भुरा कोळसा
भुरा कोळसा तथा लिग्नाइट हा दगडी कोळशाचा एक प्रकार आहे. हा कोळसा पीट नावाच्या कोळशाइतका सच्छिद्र नसला तरी त्याच्यापेक्षा अधिक घट्ट आणि कठीण असतो, आणि सामान्य दगडी कोळशापेक्षा कमी घट्ट व कमी कठीण असतो. नुसत्या डोळ्यांनी ओळखू येतील अशा वनस्पतिज संंरचना याच्या बऱ्याचशा भागात नसतात, पण काही थोडे वनस्पतींच्या पानांचे किंवा सालींचे तुकडे असल्याचे सहज ओळखता येते. सूक्ष्मदर्शकाने पाहिले असता मात्र याच्यात वनस्पतिज पदार्थांचे कोशिकामय (पेशीमय) संरचना असलेले पुष्कळ तुकडे आढळतात. या कोळशाचा रंग तपकिरी ते काळा असतो. त्याचा कीस तपकिरी रंगाचा असतो. हा कोळसा फोडला तर त्याचे तुकडे वेडेवाकडे होतात. याच्यात बराच जलांश असतो. वाळल्यावर याचा सहज भुगा होतो.
क्रिटेशस (सुमारे १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात व तृतीय कल्पात (सुमारे ६.५ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) तयार झालेले लिग्नाइटचे मोठे साठे उत्तर अमेरिकेत व तृतीय कल्पात तयार झालेले तसेच साठे युरोपात आहेत. भारतात तमिळनाडू, कच्छ, राजस्थान आणि काश्मीर यांच्यातील काही क्षेत्रांत लिग्नाइटचे साठे आहेत. त्यांपैकी सर्वांत महत्त्वाचा साठा म्हणजे तमिळनाडूच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील नेव्हेली येथील होय. तो सुमारे २६० चौ. किमी. क्षेत्रात पसरलेला आहे. त्याच्यात लिग्नाइटचे पाच थर असून त्यांपैकी मधल्या थराची अधिकात अधिक जाडी २२.७ मीटर आणि सरासरी जाडी १५.२४ मीटर भरते. खाणकाम करून येथील लिग्नाइट काढले जाते [→ लिग्नाइट].