मधुकर विश्वनाथ लिमये
मधुकर विश्वनाथ लिमये (जन्म : १९२४; - ४ नोव्हेंबर, २०१५) हे ईशान्य भारतातल्या आसामच्या निरनिराळ्या भागांमध्ये ६० वर्षे वस्तव्य करून राहिलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. एखाद्या सेवाव्रती व्यक्तीप्रमाणे त्यांनी संघाचे कार्य तेथे रुजवले अणि वाढवले. तेथील लोकांना भारतीयांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्याचे जीवनमान उंचवण्यासाठी संघाकडून होत असलेल्या कार्यात त्यांचे मोठे योगदान होते.
मुंबईत गिरगावात रहात असताना मधुकर लिमये अगदी लहान वयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. मुंबई विद्यापीठातून १९४८ साली एम.एस्सी. झाल्यावर त्यांनी संघाच्या पूर्णवेळ प्रचारकाचे काम स्वीकारले. त्यांना महाराष्ट्राच्या पालघर तालुक्यात काम करायला पाठविण्यात आले. दोनच वर्षांनी म्हणजे १९५० साली मधुकररावांना संघकार्यासाठी ईशान्य भारतात पाठविले गेले. संघावर बंदी असलेल्या कालखंडात ईशान्य भारताच्या दुर्गम भागांत आणि भारतीय उपखंडातील लोकांपासून मनाने दुरावलेल्या लोकांच्या प्रदेशात, त्यांनी नौगाव या छोट्या शहरापासून अत्यंत खडतर वातावरणात आपल्या कार्याला सुरुवात केली, आणि त्यानंतर कोणतेही स्वयंचलित वाहन हातात नसताना आणि सार्वजनिक वाहतुकीची कोणतीही सोय नसताना, केवळ सायकलीवरून आसामच्या दूरदूरच्या कोपऱ्यांपर्यंत पोहोचून मधुकर लिमयेंनी संघ प्रचारकाचे काम आणि अन्य समाजकार्य केले. आसाम हे त्यांचे मूळ घरच झाले होते.
मधुकर विश्वनाथ लिमये यांना मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी या भाषा उत्तम येत असत. आसामात गेल्यावर ते बंगाली आणि आसामी भाषा शिकले. मधुकर लिमये स्वतः: एक प्रतिभावान कवी असून संवेदनशील लेखक होते. त्यांनी आसामी भाषेत ‘अलोक’ नावाचे साप्ताहिक सुरू केले. ते गोहत्तीहून प्रसिद्ध होत असे.
मधुकर लिमये यांनी आपल्या अनुभवांवर आधरित ‘खट्टी मिठ्ठी यादे’ नावाचे हिंदी पुस्तक लिहिले आहे. त्याचा ’आंबट गोड आठवणी’ नावाचा मराठी अनुवाद कु. शिल्पा शशिकांत वाडेकर यांनी केला आहे.
हे पुस्तक म्हणजे हा आसामच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघकार्याचा इतिहास नसून विसाव्या शतकाच्या मध्यात आसामात आलेल्या एका कार्यकर्त्याच्या अनुभवांचे हे चित्रण आहे. पुस्तक वाचून आसामच्या संघकार्यात सुरुवातीला आलेल्या अडचणी, तसेच मिळालेला पाठिंबा ह्या दोन्हींची जाणीव वाचकाला होऊ शकेल. संघकार्याच्या कालखंडाचा प्रत्यक्षदर्शी अशी लेखकाची भूमिका आहे. पुस्तक वाचून आसामात कार्य करायला येणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांना एखादा संदेश मिळावा अशी लेखकाची अपेक्षा आहे. आपल्या सर्व अनुभवांना अभिव्यक्त करणे लेखकाला शक्य नसल्याने त्याने काही निवडक घटनांचा समावेश केला आहे. यात तत्कालीन परिस्थिती, संकटे, आव्हाने याचे वर्णन आहे. कार्यकर्ता म्हणून लेखकाचा कस कसाकसा लागत गेला, याचे हे प्रांजल कथन आहे.
१९४८ च्या संघबंदीनंतर पंजाबहून रामसिंह ठाकूर यांची आसाम प्रांत प्रचारक म्हणून नियुक्ती झाली. त्या मागोमाग मधुकरराव लिमयांसह अन्य काही प्रचारक येथे आले. १९५०मध्ये झालेल्या भयावह भूकंपामुळे तेथील जनजीवन अस्ताव्यस्त झाले होते. पूर्व पाकिस्तानातून हजारो हिंदू शरणार्थी आसाममध्ये आश्रयास आले होते. त्यामुळे येथे पूर्वापार चालत असलेले भाषिक वैमनस्य तीव्र होऊ लागले. घुसखोर बांगला भाषिक मुसलमान या आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करीत होते. ह्या परिस्थितीचे संक्षिप्त वर्णन प्रस्तुत पुस्तकात आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी अज्ञान व अपप्रचाराला देखील संघाला तोंड द्यावे लागले. मधुकररावांच्या मागे बंदूक घेऊन जाण्याचे अथवा खोटे आरोप लावून त्यांना कोर्टात खेचण्याचे प्रयत्न झाले. या परिस्थितीतून मार्ग काढून विरोधकांना संघानुकूलच नव्हे तर कार्यकर्ते कसे बनवले याचा उल्लेख पुस्तकात आहे. तळागाळातील तरुणांना हाताशी धरून संघसंस्कारातून कार्यकर्ता कसा घडू शकतो, याचे वर्णन या पुस्तकात आहे. कार्यकर्त्यांच्या कमतरतेमुळे निराश, होणाऱ्या प्रचारकांना ‘निर्वाहः प्रतिपन्न वस्तुषु’ (हाती घ्याल ते तडीस न्या) म्हणून मधुकरराव धीर देत असत.
‘स्वान्त सुखाय’ लेखन या भूमिकेतून केलेल्या या लेखनातील लेखकाच्या अनुभवांमुळे नवीन कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्याची दिशा मिळेल तसेच समस्यांना भिडण्याचे धैर्य प्राप्त होईल. सर्वसामान्य लोकांना संघाची ओळख व संघ स्वयंसेवकांना कार्य करण्याची दिशा व चालना देण्यास हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
अन्य भारतीयांच्या मनात ईशान्येकडील राज्यांतील रहिवाश्यांबद्दल आपलेपणाची भावना रूजविण्यासाठी या आठवणी उपयुक्त आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य, त्याचे महत्त्व आणि स्वसुखावर तुळशीपत्र ठेवून राष्ट्रभक्तीसाठी त्याग करणाऱ्या प्रचारकांचे जीवन याची माहिती या आठवणीतून मिळते.
पुरस्कार
संपादन- उत्तर प्रदेश सरकारने तत्काली पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते मधुकररावांना साहित्यिक पुरस्कार दिला.
- ‘माय होम इंडिया’ने त्यांना ‘वन् इंडिया पुरस्कार’ दिला.