फास्टर फेणे

फास्टर फेणे (पुस्तक मालिका)

फास्टर फेणे

फास्टर फेणे ही मराठी भाषेतील कादंबऱ्यांची मालिका आहे. या पुस्तकांचे लेखन प्रसिद्ध मराठी लेखक भास्कर रामचंद्र भागवत ऊर्फ भा.रा. भागवत यांनी केले आहे. ही मालिका बनेश फेणे या साहसी मुलाच्या आयुष्यात घडणाऱ्या रहस्यमय, अद्भुत साहसी प्रसंगांवर आधारित आहे. या मालिकेत एकूण २० पुस्तके आहेत.

या मालिकेतील पहिले पुस्तक इ.स. १९७४ साली पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केले होते. मात्र यानंतरची पुस्तके पुणे येथील उत्कर्ष प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत.

फास्टर फेणे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय गुप्तहेर पात्रांपैकी एक आहे. या मालिकेची भाषांतरे इंग्रजी व हिंदी भाषांमध्येही झाली आहेत.


सारांश :

बनेश फेणे हा आव्हानांना झेलायला सतत तयार असणारा एक शाळकरी मुलगा आहे. तो पुणे येथील विद्याभुवन शाळेत शिकतो. त्याचा जन्म पुण्याजवळील फुरसुंगी या गावात झाला आहे. तो धावण्यात व सायकल चालविण्यात अत्यंत चपळ असल्याने त्याला त्याच्या मित्रांनी फास्टर फेणे हे टोपणनाव दिले आहे.

फास्टर फेणेच्या साहसी कथा प्रामुख्याने पुणे व आसपासच्या परिसरात घडतात.मात्र काही कथांमध्ये मुंबई, काश्मीर, इंडो-चायना बॉर्डर इतकेच नव्हे तर अफगाणिस्तान मध्ये देखील साहसी कृत्ये करताना दिसतो. त्याच्या मते त्याला साहसी कृत्ये करायची नसतात पण संकटेच त्याच्या पाठीमागे लागतात आणि मग त्याला त्यातून बाहेर पडण्याशिवाय मार्ग उरत नाही.


फास्टर फेणेची पुस्तके :

१) फुरसुंगीचा फास्टर फेणे

२) आगे बढो फास्टर फेणे

३) बालबहाद्दर फास्टर फेणे

४) जवानमर्द फास्टर फेणे

५) फास्टर फेणेचा रणरंग

६) ट्रिंग ट्रिंग फास्टर फेणे

७) फास्टर फेणेची एक्स्प्रेस कामगिरी

८) फास्टर फेणे टोला हाणतो

९) फास्टर फेणे डिटेक्टिव्ह

१०) फास्टर फेणेची काश्मिरी करामत

११) प्रतापगडावर फास्टर फेणे

१२) गुलमर्गचे गूढ आणि फास्टर फेणे

१३) चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे

१४) फास्टर फेणेची डोंगरभेट

१५) फास्टर फेणेच्या गळ्यात माळ

१६) चक्रीवादळात फास्टर फेणे

१७) चिंकू चिंपांझी आणि फास्टर फेणे

१८) विमानचोर विरुद्ध फास्टर फेणे

१९) जंगलपटात फास्टर फेणे

२०) टिक टॉक फास्टर फेणे


दूरदर्शन मालिका आणि चित्रपट:

इ.स. १९८७ मध्ये दूरदर्शनवर फास्टर फेणेच्या कथांवर आधारित मालिका सादर करण्यात आली होती. या मालिकेत सुमीत राघवन या कलाकाराने फास्टर फेणेची भूमिका केली होती.

इ.स. २०१७ मध्ये फास्टर फेणे नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला ज्याचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले होते व निर्मिती रितेश देशमुख यांनी केली होती. अमेय वाघ या कलाकाराने या चित्रपटात फास्टर फेणेची भूमिका केली होती.