प्रवीण जाधव

भारतीय तिरंदाज

प्रवीण रमेश जाधव(६ जुलै, १९९६:सरडे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र) हे रिकर्व्ह क्रीडा प्रकारात खेळणारे भारतीय तिरंदाज आहेत. २०१९ मध्ये झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धेमध्ये सांघिक रजत पदक मिळवणाऱ्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता.

सुरुवातीचे आयुष्य संपादन

जाधव यांचा जन्म, सातारा जिल्ह्यातील सरडे या गावी, रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबामध्ये झाला. [१]घरच्या परिस्थितीमुळे त्यांना वडिलांच्या बरोबर कामात हातभार लावावा लागत असे. त्यांना लहानपणीपासूनच खेळाची अतिशय आवड होती. जिल्हास्तरीय ८०० मीटर धावण्याच्या स्पर्ध्येमध्ये त्यांनी भाग घेतला, पण शारीरिक क्षमता कमी असल्यामुळे अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांचे शाळेतील शिक्षक श्री.भुजबळ यांनी त्यांच्या प्रशिक्षणाची आणि आहाराची आर्थिक जबाबदारी स्विकारली. त्याचा परिणाम म्हणून त्यांची कामगिरी उंचावली आणि क्रीडा प्रबोधिनी शाळेत ते दाखल झाले. पुण्यातील बालेवाडी येथे एक वर्ष प्रशिक्षण घेतल्यानंतर ते तिरंदाजीच्या प्रशिक्षणासाठी अमरावतीला गेले. तेथे देखील शारीरिक निकषांवर त्यांची कमी पडणारी ताकद यामुळे त्यांची कामगिरी समाधानकारक होत नव्हती. भुजबळ सरांनी शिक्षण अधिकारी महेश पालकर यांना शेवटची संधी देण्याची विनंती केली. ५ शॉटची संधी मिळालेल्या प्रवीण यांनी ४५ गुणांची कमाई करत आपले प्रशिक्षण संस्थेमधील स्थान टिकविले.

कारकीर्द संपादन

२०१६ मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई चषक स्टेज १ स्पर्धेमध्ये त्यांनी भारताचे प्रथम प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या सांघिक संघातून त्यांनी रिकर्व्ह गटात कांस्य पदक मिळविले.त्याच वर्षी त्यांनी जागतिक तिरंदाजी चषक स्पर्धेमध्ये भारताचे ब संघाचे प्रतिनिधित्व केले.

२०१९ मध्ये झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये रिकर्व्ह प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या भारतीय संघामध्ये ते होते. अतनू दास, तरुणदीप राय यांच्या बरोबरीने प्रवीण जाधव यांनी २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली आहे.[२]

वैयक्तिक आयुष्य संपादन

प्रवीण जाधव हे २०१७ साली भारतीय सैन्य दलात रुजू झाले.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "सरडेच्या प्रवीण जाधवचा ऑलिंपिकवेध | eSakal". www.esakal.com. 2020-03-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Six years after picking up bow, daily wager's son Pravin Jadhav hits world silver". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-03-11 रोजी पाहिले.