महाराष्ट्र मंडळ, कतार
कतार महाराष्ट्र मंडळ हे कतार देशातील सामाजिक संस्था आहे. कतार महाराष्ट्र मंडळाची स्थापना १९९५ सालच्या चैत्र महिन्यात दोहा येथे झाली. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच दरवर्षी चैत्र महिन्यात या चैत्रमास या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मंडळातील सभासदांच्या कला गुणांना वाव करून देण्यासाठी मंडळाने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यावर सभासदांपैकी अनेकजण आपल्या कलाकृती गायन, संगीत, नृत्ये, नाटिका यांच्या माध्यमातून त्या दिवशी या सोहळ्यात सादर करतात.
या वर्षी-२०१६ साली, कतारच्या महाराष्ट्र मंडळाचा शुक्रवार दिनांक २२ एप्रिल रोजी 'चैत्रमास २०१६' हा स्नेहसंमेलन सोहळा दोहा स्थित एमईएस इंडियन स्कूलच्या हॉलमध्ये पार पडला. नवनवीन संकल्पना घेऊन आलेला हा सोहळा या वर्षीच्या कतार महाराष्ट्र मंडळाच्या अनेक उपक्रमातील दीर्घ काळ स्मरणात राहील असा ठरला.
२०१६ साली चैत्र महिन्याचा कालावधी इग्रजी महिन्यानुसार २४ मार्च ते २२ एप्रिल पर्यंत होता. याच महिन्यात कतार महाराष्ट्र मंडळाला २० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने 'चैत्रमास २०१६' भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला गेला. सालाबादप्रमाणे यंदाही या सोहळ्यात समस्त मराठी समाज एकवटला होता. यंदाच्या या सोहळ्याला आपले कला गुण सादर करण्यासाठी सहभाग घेणाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. यावर्षी तब्बल २३७ प्रवेशिकांची विक्रमी नोंद झाली होती. यात बालवयातील मुलांसहित ते अगदी ७३ वर्षांपर्यंतच्या सभासदांचा देखील समावेश होता. दुपारी दोन वाजता सुरू झालेला हा कला सादरीकरणाचा कार्यक्रम रात्री ११ वाजेपर्यंत चालला. संपूर्ण सोहळ्यादरम्यान समितिचे सर्व पुरुष व महिला सदस्य पेशवेकालीन पुणेरी धाटणीच्या महाराष्ट्रीय वेशभूषेत होते.
सुमारे आठ नऊ तास रंगलेल्या या कार्यक्रमात विविध स्वरूपाचे गायन, वादन, नृत्य आणि अभिनय यांचा अविष्कार उपस्थित श्रोत्यांना अनुभवता आला. प्रत्येक श्रेणीतील सादरीकरण हे विशेष तालीम करून बसविण्यात आल्याचे निदर्शनास येत होते. नृत्यांमध्ये शास्त्रीय संगीतावर आधारित नृत्ये, समूह नृत्य यातही लावणी, कोळी गीतांवर आधारित तसेच नागनागीण नृत्य आणि जुन्या नवीन चित्रपटांमधील गाण्यांवर आधारित एकेरी तसेच समूह नृत्यांचा समावेश होता. टाळ्या आणि शिट्या वाजवून प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकातून दाद मिळत होती. गायन या कला प्रकारातही एकेरी आणि द्वंद्व गीते तसेच समूह गीते सादर करण्यात आली. नाटिका, मिमिक्री तसेच नकला हे प्रकारही प्रेक्षकांची दाद मिळवून गेले. या व्यतिरिक्त विशेष लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालेले आणि नवीन संकल्पनांवर आधारलेले पैठणी साड्या परिधान करून सादर करण्यात आलेला फॅशन शो आणि प्रेमाला वय नसते या कल्पनेवर आधारित ४० ते ५० वर्षांवरील जोडप्यांचे पाश्चिमात्य धर्तीवर (पार्टी) समूह नृत्य हे दोन प्रयोग, तसेच 'मेक इन इंडिया' संकल्पनेवर आधारित नाटिका असे हे तीन प्रकार प्रेक्षकांनी उचलून धरले.
या शिवाय विशेष उल्लेखनीय अशा काही पेशकश पुढीलप्रमाणे: आम्ही ठाकर ठाकर, बिलानशी नागीण निघाली, गालावर कळी डोळ्यात धुंदी वगैरे गाण्यांवरील नृत्ये; पुलंनी लिहिलेल्या पंक्तीवर आधारित एकपात्री प्रवेशिका, बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने त्याना अभिवादन करण्यासाठी एका पोवाडा, वगैरे वगैरे.
दुपारी दोन वाजता समर्थ रामदास यांच्या श्लोकांनी सुरू झालेल्या या सोहळ्याची सांगता रात्री ११ च्या सुमारास संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने झाली.