वस्तूंची निर्मिती करणाऱ्या उद्योगसंस्थाना आवश्यक असलेल्या मालाचा संग्रह व त्याचा कारखान्यातील निरनिराळ्या विभागांना पुरवठा कार्यक्षमतेने होण्यासाठी उभारलेले संघटन. भांडार संघटनाची पाच प्रमुख कार्ये असतात :

  1. आलेला माल त्याबरोबरच्या कागदपत्रांशी पडताळून पाहून व मोजून ताब्यात घेणे (२) तो जरूर तेव्हा उपलब्ध होऊन सहज हलविता येईल, अशा ठिकाणी भांडारात (वेअरहाउसमध्ये) व्यवस्थितपणे ठेवणे.
  2. तो जरूर तेव्हा उपलब्ध होऊन सहज हलविता येईल, अशा ठिकाणी भांडारात (वेअरहाउसमध्ये) व्यवस्थितपणे ठेवणे.
  3. भांडारात विविध मालाचा साठा गरजेनुसार ठेवून हानी, चोरी व खराब होणे यांसारख्या धोक्यांपासून त्याचे संरक्षण करण्याचे आटोकाट प्रयत्न करणे.
  4. भांडारातून मालाचा प्राधिकृत पुरवठा गरजू विभागांना करणे व मालाची कमतरता योग्य वेळी वरिष्ठांच्या नजरेस आणणे आणि (५) मालसूचि-कार्डावर मालाची आवक व जावक यांची तात्काळ नोंद करून त्यावर मालाचा शिलकी साठा किती, याची सदोदित नोंद ठेवणे.

भांडार संघटन करताना निरनिराळ्या प्रकारच्या मालासाठी वेगवेगळी भांडारे उभारावी लागतात. मोठमोठ्या कंपन्यांतून खालील मालासाठी स्वतंत्र भांडारे आढळतात : (१) कच्चा माल, (२) सुटे व जुळवणीपूर्व भाग, (३) रेखण सामग्री, (४) उपभोग्य वस्तू, (५) हत्यारे, (६) मापन सामग्री, (७) लेखन सामग्री, (८) अतिरिक्त माल व (९) पक्का माल. या प्रत्येक भांडारातील मालाचा संग्रह जागेची शक्य तेवढी बचत करून ठेवावा लागतो. त्याची आवक व जावक मालाचे नुकसान न होता शक्य तितक्या कमी त्रासाने व खर्चाने करता येईल, अशी दक्षता भांडार संघटकांना घ्यावी लागते. त्यासाठी ह्या विविध भांडारांची कारखान्यातील स्थलनिश्चिती मालाच्या संभाव्य हालचालीचा विचार करून नंतरच करावी लागते. तसे करताना मालाची हालचाल यांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने कितपत सोईने व कमी खर्चात करता येईल, याचाही विचार करावा लागतो. भांडारात माल रचून ठेवताना आधुनिक संग्रहपद्धतींचा उपयोग करणे हितावह असते. माल विनाप्रयास ठेवता व काढता यावा, तो खराब होऊ नये, तो चटकन हाती लागावा व निरीक्षकास सहज तपासता यावा, अशी व्यवस्था करणे आवश्यक असते. मालाचा वापर करताना जुन्या मालास अग्रक्रम देऊन तो प्रथम वापरण्याचे धोरण पाळावे लागते. भांडारातून बाहेर जाणाऱ्या मालावर होता होईल तो एकाच कर्मचाऱ्याचे नियंत्रण ठेवणे सोयीचे असते, कारण मालाची तूट आढळल्यास त्याला निश्चितपणे जबाबदार धरता येते. भांडारनियंत्रण कार्यक्षम व्हावे म्हणून शाश्वतसूची पद्धतीने भांडारातील विविध वस्तूंची नोंद ठेवावी लागते. या पद्धतीचे मुख्य तत्त्व म्हणजे मालाची आवक व जावक तत्क्षणीच नोंदवहीत किंवा नोंदसूचीत करणे आणि भांडार-तपासणी वेळोवेळी करणे. भांडार संघटन कार्यक्षम असले, म्हणजे मालाची हालचाल अविलंब सुरळीतपणे चालू राहते, कर्मचाऱ्यांना मालासाठी तिष्ठत बसावे लागत नाही, उत्पादनाचा प्रवाह अखंड चालू राहतो व मालाचा संग्रह आणि त्याची हालचाल कमीतकमी खर्चात होऊन उत्पादनखर्चात बचत होते. अशा रीतीने कार्यक्षम भांडार संघटनाची व्यवस्थापनास चांगलीच मदत होते. आधुनिक युगात मोठ्या कंपन्यांतून गणकयंत्रांचा उपयोगही भांडार संघटनासाठी केला जातो.