बल्लाळगड हा महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील एक डोंगरी किल्ला आहे.

किल्ल्याची उंची : पायथ्यापासून ५०० मीटर. किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग डोंगररांग : पालघर जिल्हा : श्रेणी : सोपी

महाराष्ट्र गुजरातच्या सीमेजवळ सेगवा आणि बल्लाळगड हे दोन किल्ले आहे. पालघर जिल्ह्यात आणि तलासरी तालुक्यात, मुंबई - अहमदाबाद महामार्गाला खेटून बलाळगड किल्ला आहे. काजळी गावातील छोट्याश्या टेकडीवर बल्लाळगड हा टेहळणीचा किल्ला होता. या भागात असणाऱ्या इतर किल्ल्यांच्या मानाने (सेगवा, असावा, अशेरीगड इत्यादी) बल्लाळगडाची उंची पायथ्याच्या काजळी गावापासून कमी असल्याने अर्ध्या तासात किल्ला सहज पाहून होतो. सेगवा आणि बल्लाळगड हे दोनही किल्ले एका दिवसात पाहून होतात.

काजळी गावात गोरखचिंचेचे (African Baobab) अनेक अवाढव्य वृक्ष पाहायला मिळतात. पोर्तुगीजांनी भारतात आणलेली ही दीर्घायुष्यी झाडे वसई परिसरातील किल्ल्यांच्या आसपास दिसून येतात. 7 Photos available for this fort Ballalgad

इतिहास :

केळवे माहीमचे मूळ नाव मत्स्यमत्‌, त्याचे पुढे झाले महकावती व नंतरच्या काळात माहीम. प्राचीन काळी प्रतापबिंब राजाने दमणपासून वाळुकेश्वरापर्यंतच्या (आजची मुंबई) समुद्र किनाऱ्यावर आपले राज्य स्थापन करून त्याची राजधानी म्हणून महिकावतीची निवड केली. त्याच काळात बल्लाळगड किल्ला बांधण्यात आला असावा. १४व्या शतकात गुजरातच्या सुलतानाने हा परिसर घेतला, तेंव्हा हा गडही त्याचा ताब्यात गेला असावा. पुढील काळात या भागावर रामनगरच्या कोळी राजांची मालकी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७२ ते १६७७ या काळात मोरोपंताना ६०००ची फौज देऊन उत्तर कोकणात पाठवले. इ.स. १६७७ला रामनगरच्या कोळी राजाच्या ताब्यात असलेला प्रांत महाराजांच्या अधिपत्याखाली आला. त्याच काळात बल्लाळगड स्वराज्यात दाखल झाला असावा. इ.स. १६८३पासून पुढील ६६ वर्ष हा किल्ला पोर्तुगीज आणि रामनगर यांच्याकडे होता. चिमाजी आप्पानी काढलेल्या वसई मोहिमेत इ.स. १७३९मध्ये कृष्णाजी महादेव चासकर यानी सेगवागड जिकून घेतला, तेंव्हा बल्लाळगड जिंकला असावा. पुन्हा इ.स. १७५४मधे हा किल्ला रामनगरच्या कोळी राजाकडे गेला. इ.स. १८०२मधे झालेल्या तहात सेगवा किल्ला पेशव्यांकडे आला. इ.स. १८१७मधे गोगार्डच्या अधिपत्याखालील इंग्रज सैन्याने बल्लाळगड जिंकला.

पहाण्याची ठिकाणे :

बल्लाळगडाच्या माथ्याच्या अलीकडे एका झाडाखाली एक वीरगळ ठेवलेला आहे. महाराष्ट्रात अनेक वीरगळ आहेत त्याहून हा वीरगळ वेगळा आहे. या वीरगळावर एक योद्धा घोड्यावर बसलेला दाखवलेला आहे. हा घोडा काठेवाडी पद्धतीचा आहे. सुंदर सजवलेला आहे. त्या वीरगळावर सूर्य चंद्र दाखवलेले आहेत. महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर असलेल्या या किल्ल्यावर वीरमरण आलेल्या वीराचा वीरगळ पाहाण्यासारखा आहे.

वीरगळ पाहून बलाळगडाच्या माथ्याकडे चालत गेल्यास चार बुरुजांनी व तटबंदीने संरक्षित केलेला बल्लाळगडाचा माथा लागतो. त्यावरच्या ४ बुरुजांचे आणि तटबंदीचे अवशेष आज २१व्या शतकातही पाहायला मिळतात. तटबंदी १५ फ़ूट उंच असून ५ फ़ूट रुंद आहे. प्रचंड मोठे दगड वापरून ती तटबंदी बनवलेली आहे. तटबंदीमधे शौचकूप बनवलेले पाहायला मिळतात. तटबंदीच्या आत दोन मोठे हौद आहेत. त्यात दगड आणि पालापाचोळा पडल्याने ते भरून गेले आहेत. त्यांचे नक्की प्रयोजन कळत नाही. कदाजित धान्य किंवा दारुगोळा यांच्या साठवणुकीसाठी त्यांचा वापर झाला असावा. हौदांची साफ़सफ़ाई झाल्यास त्यांचे नक्की प्रयोजन कळू शकेल.

पोहोचण्याच्या वाटा :

काजळी हे बल्लाळगडाच्या पायथ्याचे गाव आहे. तेथे जाण्यासाठी मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील १३० किमी वरील तलासरी गाठावे लागते. त्यापुढे अंदाजे १९ किमीवर (मुंबई पासून १४९ किमीवर) काजळी गाव आहे. पण या गावाचा बोर्ड महामार्गावर न लावल्यामुळे, गाव आल्याचे कळत नाही. या गावाबाहेरच्या महामार्गालगत (मुंबईकडून अहमादाबादला जाताना डाव्या बाजूला) काजळी गावाकडे जाणारा फाटा आहे. या फ़ाट्यावराुन पुढे गेल्यावर गावातील शाळेपाशी पोहोचता येते. या शाळेसमोरील टेकडीवर बल्लाळगड आहे.

रेल्वेने तलासरी / अच्छाड/ भिलाड/ संजाण यांपैकी कुठल्याही रेल्वे स्थानकावर उतरून, स्टेशनाबाहेर मिळणाऱ्या खाजगी जीप/ओमनी या वाहनांनी काजळी फाट्यावर उतरावे लागते. तेथून चालत ५ मिनिटात माणूस गावातील शाळेजवळ पोहोचतो.

शाळेसमोर हातपंप आहे. त्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. त्यातून पाणी भरून गड चढतात. कारण गडावर पाणी मिळत नाही..

काजळी गावाच्या मागे बल्लाळगड आहे. गावाच्या शाळेसमोर एक गोरखचिंचेच झाड आहे. त्याच्या उजव्या बाजूने एक कच्चा रस्ता टेकडीवर जातो. परंतु या रस्त्याने न जाता डाव्या बाजूच्या मळलेल्या पायवाटेन १० मिनिटाचा खडा चढ चढून माणूस गडावर पोहोचतो.

राहाण्याची सोय :

गडावर राहाण्याची सोय नाही. गावातील शाळेत होऊ शकते.

जेवणाची सोय :

मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील हॉटेलात होते.

पाण्याची सोय :

गडावर पिण्याचे पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ :

काजळी गावातून १० मिनिटांत बल्लाळगडावर पोहोचता येते.

जाण्यासाठी उत्तम काळ : सप्टेंबर ते मार्च सूचना :

१) सेगवा आणि बल्लाळगड हे किल्ले एका दिवसात पाहून होतात. २) सेगवागडची माहिती साईटवर दिलेली आहे.

राज मालोंडकर