शिवराम एकनाथ भारदे

(भारद्वाज (लेखक) या पानावरून पुनर्निर्देशित)

शिवराम एकनाथ भारदे ऊर्फ भारद्वाज हे संत साहित्यावर साधक बाधक टीका करणारे मराठीतले एक चिकित्सक लेखक होते. त्यांचा जन्म ९ मे १८६२चा. ३ फेब्रुवारी १९२० रोजी ते निधन पावले. त्यांचे घराणे हरिदासाचे होते. स्वतः शिवरामबुवाही कीर्तनकार होते. बी.ए. झालेले भारदे अहमदनगरच्या विद्यालयात शिक्षक होते. मात्र, राजद्रोहाच्या संशयावरून त्यांना त्या शाळेतून काढून टाकले गेले. त्यानंतर ते अहमदनगरच्या मिशन स्कूलमध्ये संस्कृतचे शिक्षक म्हणून लागले.

शिवराम एकनाथ भारदे यांनी ’सुधारक’ या वर्तमानपत्रात भारद्वाज या टोपणनावाने १८९८-९९मध्ये ’ज्ञानदेव व ज्ञानेश्वर’ या नावाची एक लेखमाला लिहिली. ज्ञानेश्वरीकर्ते संत ज्ञानेश्वर आणि अभंगकर्ते ’बापरखमादेवीवर ज्ञानदेव’ या दोन वेगळ्या व्यक्ती असल्याचे त्यांनी या लेखमालेद्वारा सिद्ध करायचा प्रयत्‍न केला. या लेखमालेमुळे मराठी साहित्यिकांत एकच खळबळ माजली. आणि या विषयाचा सांगोपांग अभ्यास सुरू झाला. असा चिकित्सक अभ्यास करून तत्कालीन विद्वान भिंगारकरबुवा, ल.रा. पांगारकर, प्राचार्य दांडेकर, डॉ. पेंडसे, रा.द. रानडे व गजेंद्रगडकर यांनी भारदे यांच्या मताचे खंडन केले आणि ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर हे दोन्ही एकच असे प्रतिस्थापित केले. अजूनही अधूनमधून हा वाद उसळतो, आणि या विषयावर काही लेखक आपापली मते मांडतात.

ज्ञानेश्वरीविषयक रूढ समजुतींना धक्का देणारे भारदे, हे चिकित्सक संशोधक आणि टीकाकार होते. त्यांची मते वादग्रस्त असली तरी त्यांमुळे ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर यांच्यावरील संशोधनाला चालना मिळाली आणि संशोधकांना नवी दृष्टी प्राप्त झाली.

प्रकाशित साहित्य

संपादन
  • ज्ञानदेव व ज्ञानेश्वर (प्रकाशनवर्ष १९३१)

हे सुद्धा पहा

संपादन