एका आटपाट राज्यात एका पराक्रमी न्यायनिष्ठ राजाने आपल्या महालाबाहेर एक मोठी घंटा ठेवली होती. कोणीही सामान्य माणसाने तिथं यावं व ती घंटा वाजवून राजाकडे न्याय मागावा अशी त्या मागची राजाची न्यायव्यवस्था होती. एकदा एक अत्यंत हडकुळा, अशक्त बैल रस्त्याने जाता-जाता महालाबाहेरील हिरव्या वेलीची पानं खाऊ लागला. वेलीच्या बाजूलाच लोंबकळत असलेली त्या न्यायाच्या घंटेची दोरी त्याच्या तोंडात आली व त्याने मान फिरवताच घंटा मोठ्याने वाजू लागली. पहारेकऱ्याने पाहिलं तर तिथं कोणीच व्यक्ती नव्हती मात्र तो दीनवाणा बैल तिथे उभा असल्याचं दिसलं. त्या बैलालाच पहारेकरी दरबारात घेऊन आला. बैलाला पाहताक्षणीच राजा वदला की, 'हा तर एक बैल आहे, तो काय बोलणार?' असं म्हणून त्याला सोडून देणार तोच दरबारातील मुख्य प्रधान पुढे सरसावला व म्हणाला, 'महाराज, या बैलाने घंटा वाजवली म्हणजे नक्कीच त्याची काहीतरी फिर्याद असणार. पहा, तो म्हातारा आहे. म्हणजे मालकाने त्याच्याकडून भरपूर काम करून घेतले व म्हातारपणी त्याला चाराही न देता वाऱ्यावर सोडून दिलं. याचा अर्थ त्याच्या मालकाने त्याच्यावर अन्याय केला आहे. महाराज, आपण या बैलाची परिस्थिती समजून घ्यावी व त्यास उचित न्याय मिळवून द्यावा'. प्रधानाचं हे म्हणणं राजाला मनोमन पटलं. त्याने तात्काळ त्या बैलाच्या मालकास बोलावून घेतलं आणि त्याने केलेल्या आपल्या बैलाच्या अवहेलनाबद्दल कठोर दंड ठोठावला. तात्पर्य - आपल्या मुक्या (पाळीव) प्राण्याने आपल्यावर केलेल्या उपकारांची जाणीव मनुष्याने कायम आपल्या उरात बाळगावी. भूतदया हीच ईश्वरसेवा, हे सर्वांनी जरूर लक्षात घ्यावं!-BY VARAD TODKAR