बिल्हण
बिल्हण (इ.स. ११ वे शतक) हा काश्मिरी पंडित आणि संस्कृत महाकवी होता. त्याचा जन्म काश्मीरमधील प्रवरपुरानजीक असलेल्या खोनमुख येथे झाला.[१] त्याच्या मृत्यू कालविषयी माहिती उपलब्ध नाही. हा वर्ण व जातीने ब्राह्मण होता. बिल्हणाने लहानपणीच वेद, व्याकरण व काव्यशास्त्र यांचे अध्ययन पूर्ण केले. तो काश्मीरमध्ये असतानाच त्याचे ग्रंथ ख्याती पावले होते, असे भारतीय संस्कृतिकोशातील 'बिल्हण' या नोंदीत नोंदले आहे.
कौटुंबिक माहिती
संपादनत्याचे कौशिक गोत्र होते. त्याच्या पित्याचे नाव ज्येष्ठ कलश आणि आईचे नाव नागदेवी असे होते.[२] त्याचे घराणे अग्निहोत्री होते. त्याचे वडील आणि आजोबा हे वैदिक महापंडित होते. वडील ज्येष्ठ कलश हे अत्यंत थोर वैयाकरणी होते. त्यांनी पतंजलीच्या महाभाष्यावर टीका लिहिली.
बिल्हणाने एका काव्यात त्याच्या जन्मस्थानाचे वर्णन केले आहे:
ब्रूमस्तस्थ प्रथमवसतेरद्भुतानां कथानां
किं श्री कण्ठ श्व शुरशिखरिक्रोड किलाललाम्नः
एको भागः प्रकृति सुभगंकुङकुमंयस्यसुते
द्राक्षामन्यु सरससरयू पुण्ड्र कच्छेदपाण्डुम्
अर्थ : अद्भुत कथांचे आदिस्थान आणि शिवाचे श्वशुर असलेल्या हिमालय पर्वताचे लीलामय भूषण अशा त्या स्थानाचे वर्णन मी कसे करावे ! त्याच्या एका भागात सहजसुंदर असे कुंकुम उत्पन्न होते आणि दुसऱ्या भागात सरयूच्या तीरावर उगवणाऱ्या कस्तूर मोगऱ्याच्या खंडाप्रमाणे पांडु वर्णाची द्राक्षे उत्पन होतात.
बिल्हणाचे देशाटन
संपादनबिल्हणाने इ.स. १०६२-६५ दरम्यान देशाटन केले. पंजाब, मथुरा-वृंदावन, ते कनौज, प्रयाग, काशी, इत्यादी करीत तो बुंदेलखंड येथे डहाल प्रांताचा राजा कृष्णराज यांच्या दरबारात गेला. तेथे त्याने गंगाधरशास्त्री या पंडिताचा पराभव केला. तेथून त्याला गुजरात येथे धारा नगरीत राजा भोजकडे जाण्याची इच्छा होती. तथापि राजाचा मृत्यू झाल्याने त्याने सोमनाथ येथे गेला. तेथून परतताना कर्नाटकात चालुक्याची राजधानी कल्याण येथे गेला. तेथे चालुक्य सम्राट विक्रमादित्य 'सहावा' याने त्याला एक हत्ती आणि नीलछत्र देऊन राजसभेत विद्यापती हे पद दिले.
जीवनाच्या अखेरपर्यंत बिल्हण विक्रमादित्याच्या आश्रयास राहिला. तेथे त्याने विक्रमांकदेवचरित हे महाकाव्य रचले. बिल्हण खरा विदग्ध कवी वाटतो. दीर्घ समास व अनुप्रास यांचा त्याने फारसा उपयोग केलेला नाही. वीररस प्रधान आहे पण शृंगार व करुण रसही आढळतात. इंद्र व्रज्या आणि वंशस्थ ही दोन वृत्तेच आढळतात.
साहित्य
संपादनबिल्हणाने मुख्यतः विक्रमांकदेवचरित हे महाकाव्य, कर्णसुंदरी ही नाटिका आणि चौरपंचशिका हे लाघुप्रणयकाव्य लिहिले.
- विक्रमांकदेवचरित : हे महाकाव्य कालिदासाच्या रघुवंशाच्या धर्तीवर असून त्यात चालुक्य वंशाचे त्रोटक वर्णन आहे. त्यात त्याने आत्मवृत्तही दिले आहे. त्याने केलेल्या भारतभ्रमणाने मिळालेले ज्ञान या महाकाव्यात जागोजागी आढळते. त्यामुळे 'भारताचा इतिहास' म्हणूनही या ग्रंथास महत्त्व आहे. हे महाकाव्य वैदर्भी शैलीत रचले आहे.
- कर्णसुंदरी : ही नाटिका अनहिलवाडच्या कर्णदेव त्रैलोक्यमल राजाच्या विवाहप्रसंगी लिहिला आहे. हा राजा १०६४ ते ९४ या काळात होता. त्याचे लग्न कर्णाटचा राजा जयकेशी याची कन्या मियानल्लदेवी हिच्याशी झाला. त्यावर आधारित हे कथानक आहे.
कथेनुसार चालुक्यराजास विद्याधर राजाच्या कर्णसुंदरी या राजकन्येशी विवाह करावयाचा असतो. हा विवाह केल्यास त्याला सम्राटपद मिळणार असते. राजा तिला प्रथम स्वप्नात पाहातो, नंतर तिची तसबीर पाहातो, तो प्रेमात पडतो. राजाचा हुशार मंत्री विवाहाचा बनाव रचतो. पण राणीला सुगावा लागून ती कारस्थाने करते. ती स्वतः कर्णसुंदरीचा पोशाक चढवून राजाला भेटते, एका तरुण मुलाला कर्णसुंदरीच्या वेशात राजाच्या लग्नात उभी करते. पण हुशार मंत्री हे डाव हाणून पाडतो आणि विवाह घडतो. त्याक्षणी राजाने म्हणजे सैन्याने परकीय शत्रूचा पाडाव केल्याचे वृत्त येते आणि राजा सम्राट होतो.
'हे नाटक बिल्हणाने राजशेखर, भास,कालिदास यांच्या तयार मसाल्यावर लिहिले आहे आणि राजशेखर नंतर नाटक कसे घसरणीला लागले याचे हे उदाहरण आहे', असे मत सुरेश महाजन[३] यांनी व्यक्त केले आहे.भाषा, व्यक्तिचित्रण व रस परिपोष या दृष्टीने नाटक अगदी सामान्य आहे,असेही ते म्हणतात.
* चौर पंचशिका: हे पन्नास श्लोकांचे स्फुटकाव्य आहे. कवीने एका तरुण सुंदर राजकन्येवर केलेल्या गुप्त प्रेमाची ही कथा आहे. ही खुद्द बिल्हणाच्या जीवनातील कथा असावी, अशी आख्यायिका आहे. ती अशी :
बिल्हणाचे एका राजकुमारीवर प्रेम जडले, त्यांचा गुप्त संबंधही अनेकदा घडला. राजाला हे कळताच त्याने बिल्हणाल देहान्ताची शिक्षा फर्मावली. तेव्हा बिल्हणाला आपल्या प्रेमाचे स्मरण झाले. आणि त्याने त्या विरहावस्थेत चौर पंचशिका हे काव्य रचले. ही रचना वसंततिलका वृत्तात आहे. त्यात प्रकट झालेली रसिकता व गाढ प्रीती राजाला कळाली. त्याने कवीला मुक्त केले आणि त्याच्याशी कन्येचा विवाह करून दिला.
कालिदासाच्या मेघदूताच्या खालोखाल या चौर पंचशिकेला रसिक मान्यता मिळाली. कवी राजा बढे यांनी या काव्याचा 'लावण्य लळित' नावाचा काव्यानुवाद केला आहे.
भारतीय संस्कृतिकोशातील नोंदीचे संदर्भ ग्रंथ
संपादन- Some Aspects of the Earliest Social History of India, S. C. Sircar, 1928,
- संस्कृत साहित्याचा सोपपत्तिक इतिहास : वि. वा. करंबेळकर, १९५४,
- मुसलमानपूर्व महाराष्ट्र : वा. कृ. भावे, १९४६.
- भारती कवि-विमर्श : रामसेवक पाण्डेय, १९५०.
संदर्भ व नोंदी
संपादन- ^ भारतीय संस्कृतिकोश, खंड ६, पान १६७, "बिल्हण, संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी, सहसंपादक : तर्कतीर्थ सौ. पद्मजा होडारकर, श्री. व. ग. सहस्त्रबुद्धे, भारतीय संस्कृतिकोश मंडळ, ४१०, शनिवार पेठ, पुणे ३०, मूल्य रु. ६००/-, आवृत्ती २००९, मुद्रक : ॲलर्ट डी. टी. प्रिंटर्स, ओमकार १०/३, वडगाव (खुर्द), सिंहगड रोड, पुणे ३०; प्रत : संगमनेर महाविद्यालय संगमनेर, ग्रंथालय क्र. 212547, k/जोशी/51547.
- ^ भारतीय संस्कृतिकोश, खंड ६, पान १६७, "बिल्हण, संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी, सहसंपादक : तर्कतीर्थ सौ. पद्मजा होडारकर, श्री. व. ग. सहस्त्रबुद्धे, भारतीय संस्कृतिकोश मंडळ, ४१०, शनिवार पेठ, पुणे ३०, मूल्य रु. ६००/-, आवृत्ती २००९, मुद्रक : ॲलर्ट डी. टी. प्रिंटर्स, ओमकार १०/३, वडगाव (खुर्द), सिंहगड रोड, पुणे ३०; प्रत : संगमनेर महाविद्यालय संगमनेर, ग्रंथालय क्र. 212547, k/जोशी/51547.
- ^ सुरेश महाजन, संस्कृत नाट्यवाङमयाचा इतिहास, पान ४४५-४६, सावली प्रकाशन, पुणे 'सावली' राक्षलेखा सोसायटी, विक्रमनगर, धनकवडी, पुणे ४११ ०४३, प्रकाशन क्र. २७, प्रथमावृत्ती १९ एप्रिल २००७ गुढीपाडवा, मूल्य ४९५/- प्रत : संगमनेर महाविद्यालय संगमनेर, ग्रंथालय क्र., 21254390, 015.2:q/जोशी/54390.