सम्राट ऑगस्टस याच्या कारकिर्दीपासून सुरू होणाऱ्या रोमन साम्राज्याच्या पहिल्या राजकीय पर्वास प्रिन्सिपेट (लॅटिन: Principate) म्हणून ओळखले जाते. इ.स.पू. ३० मध्ये ऑगस्टसच्या राज्यारोहणानंतर सुरू झालेला हा कालखंड इ.स. २८४ मध्ये तिसऱ्या शतकातील संकटपर्वामुळे समाप्त झाला. यापुढील कालखंड हा डॉमिनेट या नावाने ओळखला जातो.

केवळ एकाच सम्राटाची (प्रिन्सेप्स, लॅटिन: princeps) विस्तृत साम्राज्यावर निरंकुश सत्ता व रोमन प्रजासत्ताकाचे काही कायदे व प्रथा चालू ठेवण्याचा किंवा तसा आभास निर्माण करण्याचा सुरुवातीच्या सम्राटांचा प्रयत्न ही प्रिन्सिपेट कालखंडाची वैशिष्ट्ये आहेत.