प्रमोद मारुती मांडे (जन्म : १९ डिसेंबर १९५४]]; - पुणे, १७ ऑक्टोबर २०१७) हे मराठी इतिहास संशोधक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे, किल्ल्यांचे व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे गाढे अभ्यासक म्हणून ते विशेष ओळखले जातात.

प्रमोद मांडे
जन्म नाव प्रमोद मारुती मांडे
टोपणनाव भाऊ
जन्म १९ डिसेंबर, इ.स. १९५४
मृत्यू १७ ऑक्टोबर, इ.स. २०१७
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहास
भाषा मराठी
साहित्य प्रकार इतिहास
विषय किल्ले, भारतीय क्रांतिकारक
प्रसिद्ध साहित्यकृती गड किल्ले महाराष्ट्राचे

कार्य

संपादन

छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासाचे खरे साक्षीदार असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमधील गडकिल्ल्यांची भ्रमंती करून मांडे यांनी महाराष्ट्रातील तरुणांना हा जाज्वल्य इतिहास प्रत्यक्ष दाखविण्याचे काम केले आहे. मांडे यांनी तब्बल ४० वर्षे सह्याद्रीच्या रांगामध्ये तसेच भारतभर भ्रमण करून २ हजार किल्ले पाहिले व त्यांबाबत लेखन केले, त्यांचे छायाचित्रण केले. टाटा मोटर्समध्ये २२ वर्षे नोकरी केल्यानंतर केवळ छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा, गडकिल्ल्यांचा अभ्यास करता यावा यासाठी मांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

प्रमोद मांडे यांनी महाराष्ट्राबाहेरील इतर प्रमुख किल्ल्यांनाही प्रत्यक्ष जाऊन पाहिले. त्यांच्याकडे सुमारे १५ हजार इतिहास विषयक पुस्तकांचा संग्रह होता. त्यासोबत मांडे यांच्या संग्रही ३ हजार स्लाईड्स, २ लाखांहून अधिक गडकिल्ल्यांचे व भटकंतीचे फोटो, ४५० क्रांतिकारकांचे दुर्मीळ फोटो व तैलचित्रे होती. विशेष म्हणजे राजगड ते आग्रा व आग्रा ते राजगड असा छत्रपती शिवाजी राजांनी सात राज्यांतून केलेल्या तब्बल ६ हजार ३०० किमीच्या प्रवासमार्गावर मांडे यांनी दोन वेळा प्रवास केला. भेट दिलेल्या किल्ल्यांचा संशोधनपूर्वक अभ्यास करून या मार्गाचे छायाचित्रीकरण त्यांनी केलेले आहे. पुढील पिढीसाठी ते मोलाचे ठरणारे आहे.

मांडे यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी गड किल्ले महाराष्ट्राचे, सह्याद्रीतील रत्नभांडार, स्वातंत्र्य संग्रामातील समिधा, १११ क्रांतिकारकांचे संक्षिप्त चरित्र अशी काही निवडक पुस्तकांची नावे सांगता येतील. मांडे यांनी छत्रपतींचा इतिहास, आझादी के दिवाने हा क्रांतिकारकांच्या जीवनावरील कार्यक्रम, शिवरायांची आग्रा मोहीम असे अनेक कार्यक्रम व आतापर्यंत ५ हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. या विषयांवर दोनशेहून अधिक प्रदर्शने केली आहेत.

पुढच्या पिढीला मराठ्यांचा इतिहास माहिती व्हावा, त्याविषयी अभिमान जागृत राहावा यासाठी मांडे सदैव कार्यरत राहिले. त्यासाठी पुणे व्हेंचर्स, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, वडवानल प्रतिष्ठान, भारत इतिहास संशोधक मंडळ, लोकसेवा प्रतिष्ठान, गडकिल्ले सेवा समिती इत्यादी अनेक संस्थांच्या माध्यमातून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले.

मांडे हे भाऊ म्हणूनच सर्वांना परिचित होते. तब्बल २ हजारांहून अधिक गड किल्ल्यांचा पायी फिरून अभ्यास केलेल्या भाऊंना 'दुर्गमहर्षी' व 'सह्याद्रीपुत्र' या उपाध्या मिळाल्या. इतिहासाचे साक्षीदार असलेले गड किल्ले नवीन पिढीने प्रत्यक्ष जाऊन पाहिले पाहिजेत यासाठी मांडे आग्रही होते. त्यातूनच त्यांनी हजारो तरुणांची फौज गडकिल्ल्यांच्या ट्रेकिंगसाठी तयार केली होती. शेवटपर्यंत त्यांचा हा ध्यास कायम राहिला..

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि भारतीय क्रांतिकारकांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता.[ संदर्भ हवा ].

प्रकाशित साहित्य

संपादन
  • १११ क्रांतिकारकांचे संक्षिप्त चरित्र
  • गड किल्ले महाराष्ट्राचे
  • महाराष्ट्रातील रत्नभांडार
  • स्वातंत्र्य संग्रामातील अंगार (चरित्रकथनात्मक)
  • स्वातंत्र्य संग्रामातील अग्निशलाका (चरित्रकथनात्मक)
  • स्वातंत्र्य संग्रामातील समिधा (चरित्रकथनात्मक)

प्रमोद मांडे यांना मिळालेलले किताब

संपादन
  • दुर्गमहर्षी
  • सह्याद्रिपुत्र