भद्रकाली प्रॉडक्शन
भद्रकाली ही कै मच्छिंद्र कांबळी यांनी स्थापन केलेली नाटक कंपनी आहे. १९८० च्या फेब्रुवारी महिन्यात गंगाराम गवाणकरांचे ‘वस्त्रहरण’ रंगभूमीवर आले. ‘ओम् नाटय़गंधा’ने या नाटकाची निर्मिती केली होती. सुरुवातीला आस्तेकदम चालणारे हे नाटक नंतर तुफान धावू लागले. मच्छिंद्र कांबळी यांनी या नाटकात मॅनेजर आणि त्यात्या सरपंच या दोन्ही भूमिका केल्या होत्या. त्यांना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत होता. पण ८०० प्रयोगांनंतर काहीतरी बिनसले आणि मच्छिंद्र यांना नाटकातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांची भूमिका रमेश पवार यांनी दिली गेली.
त्यामुळे काहीसे दुखावले गेलेले मच्छिंद्र कांबळी यांनी, मोहन गोखले यांच्या सल्ल्यानुसार स्वतःची नाटक कंपनी काढण्याचा विचार केला. २९ मे १९८२ मध्ये त्यांनी आपल्या मालकीच्या नाट्यसंस्थेची स्थापना केली. या नाट्यसंस्थेसाठी त्यांनी आपली देवीचे भद्रकाली हे नाव आणि साईनाथ अशी दोन नावे निवडली होती. आपले चिरंजीव प्रसाद कांबळी यांना त्यांनी दोन नावांतून एका नावाची चिठ्ठी काढायला सांगितली. त्यात भद्रकालीचे नाव आल्याने संस्थेला ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ असे नाव ठरले.
मच्छिंद्र यांनी नुसतीच नाट्यसंस्था काढली नाही तर ती धडाक्यात चालवलीही. संस्था स्थापन झाल्यावर दोनच महिन्यांनी ‘चाकरमानी’ हे नाटक आणले. त्यानंतर ‘घास रे रामा’, वगैरे. तीस वर्षात भद्रकाली’च्या नावावर ४१ नाटके आहेत. त्यातील ३८ नाटके मच्छिंद्र यांनी केली आणि त्यांतल्यापंचवीस नाटकात त्यांनी भूमिकाही केल्य़ा. या सर्व नाटकांचे मिळून साडेचौदा हजारहून अधिक प्रयोगझाले आहेत. त्यात एकटय़ा ‘वस्त्रहरण’चेच पाच हजारहून अधिक प्रयोग झाले. आठशे-हजार प्रयोगांचा टप्पा तर अनेक नाटकांनी पार केला आहे.
रंगभूमीवर काम करणाऱ्या नटांनी आपली नाट्यसंस्था स्थापन करण्याची मराठी रंगभूमीवर अनेकउदाहरणे आहेत. ती बरीचशी जुनी आहेत. प्रभाकर पणशीकरांनी ‘नाट्यसंपदा’ची स्थापना केल्यावर हा प्रयोग त्यानंतर फारसा झाला नाही. मच्छिंद्र कांबळी यांनी १९८० च्या दशकात ‘भद्रकाली’ची स्थापना करून तो पुन्हा सादर केला. (अलीकडे मात्र, प्रशांत दामलेच्या नावावर स्वतःची नाटय़संस्था आहे.)
मच्चिंद्र कांबळांच्या मृत्यूनंतर भद्रकालीची धुरा त्यांचे पुत्र प्रसाद कांबळी सांभाळत आहेत.
भदकाली प्रॉडक्शन्सची नाटके
संपादन- अग्निदव्य
- अफलातून
- केला तुकानी झाला माका
- घास रे रामा
- चाकरमानी
- पती माझे छत्रीपती (मूळ नाव पती माझे छत्रपती)
- पप्पा सांगा कुणाचेच
- पांडगो इलो रे इलो
- भय्या हातपाय पसरी
- भारत भाग्यविधाता
- मालवणी सौभद्र
- मेड फॉर ईच अदर
- म्हातारे जमींपर
- येवा, कोंकण आपलाच असा
- रातराणी
- रामा तुझी माऊली
- वस्त्रहरण(>५००० प्रयोग)
- संशयकल्लोळ
- सुखाशी भांडतो आम्ही (१८ पुरस्कार विजेते नाटक)
वस्त्रहरण ५०००वा प्रयोग
संपादनपु.ल. देशपांडे यांनी अस्सल फार्स म्हणून गौरवलेले हे नाटक पूर्वी जेव्हा सातासमुद्रापलीकडे प्रयोग करायला चालले होते तेव्हा, मास्टर भगवान, डॉ.काशीनाथ घाणेकर, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, विजू खोटे, बाळ धुरी ह्या रथी-महारथीनी मदतीसाठी एक प्रयोग षण्मुखानंद हॉलमध्येच केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा वस्त्रहरणचा प्रयोग षण्मुखानंद हॉलमध्ये २१ नोव्हेंबर २००९ रोजी झाला. हा ५००० वा प्रयोग होता. प्रयोगामध्ये, प्रशांत दामले, भरत जाधव, संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे, अतुल परचुरे, सिद्धार्थ जाधव, पंढरीनाथ कांबळे, जितेंद्र जोशी, किशोर चौघुले, जयवंत वाडकर हे पाहुणे कौरव-पांडव होते आणि तात्या सरपंच संतोष मयेकर होते..
भद्रकालीचे वैशिष्ट्य
संपादनमुळात मच्छिंद्र कांबळी याचें वलय खूपच मोठे होते. एक काळ त्य़ांनी मराठी रंगभूमी अक्षरशः गाजवली. नाटक एक हाती उचलण्याची क्षमता असलेल्या ताकदीच्या कलाकारांमधले ते एक होते. मालवणी भाषेचा खुबीदार वापर आणि विनोदाचे अफलातून टायमिंग वापरून ते प्रेक्षकांना लीलया जिंकत असत. त्यांनी भूमिका केलेली ‘भद्रकाली’ची बहुतेक नाटके गाजली. मग ते ‘येवा कोकण आपलाच असा’ असो की, ‘पांडगो इलो रे इलो’ असो. या लोकप्रियतेच्या जोरावर मच्छिंद्र काबंळी मालवणी मुलखाचे ब्रँड अॅम्बेसॅडर बनले. आपल्या या करिष्म्याच्या जोरावर त्यांनी ‘भद्रकाली’लाही मोठे केले.
‘भद्रकाली’ने मालवणी माणसाच्या वृत्ती-प्रवृतीचे दर्शन घडवणारी नाटके देतानाच अनेक सामाजिक समस्यांवरही प्रकाश टाकला. ‘चाकरमानी’मधून त्यांनी मुंबईत पोटापाण्यासाठी जाणाऱ्या कोकणी माणसाला गावामध्ये राहण्याचा संदेश होता, ‘घास रे रामा’ मध्ये घरगड्यांच्या शोषणाचा मुद्दा होता, ‘अग्निदिव्य’मध्ये हुंडाबळीचा प्रश्न होता, तर ‘येवा कोकण आपलाच असा’मध्ये परप्रांतीयांच्या आक्रमणाचा विषय हाताळण्यात आला होता. अशा नाटकांतून ‘भद्रकाली’ची सामाजिक जाणीवच दिसून आली.
२०१२मध्ये भद्रकालीची तिशी
संपादन‘भद्रकाली’ची तिशी साजरी करण्यासाठी प्रसाद ‘भद्रकाली’ची तीन जुनी नाटके रंगभूमीवर आणणार आहेत. नामवंतांच्या भूमिका असलेल्या या तीन नाटकांचे प्रत्येकी तीस प्रयोग होणार आहेत. यांतील पहिले नाटक ‘वस्त्रहरण’ आहे. उरलेल्या दोन नाटकांची नावे अजून जाहीर झालेली नाहीत.