चॅनिडी या मत्स्यकुलात मोडणारे हे मासे भारतातील सर्व नद्यांमध्ये व जलशयांत आढळतात. महाराष्ट्रात मरळींच्या मुख्यत्वे चार जाती आहेत. त्यांना अनुक्रमे चॅना मरूलियस (मरळ किंवा फुलमरळ), चॅ स्ट्राएटस (पट्टमरळ किंवा धडक्या),चॅ पंक्टॅटस (बोटरी मरळ) व चॅ.गाचुआ (डाकू, डोक किंवा डोकऱ्या) असे म्हणतात. मरळींचे डोके सापाच्या डोक्यासारखे चपटे असल्यामुळे यांना इंग्रजीत ऑफिओसेफॅलस वा स्नेकहेडेड फिश असे म्हणतात.या कुलास पूर्वी ऑफिओसेफॅलिडी हे नाव दिले होते; परंतु आता चॅनिडी हे नाव प्रचारात आहे.

फुलमरळ हा या वंशातील सर्वात मोठा होणारा म्हणजे २ मी. लांबीपर्यंत वाढणारा आहे. त्यानंतर पट्टमरळ हा ५५ सेंमी. तर धडक्या ३० सेंमी. लांबीपर्यंत वाढतो. डाकू हा सर्वात लहान म्हणजे जास्तीत जास्त २० सेंमी. लांब होणारा मासा आहे. धडक्या पश्चिम महाराष्ट्रात क्वचितच मिळतो; मात्र विदर्भ व उत्तर भारतात तो सर्वत्र आढळतो. मरळ माशाच्या डोक्याचा आकार हा सापाच्या डोक्यासारखा असतो म्हणून या माशास इंग्रजी मध्ये ‘स्नेकहेड’ असे म्हणले जाते. हा मासा सवयीप्रमाणे उथळ पाण्यात (तलाव, सरोवर) आढळतो. मरळ माशामधील झालेल्या विकासामुळे हा मासा हवेतील प्राणवायू श्‍वसनासाठी वापरतो. हा मासा पाण्याबाहेर काही तास ते काही दिवस जिवंत जगू शकतो व एका पाण्याच्या तळ्यातून जमिनीवरून रेंगाळत जाऊन दुसऱ्या पाण्याच्या तळ्यामध्ये जाऊ शकतो. कमी पाण्यातही हा मासा काही दिवस जगू शकतो. मरळ हा मासा गोड्या पाण्यातील अतिशय प्रचलित मासा असून, भारतात बऱ्याच ठिकाणी गोड्या पाण्यात या माशाचे वास्तव्य बघावयास मिळते. मरळ माशास बाजारात अत्यंत मागणी आहे. हा मासा चविष्ट असून, त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात व काटे कमी असतात. अत्यंत मांसभक्षक असल्याकारणांमुळे मरळ माशाचे संवर्धन दुसऱ्या माशांसोबत करण्याचे टाळावे.

वैशिष्ट्ये

संपादन
  • मरळ माशाचे डोके सापाच्या डोक्याच्या आकारासारखे दिसते. डोके खवल्यांनी आच्छादलेले असते व ते वरच्या भागास तबकडीसारखे दिसते. मरळ माशाच्या पाठीवरचे, गुदपर व जोडीतील पर मोठे व काटे विरहीत असतात.
  • भारतामध्ये मरळ जातीचे मासे नदी, तळे, पाणी साठवणीची जागा, कृत्रिम तलाव, लहान सरोवर, दलदलीच्या भागात इ. ठिकाणी सापडतात.
  • मरळ माशाची जैवरासायनिक जडनघडन जातीजाती प्रमाणे वेगवेगळी सापडते; पण साधारणपणे मरळ माशामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक तर कॅल्शिअम व चरबीचे कमी प्रमाणात असते.
  • भारतामध्ये मरळ माशाच्या संवर्धन करण्यासाठी मुख्यतः महाकाय मरळ, पट्टेरी मरळ, ठिपकेदार मरळ या तीन जातींचा वापर केला जातो.

संदर्भ

संपादन

[] []

  1. ^ http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92e93e938947/92e930933
  2. ^ http://mr.vikaspedia.in/agriculture/fisheries/91593093e-92e930933-92e93e93693e91a947-93890293593094d927928