फिश पॉयझन ट्री
फिश पॅायझन ट्री तथा जमैकन डॅागवूड ट्री हे कॅरिबियन समुद्रातील जमैका बेटावळ आढळणारे वृक्ष आहे. तेथे याचा उपयोग मासे मारण्याकरता होतो. म्हणून त्याला तेथे फिश पॅायझन ट्री असे ही नाव आहे.
मार्च ते मे महिन्यात जांभळा किंवा गुलाबी ठिपका असलेली पांढरी फुले या वृक्षाला येतात. कधी कधी त्याची एक पाकळी हिरवट रंगाची सूद्धा असते. याची शेंग सुरुवातीला हिरवी व नंतर पिवळट पडते. शेंगेला चार टोकदार कडा किंवा पंख असतात.
याच्या बिया विषारी आहेत आणि याच बिया जमैकामध्ये मासेमारीसाठी वापरण्यात येतात. बिया पाण्यात टाकल्यानंतर मासे काही काळासाठी बेशुद्ध होतात. त्या स्थितीत त्यांना गोळा करण्यात येते. या बियांचा प्रमाणित डोस देऊन काही प्राण्यांनाही संमोहित करता येते. याच गुणधर्मांचा वापर औषधांमध्ये करण्यात येतो. याची मुळेसुद्धा विषारी असून त्यांचा ही उपयोग मासे पकडण्यासाठी करण्यात येतो. झाडाचे लाकूड अत्यंत टणक असून पाण्यात व पाण्याच्या बाहेरही त्याचा वापर होतो. गाडीची चाके, गाड्यांचा सांगाडा, कुंपणासाठी वापरात येणारे खांब यांसाठी याचे लाकूड वापरले जाते. झाडाच्या खोडात 'पिसीडीन' नावाचे अल्कलॉईड मिळते. या रसायनामुळे नशा येते. याचा वापर निद्रानाशाच्या विकारासाठी उपचारासाठी केला जातो. तापावरही हे औषध दिले जाते. डोकेदुखी, मासिकपाळी यांसारख्या विकारांवरही हे औषध जमैका व इतर देशांमध्ये दिले जाते .
संदर्भ
संपादन- वृक्षराजी मुंबईची - डॉ. मुग्धा कर्णिक