मधुसूदन विष्णू कौंडिण्य

(मधुसूदन विष्णू कौण्डीण्य या पानावरून पुनर्निर्देशित)

मधुसूदन विष्णू कौंडिण्य उर्फ मामा कौंडिण्य (मार्च १७, १९३३ - जानेवारी २८, २०१३) ह्यांचा जन्म नशिराबाद, जळगाव (खानदेश) येथे झाला होता. अर्थशास्त्रात एम.ए. झाल्यावर ते १९५८मध्ये अहमदनगर महाविद्यालयात लेक्चरर म्हणून रुजू झाले. साने गुरुजींचा त्यांना प्रत्यक्ष सहवास व प्रेम लाभला होता आणि त्यामुळे ते आयुष्यभर मुलांच्या शिक्षणासाठी झटले.

म.वि. कौंडिण्यांच्याच पुढाकाराने संगमनेर महाविद्यालयाची १९६१ साली स्थापना झाल्यावर ते त्या कॉलेजचे प्राचार्य झाले, आणि सलग ३२ वर्षांनंतर १९९३साली निवृत्त झाले. या काळात त्यांनी अनेक शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम राबवले. वंचितांच्या शिक्षणासाठी आणि समाजोन्नतीसाठी त्यांनी विविध असे १५ प्रकल्प राबविले.

१९९९साली पुण्यात आल्यावर, पुण्याजवळील सूस व आसपासच्या दोन गावांमध्ये कौंडिण्य यांनी समाजकार्य सुरू केले. कचरा गोळा करणाऱ्या महिलांना संघटित करून त्यांनी सरकारकडून त्यांना जागा मिळवून दिली, त्या जागेवर घरकुले उभे करून त्यांना हक्काची घरे दिली व त्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शाळा काढली.

१९९३ साली कौंडिण्य यांना, त्यांच्या शिक्षणविषयक योगदानाबद्दल चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

मधूसूदन विष्णू कौंडिण्य यांची कारकीर्द

संपादन
  • १९५८-१९६१ - अहमदनगर महाविद्यालयात अर्थशास्त्राचे व्याख्याते.
  • १९६१-९३ - संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य
  • १९६३-६६ - शालान्त परीक्षा मंडळाचे सभासद.
  • १९६८-७२ - पुणे विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य.
  • १९७६-७९ - पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता.
  • १९८० - "दर्शन' या आर्थिक सामाजिक संदर्भ ग्रंथाचे संपादन.
  • १९९० - प्राचार्य कोगेकर अमृतमहोत्सव ट्रस्टतर्फे "आदर्श शिक्षक' पुरस्कार.
  • १९९१ - पु. ल. देशपांडे प्रतिष्ठानतर्फे कार्यासाठी बारा लाख रुपयांचे अनुदान. जी. डी. पारीख ॲवॉर्ड.
  • १९९२ - एस. व्ही. कोगेकर ॲवॉर्ड.
  • १९९३ - "चतुरंग'तर्फे शैक्षणिक कार्यासाठी जीवनगौरव पुरस्कार
  • १९९४ - साक्षरता कार्यासाठी इंडियन मर्चंट्‌स चेंबर्स ॲवॉर्ड. (एक लाख रुपये)
  • १९९५ - ऐतिहासिक संग्रहालय ॲवॉर्ड
  • २००६ - ज्ञान-विज्ञान पुरस्कार

कौंडिण्य यांची सामाजिक कार्ये

संपादन
  • प्रवर्तक - मुक्तांगण स्वायत्त विद्यापीठ
  • प्रवर्तक - धनंजयराव गाडगीळ प्रतिष्ठान
  • प्रवर्तक - अथश्री ग्रामीण विकास केंद्र
  • निर्मिती - आदिवासी, विडी कामगार, लहान शेतकरी, रामोशी, पारधी आदींसाठी १५ विविध ग्रामीण विकास प्रकल्प.
  • सदस्य - नियोजन मंडळ, उच्च शिक्षण अभ्यास गटाचे सदस्य (नवी दिल्ली)
  • विश्वस्त - कुसुमाग्रज प्रतिष्ठान (दहा वर्षे)
  • विश्वस्त - भास्करराव दुर्वे प्रतिष्ठान (पाच वर्षे)

संदर्भ

संपादन