवळीत साजरा केला जाऊ लागला. चीनमधील साम्यवादी, सन 1922 पासून तो साजरा करतात.

   संयुक्त राष्ट्रांनी, आंतरराष्ट्रीय महिला वर्षापासून म्ह्णजेच 1975 पासून आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. सन 1977 मधे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, सदस्य राष्ट्रांना आमंत्रित करून घोषित करण्यात आले की, 8 मार्च हा संयुक्त राष्ट्रांचा महिला हक्क व शांतता दिन असेल.

       एकोणीसाव्या शतकात, जगभरातील स्त्री वादी चळवळीने जोर धरला होता, त्याचवेळी भारतातही अनेक समाजधुरिणांनी स्त्रीवर होणा-या अन्यायाला वाचा फोडली. त्यामध्ये राजा राम मोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरून चालणार नाही.

      सतीप्रथा, केशवपन,बालविवाह अशा अनेक वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. स्त्री शिक्षण, विधवा पुर्विवाह तसेच प्रौढ विवाह असे अनेक विषय समाजासमोर मांडण्यात येऊ लागले. त्याचेच फलित म्हणून विवाहाच्या वेळी मुलाचे किमान वय 16 ते 18 तर मुलीचे किमान वय 10 ते 12 असावे अशी तरतूद करण्यात आली.

     स्त्री शिक्षणाच्या चळवळीनेही जोर धरला. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले व भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळविलेल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले, यांचे योगदान फार मोठे आहे. समाजाचा प्रखर विरोध व त्यातून उद्भवलेल्या अनंत अडचणींना तोंड देत या पती-पत्नीने स्त्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घातला.

     स्त्रिया विविध सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक विषयांमधे सहभागी होऊन आपले मत व्यक्त करू लागल्या

       सन 1902 मधे रमाबाई रानडे यांनी ' हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब'ची स्थापना केली तर 1904 मधे ' भारत महिला परिषदे'ची स्थापना झाली.या संघटना महिलांच्या अनेक समस्या व मागण्या यांचा पाठपुरावा करू लागल्या. त्यातूनच, प्रथम, संपत्तीदार स्त्रियांना मतदानाचा अधिकार, मग स्त्रियांना मतदानाबरोबरच निवडणूकीला उभे राहण्याचा अधिकार अशा सुधारणा सन 1935 पर्यंत होत गेल्या. भारतात 1943 साली पहिला महिला दिन साजरा करण्यात आला.

       स्वातंत्र्यानंतर, 1950 सालापासून भारतीय राज्य घटनेने, स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला आहे. 

    संयुक्त राष्ट्रांनी सन 1975  हे जागतिक महिला वर्ष घोषित केले जे भारतातही साजरे झाले. 8 मार्च हा महिला दिन, जगभरातल्या अनेक देशांप्रमाणेच भारतातही साजरा केला जातो.

    मेरी वोल्स्टनक्राफ्ट यांच्यापासून सन 1792 मधे सुरू झालेला हा लढा गेली 225 वर्षे चालू आहे. या प्रदीर्घ कालावधीत स्त्रियांना शिक्षणाचा, संपत्तीचा,मतदानाचा, असे वेगवेगळे अधिकार मिळाले. महिला समानाधिकाराची बाब सर्व जगाने मान्य केली आहे. त्यामुळे, आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत, असेही चित्र दिसते आहे.. पण वास्तव खरच तसे आहे का, कारण 'मी टू' सारखी चळवळ सा-या जगभर मूळ धरत आहे, याचा विचारही याप्रसंगी करणे, आवश्यक वाटते

हे सुद्धा पहा

संपादन