भारतीय संस्कृती कोश हा भारताच्या संस्कृतीबद्दल माहिती देणारा आणि भारतीय संस्कृती कोश मंडळाने प्रकाशित केलेला दहाखंडी कोश आहे. हा कोश महादेवशास्त्री जोशी यांनी संपादित केला आहे.स्वतंत्र भारताला एका बृहत कोशाची गरज होती.महाराष्ट्रात आणि भारतात अनेक ज्ञानकोश आहेत पण केवळ भारतीय संस्कृतीच्या ज्ञानशाखा मांडणारा कोश तयार व्हावा या हेतूने भारतीय संस्कृती कोशाची निर्मिती झाली आहे. पं. महादेवशास्त्री जोशी हे या कोशाचे प्रमुख संपादक आहेत.

संस्कृती

संपादन

प्रकृती म्हणजे निसर्ग .विकृती म्हणजे त्यात होणारा विकार किंवा बिघाड.आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार किंवा बिघाड होऊ नये या उद्देशाने तिच्यावर करायचे विविध सम्यक् संस्कार होत. संस्कृतीचे स्थूल मानाने तीन विभाग-

१.आधिभौतिक-बाह्य विश्वावर संस्कार करून त्याला मानवाच्या उन्नतीसाठी उपकारक बनविणे,हा संस्कृतीचा आधिभौतिक विभाग होय.शेती,पशुपालन,स्थापत्य,धातुकाम,यंत्र निर्मिती,नगर रचना,औषधी संशोधन,अर्थोत्पादन आणि वितरण या सर्व गोष्टी आधिभौतिक या विभागात येतात.

२.आधिदैविक- भाग्य अनुकूल व्हावे,प्रयत्न सफल व्हावे, तसेच बाधा आणि संकटे निरस्त व्हावी या उद्देशाने देवतांची पूजा आणि प्रार्थना करणे ,जपतपादी आचरणे,मंत्र तंत्र आणि तोने टोटके करणे आणि या सर्व क्रियांच्या द्वारे विश्वाअंतर्गत अदृश्य अशा दैवी शक्तीचे साहाय्य प्राप्त करून घेणे या गोष्टी संस्कृतीच्या या विभागात येतात.

३. आध्यात्मिक- स्वतःच्या मन-बुद्धीवर संस्कार करून त्यांना आत्मदर्शनाची योग्यता प्राप्त करून देणे,हा संस्कृतीचा आध्यात्मिक विभाग होय.धर्म, तत्त्वज्ञान,नीतीनियम ,विद्या-कला,सद्गुण,शिष्टाचार ,संस्कार इ. सर्व गोष्टींचा अंतर्भाव संस्कृतीच्या आध्यात्मिक विभागात होत असतो.
[]

कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य

संपादन

धर्म, संस्कृती आणि जीवन या तीनही क्षेत्रांचा विस्तार आणि व्यापकता समान आहे.या तिन्हीचा आशय एकच;आणि तो म्हणजे सर्व अंगांनी अंतर्बाह्य विकसित झालेले मानव्य!व्यक्तित्व आणि मानव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.भारतीय संस्कृती या दोन्ही अंगांचा परिपोष करण्यासाठी प्रयत्नशील आहे. लौकिक अभ्युदयाची साधना करता करताच निःश्रेयसाची सिद्धी प्राप्त करणे आणि आधिभौतिकाचा योग्य तो मान राखून आध्यात्मिक मूल्यांची प्रतिष्ठापना करणे, हे भारतीय संस्कृतीचे उद्दिष्ट आहे म्हणून भारतीय संस्कृती कर्माला प्राधान्य देते. त्या कर्मात जिव्हाळा निर्माण व्हावा, म्हणून भक्तीचा आधार घेते आणि कर्मात उत्साहाचा झरा सतत वाहता रहावा म्हणून कलेलाही मान्यता देते.भारतीय संस्कृतीत चारित्र्याला विशेष रूपाने महत्त्व दिले गेले आहे.त्यासाठी संत-महंत,ऋषी-मुनी,तत्त्वज्ञानी, स्वार्थत्यागी आणि चारित्र्यवान व्यक्तींचा सन्मान करते आणि योग्य प्रसंगी त्यांचे स्मरण ही करायला सांगते.[]

कोशात समाविष्ट विविध विषय

संपादन
  • यज्ञसंस्था व तिची अंगोपांगे
  • वैदिक,स्मार्त,पौराणिक व अन्य धर्मीय लोक यांचे गृह्य आणि सामाजिक संस्कार
  • ग्रह,नक्षत्र,तिथी,वार यांच्या योगाने होणारी सर्व प्रकारची पर्वे
  • प्रांतीय व अखिल भारतीय सण व उत्सव
  • पुण्य तीर्थे,क्षेत्रे,सरोवरे
  • सर्व प्रकारची श्राद्धे
  • वर्णाश्रमादी कर्तव्ये आणि अधिकार
  • अखिल भारतीय निसर्ग उपासनेचे विविध प्रकार
  • निसर्ग आणि पशु पक्षी यांच्याशी मानवाचे सांस्कृतिक संबंध
  • अवतार, संत व सत्पुरुष यांचे जन्मोत्सव आणि पुण्यतिथी
  • पंथ-उप पंथांचे तत्त्वज्ञान
  • सर्व दार्शनिक मतवाद
  • विविध विद्या व कला
  • प्रादेशिक भाषा,त्यांचा विकास,साहित्य व लोकसाहित्य
  • वेद,वेदांगे, उपनिषदे या साहित्याचा परिचय
  • मूर्तीकला, चित्रकला व त्यांच्या शैली
  • प्रांतोप्रांतीच्या लोककला,खेळणी ,वेशभूषा,अलंकार इ.
  • संगीत-शास्रीय व जानपद
  • राष्ट्रीय महापुरुष []

संदर्भनोंदी

संपादन
  1. ^ भारतीय संस्कृती कोश (मार्च २०१०)प्रस्तावना
  2. ^ भारतीय संस्कृती कोश ,प्रस्तावना
  3. ^ भारतीय संस्कृती कोश (प्रस्तावना) मार्च २०१०